Thursday, November 9, 2017

आईपणाचा प्रवास बाकीय..


मी बाळांतपणाच्या सुट्टया संपवून ऑफिसला निघाले होते. सहा महिन्यांनी घर सोडलं होतं. कामाच्या ठिकाणी, पुन्हा आपल्या अस्तित्वाच्या खाणाखूणा सांगणाऱ्या ठिकाणी जाण्याचा आनंद होता. दुसरीकडे अवघ्या चार महिन्याच्या लेकराला सोडून जायचं याचं दु:खही वाटत होतं. पण मनात येत होतं की, "चार महिन्याच्या लेकराला आई म्हणजे काय कळायचं? मी आज दिवसभर नाही दिसले तर त्याला ते कळणार का ? कि एक बाई जी रोज रोज दिसत होती. ती आज दिसत नाही, असं एवढंच त्याला वाटेल.  मग त्याला आई कळेल का?'' यासारखं असुरक्षित वाटायला लावणारे विचारही मनात येत होते. अर्थात अशा सर्व विचारांना बाजूला सारून मी ऑफिसला गेले. ऑफिसचा पहिलाच दिवस आणि तोही रविवार होता. बातमीदारांसाठी रविवारचा दिवस थोडा रिलॅक्स असणारा दिवस असल्याने माझ्या वाट्याला कामाचा ताण नव्हता. बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेल्याने सगळं नवीन, वेगळं वाटत होतं. ते सगळं समजून घेण्यात दिवस पुढे सरकत होता. त्या सगळ्या कामात मला खरोखरच माझ्या लेकाची आठवण आली नाही. पाच वाजण्याच्या सुमारास माझा फोन वाजला. फोनवर मम्मीचं नाव झळकत होतं. तिच्या फोनसरशी मनात धस्स झालं. त्याक्षणी माझ्या मुलाची-सुफियानची आठवण मनात तरळली. मी फोन उचलला. मम्मीनं आधी दिवस कसा गेला या टाईप एक दोन वाक्य बोलली. मी हळूच "सुफी कसा आहे ?' असं विचारलं. ती म्हणाली, "शोधतोय तुला. तू दिसत नाही ना तर जरासा किरकिरतोयसुद्धा. शक्य असल्यास आज जरा लवकर ये. पहिलाच दिवस आहे  ना, त्याचाही.' तिच्या त्या वाक्यावर माझे डोळे टच्चकन भरले. मला अक्षरक्ष: उठून वॉशरुममध्ये जावं आणि मनसोक्त रडावंसं वाटलं. आपल्या छोट्या जीवाला आपण सोडून आलोय या जाणिवेनं मन खूप हळवं झालं होतं.
पहिला दिवस असल्याने, सहृदयी वरिष्ठांनी ऑफिसमधून लवकर सोडलं.  मी साडेआठ वाजता घरी पोहचले. पटदिशी त्याला हातात घेतलं. तोही मला पाहून खूश झाला. त्याच्या डोळ्यात ती चमक स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे मला कसे शोधत असतील हे मी त्याला सापडल्यावर झालेल्या आनंदातून स्पष्टपणे माझ्यापर्यंत पोहचलं आणि मी आनंदाने रडू लागले. माझ्या मुलाला मी 'कळतेय', आई कळतेय, या भावनेनं सुखावले. कालांतराने तो रांगू लागल्यावर मी दारापाशी आले की तो बरोबर ओळखायचा आणि रांगत माझ्याजवळ यायचा. त्या प्रत्येकवेळी त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी एक वेगळी चमक, आनंद दिसायचा.
त्यानंतर, सुफियान सहा महिन्यांचा होता. दोन-तीन दिवस सतत तापाने फणफणत होता. दिवसभर ऑफिस. त्यामुळे मीसुद्धा घरी थकून यायचे. पण घरी आल्यानंतर तो मांडी काही सोडत नव्हता. तीन रात्री तो माझ्या मांडीवरच. मी जरा पाठ टेकवायला पाहायचे की तो रडायचा. मांडीवर घेतला की शांत व्हायचा. त्याच्या तापाच्या उष्णतेनं मात्र माझी मांडी भाजून निघत होती. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टयासुद्धा लगेच गरम व्हायच्या. एवढासा जीव त्याला किती तापाचे चटका  सहन करावा लागतोय यामुळे माझाच जीव रडवेला व्हायचा. सलग तीन रात्री अशाच. डॉक्टरांनी औषधं बदलली तरी पोराचा ताप काही कमी होत नव्हता. शेवटी एवढ्याश्या जीवाची रक्त व लघवी तपासणी सांगितली. हातातल्या त्या छोट्याश्या गोळ्याच्या हाताला नर्सबाईने सूई लावली अन एक छोटी  बाटलीभरून रक्त काढलं.  तो तर जोरात रडायलाही लागला. माझ्याच डोळ्यांत पाणी आलं.  रिपोर्टमध्ये कळलं प्लेटलेटस कमी झाल्यात. अॅडमिट करावं लागेल. मी तर तेव्हा ऑफिसमध्ये होते. मला रिपोर्ट विषयी सांगणारा घरुन फोन आला होता. माझ्या पायातून त्राण गेल्यासारखंच वाटलं. मी सून्नपणे 'आता काय?' असं मम्मीला विचारलं. त्यावेळेस नुकताच आम्ही जवळचा म्हणून दुसर्या बालरोगतज्ज्ञाकडे त्याला नेले होते. मम्मीने सांगितले, त्याला नेहमीच्या डॉक्टरांकडे नेऊ. पाहू काय म्हणतात. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिले. अॅडमिट करण्याची आवश्यकता नाही. इंजेक्शन देतो. दुसर्या दिवशी पुन्हा इंजेक्शन देऊयात असं सुचवलं आणि खरोखरीच त्याचा रात्रीतून ताप उतरला. दुसऱ्या  दिवशी तो पहिल्यासारखा पायांची सायकल करत खेळू लागला. आजही त्याला ताप आला की तशीच धडकी भरते.
एका मुलाखतीसाठी महिला पोलिसांकडे गेले होते. त्यांच्या स्मरणातील एखादी पोलिस केस, छडा कसा लावला याविषयी विचारत होते.त्या पोलिसताईं केस सांगू लागल्या, "एका बाईने आपल्या महिन्याभराच्या बाळाला नदीत फेकून मारुन दिलं होतं. वर तिनेच पोलिसांकडे येवून कांगावा केला की तिचं बाळ हरवलंय. तिने  हकीकतीत म्हटलं की देवळातून नवरा आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी ती बाळासह निघाली. वाटेत तिला लघवीची इच्छा झाली. स्वच्छतागृहात शिरताना तिने बाळाला बाहेर ठेवलं आणि ती आत गेली. बाहेर आली तर बाळ नाही. बाळ कुत्र्याने नेलं असेल इथपासून अनेक तर्क लावण्यात आले पण हाती काही येत नव्हतं. शेवटी त्या पोलिस अधिकारणीला तिच्या बोलण्यातच तफावत आढळू लागली. म्हणून मग त्यांनी तिला जरा विश्वासात घेतलं. बरीच काथ्याकुट केल्यावर शेवटी त्या बाईने गुन्हा कबूल केला. जन्मल्यापासून बाळ सारखाच जुलाब करायचा, मग रडायचा याला कंटाळून तिने नदीत फेकलं होतं. त्या बाईने मग प्रत्यक्ष घटनास्थळी नेलं. बाळ रात्रभर नदीत राहिल्याने फुगून वर आलं होतं. डोक्याला टोपडं होतं. चांगलं गुंडाळलेलं होतं. दूरुन एखाद्या बाहुलीसारखं दिसत होतं. पण त्यात जीव उरला नव्हता. त्या पोलिस अधिकारीण सांगत होत्या आणि मी कमालीची अस्वस्थ होत होते. माझ्या हृदयात खोल पोकळी जाणवत होती. सर्वांगात भीतीचा थंड थरकाप होता. ऑफिसला गेल्यावरही ती घटना कानातून हटत नव्हती. डोळ्यासमोर सारखं ते चित्र येत होतं. कशीबशी ती मुलाखत लिहीली. लिहून झाल्यावर बरं वाटेल म्हटलं पण नाहीच. सारखी मला माझ्या मुलाची आठवण येत होती. त्यावेळेस  सुफी सात- आठ महिन्यांचाच होता. काम उरकून घरी निघाले. गाडी चालवतानाही मनात भीती दाट होती. कसली भीती कळत नव्हती पण होती खरं. घरी पोहचले. दार लोटलं तसा सुफी नेहमीसारखा माझ्याकडे झेपावला. त्याला घट्ट कुशीत घेतलं तेव्हा माझी अस्वस्थता कुठच्या कुठे पळाली. अतिशय शांत-शांत वाटत राहिलं. मी नकारात्मक काहीतरी ऐकलेलं विसरून गेले.  त्या सगळ्या नकारात्मक रेज कुठच्या कुठे पळाल्या होत्या.
माझ्या मुलाचा आणि माझ्यातल्या आईचा जन्म एकाचवेळी नव्हता झाला. तो अशा घटनांतून घडला. मग एकदा नव्हे सततच घडू लागला. मी सुफियानला जन्म दिला तरी माझ्या आतल्या "आई'चा जन्म शिल्लक होता. असं कसं? ते मला खरंच ठाऊक नाही. पण साधारणपणे सर्वच बायांची ही अवस्था असेल पण आपल्याकडे असं सांगण्याची प्रथा नाही. बाळाला जन्म दिला की बाईने लगेच आई व्हावं लागतं. ते खरही असेल पण हेही खरंय की ती काय अशी बाळाच्या जन्मासह जन्मत नसणार.
माझ्याबाबत ती म्हणजे आई, नंतर जन्मत गेली. मग भूकेनं तळमळून रडत उठलेल्या त्याच्या आवाजापासून ते वर सांगितलेल्या विविध घटनांतून घडत गेली आणि अजूनही घडतच आहे. पुढेही घडत राहणार. मला जर कुणी विचारलं आई होताना, तू काय अनुभवलंस, तुला कसं वाटलं तर मला वाटतं हे सांगणं सोपं नसेल, अवघडही नसेल कदाचित पण सोप्पं नाही हे खरं. कारण मी आई तर अजूनही होतच आहे. त्याच्या प्रत्येक वाढत्या दिवसागणिक माझ्यातलीसुद्धा आई वाढत आहे. एकेका दिवसांनी मोठी होत आहे. शहाणी होत आहे. चुकल्या माकल्या अनुभवातून, ठेचकाळत आकार घेत आहे. खरंतर मी सुद्धा शिकत आहे आई असणं. जन्म देणं सोप्पय कदाचित पण आई होणं, आई असणं आणि ते निभावणं ही निरंतर प्रक्रिया आहे. ती घडून जात नाही. पूर्णत्वाला पोहचत नाही. ही प्रक्रिया सतत सुरु राहते.
अगदी सांगू, पहिल्यांदा जेव्हा मला कळलं होतं की माझ्या आत एक जीव आहे, तेव्हा माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. आनंद होता आणि इतरही अनेक भावनांचा कोलाज होता. नेमकंसं काय  ते सांगता न येणारं. असं कदाचित प्रत्येकीचंच होत असावं कारण पहिलटकरीण अननुभवी तर असते पण शरीराच्या एका वेगळ्या टप्प्यावर जाण्याची भीती आणि कुतूहलही असतंच असतं. माझंही तसंच झालं होतं. त्या दिवशी मी साडी नेसली होती. साडी नेसल्यावरही मी त्यात बरीच कंफर्टेबल असते. काम करण्यातही मला त्यात अवघडल्यासारखं वाटत नाही. पण त्या दिवशी थोड्या वेळाने मला उगीच जड-जड वाटत होतं. साडीने नसेल पण मला सतत अस्वस्थ वाटत राहिलं. रात्री काम उरकल्यावर सहज लक्षात आलं की पाळीची तारीख चुकून बरेच दिवस झालेत. शिवाय दोन दिवसापूर्वी कॅन्टीनमधल्या वडे तळण्याच्या वासाने मळमळल्यासारखं झालेलं तेही आठवलं.
 घरात प्रेग्नेसी टेस्ट किट होती. नणंद नर्स असल्याने तिने अगदी एक डब्बाच दिला होता. त्यामुळे मनात शंका आली की टेस्ट कर असा कारभार होता. त्या दिवशीही एक किट घेतली आणि घरच्या घरी टेस्ट केली. ती करताना, आपण गर्भवती असू असं काही वाटलं नव्हतं. फक्त आपला एक चाळा म्हणून ती टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. डोळ्यांवर विश्वासच बसेना. नवऱ्याला आणून दाखवली. तर तो प्रतिक्रिया देण्याऐवजी म्हणाला, "आणखी एकदा टेस्ट कर. उगीच निष्कर्षापर्यंत येऊ नको.' मला त्याचं पटलं आणि पुन्हा एकदा टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह होती. मी मगाशी सांगितलं ना माझ्या मनात निरनिराळ्या भावना होत्या. एकच कुठली अधिक प्रबळ होती ते सांगणंही अवघड. मी आता आई होणार ही एक भावना तेवढी स्पर्शून गेली. मग दुसऱ्या च दिवशी रीतसर डॉक्टरांना भेटून सगळ्या गोष्टींची खात्री केली. डॉक्टरांनीही शिक्कामोर्तब केला. मग लगेच सोनोग्राफी सांगितली.
सोनोग्राफी करणारे डॉक्टर मात्र मला माझ्या पाळीची तारीख दोन तीनदा विचारु लागले. ते अतिशय साशंकपणे विचारत होते म्हणून मीही थोडी घाबरले. मग त्यांनी वैद्यकिय भाषेत गर्भात पुरेसा जीव आलेला नाही असं सांगितलं. किंवा गर्भधारणेची तारीख चुकलीये असं काही तरी सांगितलं. पुन्हा डॉक्टरांकडे आले. त्यांच्यापर्यंत रिपोर्ट पोहचला होता. त्यांनीही मला पुन्हा एक-दोनदा तारीख बरोबर आहे ना विचारलं. मी हो म्हणाल्यावर डॉक्टर म्हणाल्या, अजून पुरेसा जीव आलेला नाही. कदाचित तुझ्या पाळीच्या तारखेनंतर बऱ्याच दिवसांनी consive झालं असेल. म्हणजे उशीरा गर्भधारणा झाली असेल. त्यावेळी माझ्या चेहऱ्या वर आता काय? असे भाव झळकले असतील. डॉक्टर लगेच उत्तरल्या, "गर्भवाढीसाठी दर आठवड्याला एक इंजेक्शन घ्यावे लागेल. किमान तीन महिने. नाही घेतलेस तर कदाचित गर्भ हलकेच गळून जाऊ शकतो. '' माझ्या आत जन्मलेला अंकुर गळून जाऊ शकतो या विचारानेही मला कससंच झालं. शेवटी दर आठवड्याची इंजेक्शन्स सुरु झाली. त्यानंतर महिन्याभराने पुन्हा सोनोग्राफीची वेळ आली त्यावेळेस डॉक्टरांनी मला सुचवले की, "इथून पुढे तू सोनोग्राफीच्या डॉक्टरांना पाळीची तारीख मी सांगते ती सांगायची.त्यांनी माझ्या पाळीच्या तारखेत आणखी दहा दिवस अधिक करुन सांगितले.' त्यानुसार सोनोग्राफी झाली आणि त्या तारखेनुसार गर्भाच्या वाढीचा ताळमेळ बसला.
मी मात्र जवळपास चार महिने दर आठवड्याचं इंजेक्शन घेत होते.  आजही थंडीत कधीकधी खूपवेळ बसून राहिले की उठताना माझ्या पुठ्ठ्यांना रग लागते. सुरुवातीची पाच इंजेक्शन सलग मी डाव्या पायावर घेतले. आलटून पालटून पाय बदलायचं लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे थंडीत, पावसाळी वातावरणात कधीतरी डावा पायही आखडतो.  तर अशारितीने माझ्या पोटात माझं बाळ हळूहळू वाढत होतं. पण खरं सांगते, मी सोनोग्राफीला जायचे तेव्हा प्रत्येकवेळी मला भयंकर भीती वाटायची. वाढ नीट असेल ना. सारं काही बरोबर असेल ना आणि सुदैवाने सारं काही व्यवस्थित असायचं.
मी पत्रकार असल्याने, मला बातमीदारी चुकली नव्हती. सततचं रिपोर्टिंग म्हणजे गाडीवरुन फिरणंही आलं. डॉक्टरांनी गाडी चालवण्यास हिरवा कंदील दिला होता. फक्त गाडीला किक मारायची नाही की स्टॅण्डवर लावायचं नाही. इतकं सांगितलं होतं. मला तर माझ्या पूर्ण गर्भावस्थेत स्वत:शिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती चांगला ड्रायव्हर वाटत नव्हती.  मी स्वत:ला जितक्या काळजीनं कुठंही न्यायची तितकी इतर कोणीही नेऊ शकत नाही, यावर मी ठाम होते. खड्डे चुकवून, कमीत कमी स्वत:ला दचके बसतील याची मी व्यवस्थित काळजी घ्यायचे.
मला अगदी माझा नवरा चेकींगसाठी घेऊन जायचा तरी मी शंभरवेळा त्याला हळू चालवं, खड्डा बघ म्हणायचे. तो हळूच चालवत असे पण तरीही मला त्याच्यावर विश्वास नसायचा.  त्यामुळे मी अगदी सातव्या महिन्यापर्यंत ऑफिसच्या रिपोर्टिंगसाठी गाडी चालवली.  मग एक महिना मला डेस्क काम दिले तरीही मी घरी येण्या-जाण्यासाठी स्वत:ची गाडी चालवत होतेच. मी तर अगदी आठव्या महिन्यात किराणामालाचं सामान दुचाकीवर पायाशी ठेवून पाच किमीचं अंतरही कापलंय. (माझा स्वत:च्या सुरक्षित ड्रायविंगवर विश्वास होता म्हणूनच, उगीच असे प्रकार कुणी का करावेत असं मला आता वाटतंय) काही वेळा दुचाकी चालवायचा कंटाळा यायचा पण म्हटलं ना मला कुणाचा विश्वास नाही वाटायचा.
याच काळात डॉक्टरांनी कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि इतर काही गोळ्या दिल्या होत्या. दररोजच्या औषध घ्यायचं म्हणजे जीवावर यायची गोष्ट. शेवटी डॉक्टरांना विचारलं, हे सर्व खायलाच पाहिजे का? कशासाठी इतक्या गोळ्या.. डॉक्टर छानपणे म्हणाल्या, "मुली, तुला काय वाटतंय या गोळ्या कुणासाठी  आहेत म्हणून. ही औषधं तुझ्यासाठी आहेत. बाळांतपणात तुझ्या शरीराची झीज होऊ नये, सर्व व्हिटॅमीन्स आणि पोषकमुल्य, संप्रेरकं नीट असावीत म्हणून ही औषधं. बाळांतपणानंतर कंबरदुखीपासून वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. अशा वेळी जर आधीपासूनच तुला ही सप्लिमेंटस मिळाली तर नंतर त्रास होणार नाही. नाहीतर पहिल्या बाळांतपणानंतरच मुली इतक्या गळतात की दुसऱ्या  बाळांतपणात तर पारच नाजूक झालेल्या असतात. ही सारी औषधं तुझ्या शरीराच्या आरोग्यासाठी आहेत. बाळांतपणानंतरही दिलेली औषधं नीट खायची. तेव्हा तर ब्लिडींग होतं असतं, शरीराची झीज झालेली असते. त्यामुळे त्या औषधांनी आराम मिळतो. लवकर बरं होता येतं आणि मुख्य म्हणजे शरीराला मजबूती मिळते.' डॉक्टरांनी इतकं सगळं सांगितल्यावर औषध न खाण्याचा प्रश्न नव्हताच. तरीही लगेच कसा विश्वास ठेवायचा म्हणून आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या  मैत्रिणीला विचारलं. तिने हमी भरली आणि मग रोज सकाळ संध्याकाळ औषधं पोटात जावू लागले.
गर्भावस्थेत व्हाईट डिस्चार्ज होत नाही असं मी माझ्या मम्मीकडून ऐकलं होतं. गरोदरपणातील पुस्तकातही वाचलं होतं. पण मला तर व्हाईट डिस्चार्ज व्हायचा. काही वेळा तर खूप जास्त ही. एका पुस्तकात तर म्हटलं होतं की व्हाईट डिस्चार्ज हे गर्भासाठी धोकादायक असते. मी धास्तावले. आधी मम्मीला सांगितलं पण तिने एकच उत्तर दिलं. "अतिनाजूकपणा करायचा नाही. पुढच्या वेळेस डॉक्टरांकडे जावू तेव्हा सांग.' मला वाटलं कसली ही मम्मी. इतकं काहीतरी गंभीर सांगतेय तर तिचं हे असं उत्तर. पण ती पहिल्यापासून ते बाळांतपणापर्यंत अशीच होती. कदाचित त्यामुळेच हर छोट्या गोष्टीला घेऊन पॅनिक व्हायचं नाही हे मला कळत गेलं. पुढच्यावेळेस डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांना व्हाईट डिस्चार्जविषयी सांगितलं. त्यांनीही फार गंभीर नसल्याचं सांगितलं. पण मला खात्री वाटत नव्हती, शेवटी त्या म्हणाल्या, 'सध्या तुम्ही मुली ज्या पद्धतीने धावपळ, दगदग करता त्यामुळे  पांढरं जातं. पण आत्ताच्या काळात ही अगदी सामान्य बाब आहे.' मला खूप हायसं वाटलं. पण त्याचवेळी लक्षात आलं. काळ बदलतो, तशी माणसाच्या शरीरातल्या सूक्ष्म गोष्टींतही बदल होत जातात. कालपर्यंत पांढरं जाणं धोक्याचं होतं ती आता बऱ्याच मुलींसोबत घडणारी सामान्य बाब झाली होती.
अशा रितीने सुफी माझ्या गर्भात वाढत होता. पाचव्या महिन्यानंतर तो गर्भात फिरु लागला. पहिल्यांदा ही जाणिव नीट उमगली नव्हती. पण नंतर नंतर त्याचं फिरणं जाणवायला लागलं तेव्हा भारी वाटायचं. कधी छातीच्या खाली डोकं यायचं तर कधी ओटीपोटाखाली. त्याचं गर्र्रकन फिरणं त्याच्या अस्तित्वाचा ठसा ठळक करत जायचं. काहीवेळा बाळ फिरताना पोटात ओढल्यासारखंसुद्धा व्हायचं. तेव्हा जरा दुखल्याची जाणिव व्हायची. इतकच. 
बाकी माझं काम फिरण्याचं असूनही मला ते टाळावसं नाही वाटलं. थकायला व्हायचं. पण काळजी करणारे सहकारी सोबत असल्यानं त्यातूनही पटकन बाहेर यायचे. पण बातमीदारी म्हटलं की एकूणच नकारात्मकता खूप. सतत नकारात्मक बातम्यांनी तर एरव्हीही मी हताश  व्हायचे. अशा अवस्थेत कधी कधी मला काळजी वाटायची की मी माझ्या बाळाला सतत नकारात्मक  विचारात ठेवते. काळजी नाही तर अगदी भीतीच वाटायची. माझं कोर्ट बीट होतं. म्हणजे कोर्टावरच्या बातम्या करणे आलं. यात मग पॉजिटिव्ह कुठून आल्या बातम्या. बातमी करत नसलो तरी आपण आता उद्या काय बातम्या करायचा या विचारातही निगेटीव्हीटी ठासून भरलेली असायची. कुठची तरी निगेटीव्ह माहितीच आठवायची जीची बातमी होणार असायची. मी या सर्वाने अस्वस्थ होऊ लागले होते. म्हणून मग मी प्रत्येक वेळी बातमी करताना गर्भाशी गप्पा मारु लागले. जे काही चूकीचं लिहीत असायचे तेव्हा मी स्वत:ला आणि गर्भाला बजावत असायचे की "हे असं चूकीचं वागायचं नसतं, अशा वाईट गोष्टी करायच्या नसतात.' त्याचवेळी मी चांगलं काय करायचं असतं याचा विचार करायचे. अगदी स्वत:ला मी अशी सवयच लावून घेतली होती. इतर वाचन वगैरे भाग होतच परंतू कामाचा भाग म्हणूनच सतत निराशा आणणाऱ्या  गोष्टी असल्यावर काय करणार? मग मी माझ्या छोट्या प्रवासात, बातमी करताना असा संवाद वाढवला. त्यामुळे माझं मलाच जाणवलं की, मी असंख्य सकारात्मक गोष्टी शोधतेय आणि त्या स्वत:ला दाखवत ही आहे. मला स्वत:लाही छान वाटू लागलं. त्याचा परिणाम गर्भावरही नक्कीच झाला असणार.
हे सगळे दिवस फार वेदनादायी असतात किंवा फार आनंददायी असतात असं नव्हे. मला वाटतं या दोन्हींचा संगम असतो. सुरुवातीच्या दिवसांत काही वेळा अगदी आरामाशिवाय गत्यंतर नाही अशी अवस्था होते तर काही वेळा खूप उत्साही वाटतं. फार वेदनेच्या कळा सोसल्या किंवा गर्भावस्था काय मस्त एन्जॉय केली असं म्हणणाऱ्या  लोकांविषयी मला नेहमी शंका वाटते. कारण असं दोन्ही टोकं निश्चित नसतात. त्याच्या अधली मधली फिलींग असते. काहीवेळा खरोखरच खूप त्रास होतो. अगदी मानसिकही अस्वस्थता जाणवत राहते तर काही वेळा खूप छान, आल्हाददायी वाटतं. माझी गर्भावस्था तर अगदी अशीच होती. वेदना आणि आनंदाचा मेळ असणारी. मी तर अगदी दुसऱ्या  महिन्यात तापाने आजारी पडले होते. खोकलासुद्धा झाला होता. डॉक्टरांनी काही औषधं दिली नव्हती. नुसतं आराम, गरम पाण्याच्या पट्टया, गरम पाणी पिणे अशाच सूचना केल्या होत्या. खोकताना पोटावर हात ठेवायची सूचना केली होती. खोकला कितीतरी दिवस गेला नाही. माझी मम्मी वैतागून मला म्हणाली ही होती, ""कशा तुम्ही आजच्या मुली. मी तीन वेळा गर्भवती झाले पण एकदाही मला काही झालं नाही. उलट गर्भावस्थेत असं काही होतही नाही.''
मी देखील लगेच तिला म्हणाले, "तुझं बरोबर आहे गं, व्हायला नको पण आमची दगदगसुद्धा लक्षात घे की. घर म्हणजे शंभर कामं, सकाळी स्वयंपाक, वरची इतर कामं, मग ऑफिस, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक. तुला किमान दुपारी थोडा आराम मिळायचा. माझं तसं कुठंय. दगदग झाली की थोडं आजारपण येणारचं'' तिला ते मात्र पटलं. तुम्हा मुलींना गर्भावस्थेत सुद्धा आराम नाही हे खरंच. असं म्हणत तिनं एक उसासा सोडला. एक मात्र या काळात माझा बीपी सदोदित नॉर्मलच्या काट्यावर हसत उभा राहायचा. पण गर्भावस्थेतील साखर मात्र वाढली होती. (मला सतत गोड खावं वाटायचं आणि मी खायचेसुद्धा. ऑफिसमधील एक मित्र तर चॉकलेटस आणि आईस्क्रीमही आणून द्यायचा. साखर वाढणार नाही तर काय?) त्यामुळे गोड खाणं बंद करायला लावलं होतं आणि चालण्याचं प्रमाण वाढवलं होतं. बाकी इतर कुठलाही त्रास झाला नाही.
सरतेशेवटी, शेवटची सोनोग्राफी झाली आणि कळलं की आमचा बाळकोबा डोकं वर घेऊन बसलाय. थोडक्यात पायाळू होता. त्याच्या डोक्याचा टणक भाग मला छातीखाली जाणवायचा. ठरल्याप्रमाणे सिझेरियन झाले. मी जरा भूलीच्या ग्लानीत होते तेव्हा मम्मी हातात बाळ घेऊन दाखवायला आली. त्याला पाहून मी मंद स्मित केलं बाकी मला भयंकर वेदना होत होत्या. मी तिला काहीही विचारू शकण्याच्या अवस्थेत नव्हते. मग तीच म्हणाली, "मुलगा झालाय.' मी बारीकस हसले. त्यावेळेस मला प्रचंड वेदना होत होत्या. पोट खाली झाल्याचं कळत होतं. त्यामुळे मला कुठलीही प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नव्हती. थोड्या वेळाने नर्सने येऊन माझ्या पोटावर आणखी दाब दिला. झालं संपूर्ण दिवस मी त्या वेदनेत विव्हळत होते. डोकं भूलीच्या औषधाने गरगरत होतं. त्यामुळे आपण आई झालोय या जाणिवेची ओळख तोपर्यंत तरी नव्हतीच.  दुसऱ्या  दिवशी जेव्हा गरगर कमी झाली आणि वेदनाही कमी झाल्या तेव्हा मम्मीने त्याला माझ्या शेजारी झोपवलं. मला त्याक्षणी आई झाले की नाही कळलं नाही पण आपण एका बाळाला जन्म दिला हे त्याच्या बोटात स्वत:च बोट अडकवताना समजत होतं.

मी सुफीयानला जन्म दिला तेव्हा मी फक्त जन्मदात्री झाले होते.  माझ्यातली 'आई' तर नंतर जन्मली. हळूहळू, वेगवेगळ्या प्रसंगातून. त्याच्या जन्मानंतर दुसऱ्या तिसऱ्या  दिवशी त्याच्या स्पर्शाने पान्हासुद्धा फुटला. स्तनग्राचे रंध्रे मोकळे होऊन दूधही तो चुटूचुटू प्यायला लागला. पण बाईच्या ठायी असणारी माया, ममता, ममत्व हे आई होऊन पाझरायला वेळ लागला. महिने भरले की नाळ कापून एक जीव जन्माला येतो. पण आईपणाची नाळ कालांतराने, अलगद जुळत जाते. जन्म देणं आणि आई होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाळाला जन्म देण्याची कहाणी सांगता येते पण अमूक एका थांब्यावर विसावून आई होण्याची कहाणी कशी सांगणार? असा काही थांबा  नसतोच मुळी अन आई होण्याच्या परिपूर्णतेचा ध्यास निरंतर पुढे सरकत असतो. एकाच जन्मात आई सतत जन्मत राहते आणि सतत घडत राहते. त्यामुळे आईपणाचा माझा प्रवास कायमच बाकीयं...!!

(आपले छंद दिवाळी अंक २०१७ प्रसिद्ध )

Saturday, August 20, 2016

अस्वस्थ करणारं पुस्तक


प्रेम ही खरं तर किती तरल भावना आहे. त्याची व्याख्या करणं तसं अवघडचं शिवाय व्यक्तीसापेक्ष ही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना आपल्याला सुखी, आनंदी, छान काहीतरी वाटू देत राहते, हे असचं असतं असंही नाही त्यात राग, लोभ, रूसवा फुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हे ही खरं, यात कोणाचं दुमत असणार नाही. पण प्रेम करणं हे काही सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.
पण काही वेळा प्रेम करून ही, हिम्मत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणं इतकं अंगवळणी पडेललं असतं की, त्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवलं जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर आपण खेळत राहतो. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का? मन मारताना होणार्या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं? कसं डील करायचं?
चिमुटभर रूढीबाज आभाळ ही राजन खान यांची कांदबरी अशीच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आपल्या जगण्याची एकूण व्याप्ती पाहता या रूढी परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा किंबहूना तो तेवढाच असतो पण तो आपण कुरवाळत राहतो आणि आपलंचं जगणं आभाळाएवढं मुश्किल करून घेतो. हा सगळ्यांच्याच जगण्याचा सार म्हणजे ही कादंबरी.
एकूणच, आपल्या समाजाची जडणघडण बर्या वाईट परंपरांच्या, जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातूनच होत जाते आणि कळत नकळत त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत असतात. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार आणि प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत घडतच जातात. त्या अर्थी आपण चित्रपटापासून ते कथा-कादंबर्यांपर्यंत प्रेम हा विषय पाहिलेला ऐकलेला असतो. काहीवेळा आपल्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना आपण पाहिलेल्या असतात. मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच. आपल्यासाठी एक प्रेमकहाणी संपली इतकाच विषय असतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन पुन्हा सगळं सुरळित होईल. मुलीच्याबाबतीत तर तिचं लग्न लावून दिलं की कुटुंबियांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद. मात्र या सगळ्यात खरचं प्रेमभंगानंतर किंवा स्वत: प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था काय होईल. परंपरांच्या कलेनं जाणार्या, प्रेम हवं असणार्या पण चौकटी मोडू पाहणार्या या स्त्रीची अवस्था कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करतानाही भीती आणि लग्न झाल्यानंतर ही होऊन गेलेल्या प्रेमाची हकीकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्यादृष्टीनं सारी भीती, आठवणी आता झिरझिरीत झालीये असं वाटत असातनाच तो परततो आणिउद्या 1 वाजता भेटायला ये..नाही आलीस तर मी दोन वाजता घरात येतो असं म्हणून वादळासारखं निघून जातो. या एका वाक्यात लपलेलं दडपण, तिची अस्वस्थता, तिची उलघाल, उलथापालथ, भीती लेखकानं अतिशय सूक्ष्मरित्या आणि वास्तवादी टिपलयं.
मुळात, आपल्याकडे, पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी मुलांनाही पालकांनी आपल्याला जगात आणून आपल्यावर उपकार केले आहेत असंचं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हा ही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. अशा परिस्थितीत मुलांविषयी पालकांना काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटतो असं जे आपण म्हणत राहतो, त्यावेळी त्यातील काळजी अन आदर शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही रचनाच तशी आहे. अन इतकीच नाहीये. बाकी अनेक प्रकारचे रंग त्याला आहेत. जातींची, धर्माची,लिंगभेदाची, आर्थिकतेची त्यातही पुन्हा एक एक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा आपल्या रीती नीतीच्या समाजात, प्रेम करणं हे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे. एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.
कांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भितीचा आणि िंबंग फुटलं तर त्यामुळे होणार्या परिणामांचा विचार करत असते त्यावेळेस तिच्या लक्षात येते, प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिलाच मिळतेय. त्याचं नाव पेपरात येतं, टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचं प्रेमाशिवाय सुरू असलेलं आयुष्य सुरेख सुरू आहे. त्यात तो पुढेही गेला मग कोंडवाडा मलाच का?हा प्रश् आपल्यालाही अस्वस्थ करतोया प्रश्नाचं उत्तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणं अवघडचं.
कादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावं नाहीयेत. तिचं पात्र ती म्हणून येतं अन त्याचं तो म्हणून. अन बाकीचे सुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. ही गोष्ट मला विशेष चांगली वाटली कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर आपल्या एकूण समाजात सर्वच धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या अशाच रीतीनं जातात. त्यामुळं पात्र बिननावी आहेत हे चांगलचं आहे. पुस्तकाचं गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं झालयं. कांदबरी वाचनीय झालेली असताना, संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कुठेच अवतरण चिन्ह नाहीत. अक्षरजुळणीतील ही गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.
पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना आपल्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं. त्यालाही अर्थात कारण हेच बेड्याघालू समाज.


चिमूटभर रूढीबाज आभाळाला धुतकारून प्रेम करता आलं पाहिजे आणि त्यासह जगताही!

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...