बुधवार, १२ मे, २०२१

बायको आणि गुलाम!

अस्सा अस्सा संताप झाला होता. शरीर थरथरत होतं, रागानं. हृदयात कोळसा पेटला होता. धगधगत होतं सगळं तन-मन. वाटत होतं की होऊन जावं हिंसक. सोडून द्यावं स्वत:वरचं नियंत्रण आणि वाजवून द्यावी त्याला सण्णकन. साला दोन दिवस झाला तरी डोक्यातली ती कलकल संपत नाहीये.

काय प्रश्न विचारला होता त्याला... हेच ना, बाबा नवरा बायकोत भांडणं होत नाहीत?
इंग्रजीत शिंकणारं, पार्ट्या करत फिरणारं आणि स्वत:ला नखशिखांत मॉडर्न समजाणारं तो शाणपट्टी आधी मिश्किल हसला. मग म्हणाला, ‘देखो, रोजा है...कुरआन पाक की कसम दिला दो, दो साल हुए शादी को पर मेरे वाईफ ने एक बार भी पलटकर जवाब नहीं दिया!’
ह्याची बायको माणूसय की मशीन...किती फेकावं माणसानं...किती म्हणजे किती?
...आणि खरंच ती उलटून बोलत नसेल तर काय मग तिला सोशिकतेच्या नदीत बुडवून काढून मृत केलं असेल का?
रे भेंडी विसरलेच... त्याच्याच भाषेत बायको म्हणजे गु-ला-म! हे ऐकून शाणपट्टीच्या पायाखालची जमीन सर्रकन खिसकवून घ्यावी वाटणार नाही का?
चौदाशेच्या काळातून बाहेर न आलेला तो बुरसट विचारांचा अल्ट्रामॉडर्न शाणपट्टी दोन तास ही असलंच बाळवट खीटपीट करत होता.
अल्लाह के बाद अगर किसीको सज्दा करने का कहा गया तो वो है शोहर को, इतना दर्जा दिया है उसे... औरत का ओहदा मर्दसे कमही होता है... आदमी को हमेशा औरत के आगे रखा, उसका प्रोटेक्टर बनाकर... आदमी काम से थका भागा आता है तो बीवीने ही उसकी खिदमत करनी चाहीए...उसके पीछे दुनियाभर के टेन्शन रेहते उप्पर से बीवी तंग करेगी तो फिर क्या करेगा बिचारा मर्द... कितनी भी परेशानी हो बीवीने उफ नहीं करना चाहिए... मर्द जो चाहे कहे (करे) औरत ने उसके हद में रहना... बत्तमीजी और जबानदराजी नही करना (सहते रहना)उसके दिल जैसा रहना, उठ बोले तो उठने का बैठ बोले बैठने का... एक गुलाम के जैसा रहने का...
क्काय! बायको आणि गुलाम... बायको आणि गुलाम... बायको आणि गुलाम! वाजतच राहिलं कानात. कान बधीर होतील असं वाटलं क्षणभर. अंहं क्षणभर नाही, बराच वेळ. बराच वेळ कानात तेवढंच ऐकू येतंय... पुढचं काहीही ऐकू शकत नव्हते आता.
नवरा बायको. समसमान. एकमेकांना पुरक. एकमेकांचे साथी-सोबती, दोस्त. बरोबरीचे. त्याच्याच भाषेत सांगण्यासाठी एकदुसरे के लिबास, एक चुकेल दुसरा सांभाळेल. दुसर्याच्या सुखदुखात पहिलाही सोबती. कायदा-संविधान..! अशी काय बडबड केली होती मी. माझ्या तोंडात कॅसेट बसवल्यासारखं मी हेच हेच आणि तेवढंच बोलत होते कंटीन्यू. दोनतीन तास. इतक्यांदा सलग बोलून बोलून घशाला कोरड पडली होती, आपल्याच घशात आपला आवाज अडकणार की काय इतका. क्रोधापेक्षा करूणा हे डॉक्टर दाभोलकरांचं तत्वही आता हळूहळू फिक्कं पडू लागलं होतं.
त्यातच त्यानं बायकोच उलटून न बोलणं आणि गुलामाशी तुलना केल्यावर तर करूणा नष्टच झाली. क्रोध तर बेसुमार होता पण त्याही पुढं जाऊन हातापायांतलं त्राण नष्ट झालं. ह-त-ब-ल. हतबल वाटू लागलं. अस्सं झालं की मी कुठल्या भाषेत ह्याच्याशी बोलू. मुळात बोलून ऐकणार आहे का हा? ऐकू तरी येतं का? ऐकायचं माहितीये का? मी बोलण्याचा अवकाश की तो तिची ही चूक, तिची ती चूक, तिची ही चूक, तिची चूक हे त्याचं चूकपुराण संपतच नव्हतं. तो ऐकतच नव्हता म्हणजे. तो ऐकत नव्हता? घशाला कोरड पडली तरी तो ऐकत नव्हता?
मग... मग... मग दातओठखात मधलं बोट दाखवून सरळ मागं फिरले. आता तर त्याच्या अंगातच आलं. चवळताळला. घरभर थयथयाट. आक्रस्ताळेपणा. वर बोंबलणं. कचकचकचकच बोंबलणं. त्याच्यासमोर खूर्चीवर शांत बसून मी बाटलीतलं पाणी प्यायले. माझा खरंच रोजा नव्हता!
त्या तीन चार तासात तेवढंच एक बरोबर त्याला कळलं होतं. रे भेंडी त्याला ते कळलं होतं...त्याला ही भाषा कळते?! ठरलं याच भाषेत बोलायचं आता...सगळी कलकलच संपली की राव!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...