गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

संतत्व?

 ...मी इथं मन मारत राहते. माझ्या आशा-आकांक्षाना सतत मुरड घालत राहते. कित्येक इच्छा अशा उधळून लावते जणू त्या माझ्या नव्हेतच. आणि तू बिनधास्त उधळपट्टी कर. फिजूलखर्ची कर. गरजा न ओळखता पाय पसरत रहा. आणि मी मनाची चाळणी करून घेते. कुठलीच आस-आसक्ती राहायला नको ना...किमत नाही तुला माझी...

काहीही बोलू नको. कुठलाच फालतू खर्च करत नाही. आणि तुला तर काही कमी पडू देत नाही.. तुझ्या सगळ्या इच्छा-आशा-अरमाँ पुऱ्या करतो. सारखंच काय आपलं मन मारते न त्याग करते न मोठेपणा करते न मीच रडूबाई-पडूबाई होऊन जगते. त्यानं ही तिच्या आवेगाहून आवाज चढवला.
हो हो मोठा आलास माझी किंमत ओळखणारा! नाहीच तुला माझी किमत..अन काय केलंस ते इतकं बोलून दाखवतोयस. तुला काय माहित मी माझ्या कित्येक हौशी सोडून दिल्या. आता नको नंतर बघू म्हणून सोडून दिलं. पैपै जपण्यासाठी, राखण्यासाठी कुठली मौज केली नाही कि मनासारखा खर्च..
कसली हौस-मौज? काय कमीये तुला. सगळं वेळच्या वेळी देत आलोय तरी तुझं तुणतुणं सुरूच. नाही एकदाच सांगच काय राहिलंय..तुझी कोणती इच्छा-आकांक्षा मारून
माझ्यावर उपकार केलेस..हा सांग..कुठली मौज..बोल ना..
हां तेच ते. बोलता बोलता ती जरा अडखळली. तिला पटकन काय उत्तर द्यावं सुचेना झालं. हमम अ-स ए-क-द-म आ-ठ-व-त नाही..म्हणजे काही नाहीच असं नाही. आवाज पुन्हा किंचित चढला
तो जोर जोरात हसू लागला. म्हणाला, काही असेल तर आठवेल ना.. थोडी तंगी आहे मान्य. तुला जरा बेअर करावं लागतं. क्रेडिट डेबिटवर जग चालतं.. पण तू मागितलं नाही तरी तुझी सगळी हौस ना मी भागवतो, मी.. काय पाहिजे ते आणून देतो कळलं का? तरी तुझं... साला घरी थांबूच नये..नुसती कटकट. जगणं अवघड होऊन बसलंय..असं म्हणत दार जोरात आपटत तो बाहेर पडला.
***
ती स्वतःवर जोराची चिडली. मला एक हौस सांगता आली नाही. लानत है.
स्साला इच्छा मारली..इच्छा दाबली म्हणता म्हणता त्या खरंच मरून गेल्या..कधी? खरोखर एक ही आशा अपेक्षा माझ्याकडे आता उरली नाही का? रंगबेरंगी आकांक्षांचा फुगा माझ्या हातून कधीचाच निसटून गेलाय का? तो पुरवत असेल ही पण ते सारं मला हवं आहे का? मग मला म्हणून हवं असण्याची उर्मीच नष्ट झालीये का? एक-एक-एक इच्छा सांगता नाही आली... एक-एक-एक मौज... असं कसं? एक तरी मुरड घातलेली इच्छा आठवायलाच हवी..की खरंच नाही हौसमौज उरलेली काही. आपण संतत्व गाठलं की काही गाठणंच नकोसंय..
आतली सिस्टम इतकी पोकळ होत चाललीये? कधी..केव्हापासून मी इतकी रिकामी होत गेले..त्याचा तरी काही थांग लागणार आहे की मनाबरोबर मेंदूलाही चाळणी लागली आहे...!! ऑऽऽह थिस फिलिंग इज सो हॉरिबल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...