गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

स्वप्न!

आयुष्याची चाळीशी आलीये तिची. नोकरीचा एक टप्पा गाठून झालाय. घरसंसाराची घडी बसलीये. सारं काही आपपल्या जागी नीटनेटकं. पण काल ऑफिसमधल्या नवख्या पोरानं सहज म्हणून जे विचारलं तेव्हापासून तिला अस्वस्थता आलीय. अचानक खूप धडधड वाढली. आपली चोरी पकडल्यावर आता कुणीतरी भ्रष्टतेचा आरोप करेल तेव्हा जसं वाटेल तसंच तसंच काहीसं तिला वाटलं. प्रश्न खरं तर खूप साधा होता. ‘आयुष्यात जर तुम्हाला पुन्हा संधी मिळाली तर तुम्ही तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण कराल?’

प्रश्न ऐकला आणि ती गरगरून चाट पडली..तिच्या एकदम लक्षात आलं की...
म्हणजे आयुष्यात आपण जे मिळवलंय ते आपणच मिळवलं असलं तरी ते आपल्याला मिळवायचंच होतं असं नाही. ते मिळाल्यानं सुखावून गेलो त्या त्या क्षणी तरी ते खरंतर आपलं स्वप्न नव्हतं. नोकरी हा उद्देश नव्हता. तो केवळ मार्ग होता मग ते ध्येय कधी झालं आणि स्वप्नं! रररशीत जगण्याचं आणि खुसखुशीत वाढण्याचं स्वप्न..ते कुठं गेलं..हे हे काय घडलंय..आपलं स्वप्नं मेलंय? तेही केव्हाच. ज्याचा अतापता आपल्याला नाही. त्याच्याकडून कुठला सांगावा धाडला गेला नाही कि जाब विचारला गेला नाही. प्रचंड संतापजनक आहे हे..आपलं स्वप्न कधी काळी जिवंत होतं आणि त्यासाठी आपण काहीही करू शकत होतो ही गोष्टच आता खूप खूप मागे पडलीये, पृथ्वीच्या कधी घडलं हे!
सगळी स्वप्नं पूर्ण होत नाहीत मान्य पण ज्या स्वप्नाची पूर्ती दुसर्या संधीत आपण सर्वात आधी करणार आहोत त्याच्या पूर्ततेची पहिली संधी हुकलीये? किती खोल आणि रिकामं रिकामं वाटतंय. जिवंतपणीच स्वप्नाचं आपल्या नकळत मृत्यू व्हावा या त्रासाइतकं भयाण काय असू शकेल. आजवरच्या सगळ्या खस्ता, कष्ट, राग-अपमान या सगळ्याचं मूल्यच शून्य झालंय. ते सगळं सोसूनही त्याची किंमत कवडीमोल झालीय कारण स्वप्न तर मरून गेलंय. हेहेहे असं नको व्हायला हवं होतं. स्वप्नानं साथ सोडून मरून जाऊन काळ लोटल्यावर त्यानं असं प्रश्न होऊन समोर यायला नको होतं. जगण्यातला सगळा प्राणच शोषून घेणाऱ्या या टोचण्या हव्यात कशाला पुन्हा पुन्हा. च्चा मारी! असं आयुष्याचा अर्धा पट उघडा पडल्यावर कुणी विचारू नये कुणाला अपूर्ण इच्छांविषयी आणि मृत स्वप्नाविषयी...बरं चाललेलं आयुष्य बरं उरत नाही मग नंतर आणि बरं चाललं होतं आधी या भोपळ्याशी सामनाही करवत नाही..!

1 टिप्पणी:

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...