सोमवार, ४ जानेवारी, २०२१

स्वत:पुरतं विषय संपवून टाकला.

सख्या,
मागे तूच कधीतरी म्हटलेलंस...
अर्धवट सुटलेले,
अबोल राहून गेलेले,
ना कळलेले-आकळलेले,
अव्यक्त-अर्धबोल,
अस्पर्शीत राहिलेले, धसमुसळ्या स्पर्शाने स्पर्शाची अभिलाषा निर्माण करणारे पण ती अपूर्णच राहिलेले,
आधीची ओढ अपूर्णतेने अधिक वाढवणारे,
पूर्णतेचा ध्यास देणारे किंवा त्याची गरज नाही हे सांगणारे,
अपूर्णतेतही मौज आणणारे किंवा दु:ख देऊन मनाला आनंद देणारे असे क्षण मला फार आवडतात.’
सख्या, तू सांगितलं तेव्हा त्या शब्दांचा अर्थ उलगडला नव्हता आणि आत्ता ते सारं अनुभवल्यासारखं वाटतंय. अपूर्णतेत खूपच मौज आहे. हाताशी काहीतरी आल्यानंतर हातातून पुन्हा ते अलवार निसटून देण्यातसुद्धा एक कैफ आहेे. म्हणजे पहा हं, केवळ तू सांगितलं म्हणून मी नाईंनटी सिक्स (’96) नावाचा तमिळ चित्रपट पाहिला. दहावीच्या वर्गात शिकणारे दोन जीव एकमेकांत गुंतूंन जातात, प्रेमाची कबूली न देता! त्यानंतर मध्ये बरंच पाणी वाहून जातं. दोघांची ताटातूट होते आणि 1996 साली शाळेतून पास झालेल्या बॅचचं गेटटुगेदर ठरतं. इथंच मग तरुण नायक नायिका एकमेकांना पुन्हा भेटतात. प्रेमाची परिणिती सहजीवनात झाली नाही तरीही दोघांच्या ही हृदयाशी शाळेतलं प्रेम उरुन पुरुन राहिलं आहे. त्यांच्या केवळ हालचाली, हावभावांतून प्रेम पाझरत राहतं, इतकं की आपलंही मन सुखावून-दुखावून जातं.
मला हा चित्रपट फार आवडला. पूर्ण अपूर्णतेच्या मधल्या हिंदोळ्यांवर झुलत राहिलेलं त्यांच्यातलं अलवार नातं मनाला फार आवडून गेलं.
आणि मग थोड्यावेळानं का कुणास ठाऊक मनाला टोचणी लागू लागली. हृदय की काय दुखायला लागलं. म्हणजे जामच कसंतरी व्हायला लागलं. पोटातही, मनातही, डोक्यातही. विचित्र-विचित्र. कामधाम नसल्यासारखं मी उगाच खूप वेळ विचार करत राहिले, मी अशी कुणाच्या प्रेमात पडले नाही का? आपण प्रेमात आहोत हेही कळू नये इतका जास्त जीव कुणामध्ये गुंतला तरी आहे का? आयुष्यात भले आज ती व्यक्ती माझ्यासोबत नसेल, पण त्याच्या नसण्याची रुखरुख देणारा किंवा अगदी आपल्यातून तो कधी उणा झालाच नाही असं वाटायला लावणारा आहे का कुणीतरी? हातातल्या रिंगशी खेळत खूप विचार केला. खूप म्हणजे खूपच जास्त. पण यासंदर्भानं कुणीच असं आठवेना. आपला जीव कुणाच्या तरी जीवात अजूनही थोडाफार गुंतून पडलाय असा कुणीही व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही!
माझं आयुष्य इतकं सरधोपट, इतकं सपक, इतकं चारचौघींसारखं आहे? माझं सरळ लग्नच व्हावं... श्शीट यार! किती बोअर. कुठल्याही एक्सायटमेंट, चार्मशिवाय लग्न झालं. होणार्या नवर्याशीच का होईना पण चोरुन-बिरुन भेटण्याची, लपाछपी करत काही मोमेंटस मिळवण्याची, आयुष्यात रंग भरण्याची काही गंमतच केली नाही. आणि आता लग्न होऊन ही त्यात...फरगेट इट. मी एक भली मोठी जांभई दिली.
खरंतर आयुष्यात एखादा असा पुरुष ज्याच्याविषयी कायच्या काय वाटतंय अगदी इन्फिनीटीच्या टर्मसमध्ये कायच्या काय वाटतंय असं कुणीच नाही याची खंत वाटायला हवी होती. म्हणजे मला वाटतच होती. पण त्यानं काय होणार होतं, माती तर खाऊन झाली होती. पुरुषांना स्त्री हवी असते तसं स्त्रीलादेखील पुरुष हवाच असतो की.. उलट मला तर प्रश्नच पडला, शाळा तर जाऊ दे पण कॉलेजात, विद्यापीठात किंवा नोकरीच्या पहिल्या वहिल्या वर्षांत मी कुठं होते? लोकं चार-चार अफेअर करतात आणि मग रीतसर लग्नही. हो ना, तेही नव्याच माणसाशी आणि मी? प्रेमात बुडून जावा असा एखादाही पुरुष आपल्याला आयुष्यात न लाभावा? मला स्वत:चंच फार वाईट वाटत राहिलं. पण त्या वाईट वाटून घेण्याचं तरी मी काय करणार होते? किती वेळ त्या विचारात गढून जाणार होते? स्वत:पुरतं विषय संपवून टाकला. तसाही विषय स्वत:पुरताच होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...