रविवार, ४ एप्रिल, २०२१

चेंज

 ‘मला उबग आलाय घर एके घर करून...’

‘घर एके घर? रोज ऑफिसला तुझं काय भूत जातं का? ’
‘हां राईट! पण मला हे रोज घर-ऑफिस-घर करून कंटाळा आलाय. आय नीड चेंज.’
‘रोजच्या रोज घराबाहेर तर पडतेस. आवडीचं काम करतेस. आता कसला चेंज हवाय? दर रविवारी फिरूनही येतो.’
‘सोसायटीच्या गेटच्या बाहेर पडणं म्हणजे फिरणं असतं का? बरं त्या फिरण्याचा उद्देश ही ठरलेला असणार... भाजी आणायची, दळण टाकायचंय, फळं हवीत, नाहीतर मुलांच्या समाधानासाठी जरा बागेत नेऊन आणायचंय. येताना एखादी कच्छी दाबेली, एखादी भेळ, एखादी पाणी-पुरी गेला बाजार सॅण्डवीच खाल्लं की फिरणं सफल, नाही का? घराबाहेर पडण्याच्या, फिरायला जाण्याच्या या कल्पनांचासुद्धा मला तिटकारा आलाय.’
‘ए, प्लीज पुन्हा सुरू करू नकोस. ’
‘मी काय सुरू केलं. मला काय वाटतं हे तुला सांगायचंही नाही का? मग मी बोलायचं तरी कुणाशी?’
‘बोलू नको म्हणतोय का तुला? पण इतकी मोकळीक देऊनही कटकट काही संपत नाही तुझी. तुझ्या फिरण्याबिरण्यावरही बंधनं घातली का कधी? जा ना कुठं जायचं तिकडं जा. फिर. मजा कर. झालं तर.’
ती उदास हसली. याउपर तिला प्रतिक्रिया देणंच जमणार नव्हतं. गॅलरीतल्या खूर्चीवर येऊन ती शांत बसली. उन्हाळ्यातला पिवळाधम्मक उजेड आकाशात चमचमत होता. गार वाराही सुटला होता. हे म्हणजे तिच्यासाठी सोने पे सुहागा.
कालच नव्याने आणलेल्या दोन फुलझाडांकडे तिनं प्रेमानं पाहिलं. बरं वाटलं तिला.
‘आपणच फुलवलेली गॅलरी एवढाच निसर्ग आपल्या वाट्याला. या फुलांचा, मातीचा सुवास घ्यायचा आणि कुठल्या तरी दूरवरच्या उपवनात असल्याचं मानून घ्यायचं. या नव्या फुलझाडींची नावं देखील ठाऊक नाहीत. बोट दाखवून निवडली. नर्सरीतल्या माळ्यानं सांगितलंही असतं पण म्हंटलं, असू दे, सगळंच काय माहीत करून घ्यायचंय. घर-ऑफिस विसरून, टाईमटेबलच्या बाहेर निघून, इथल्या इथंच निरूद्देश भटकून, मनाची पाटी कोरी करून घ्यायची. वर आणखी ट्रॅव्हलींगच्या खोट्या पावत्या दाखवून एलटीए एनकॅश करायचा. घराची कुठलीतरी सोय करून तेवढ्यातच आनंदून जायचं... आणि पायात चपला अडकवल्या की कुठं चाललीस या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कुणाला? तर मी जरा जाऊन येतो असं बेधडक म्हणणार्या माणसांना.. मस्त मोकीळीके आपल्याला...!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...