गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

तनिष्कच्या निमित्ताने


तनिष्कच्या जाहिरातीतली मुस्लिम सासू हिंदू सूनेचं कौतुक करताना दाखवली तर त्यावरून लवजिहादचा गदारोळ माजवला गेला. दोन वेगवेगळ्या धर्मसंस्कृतीतल्या सासू-सूना एकमेकांचं कौतुक करतायेत यात काहीच आक्षेपार्ह नसताना कमजोर मनाच्या व्यक्तींच्या भावना दुखावल्या. पण  जातव्यवस्थेला सर्वाधिक टिकवून ठेवणार्‍या ‘अरेंज मॅरेज’ प्रकारात कित्येकदा सासू सूनेवर खार खाऊन असते, सतत भांडणं उकरून काढत असते किंवा तिचा अपमान करत असते ते आपल्याला दिसत नाही. दुसर्‍या धर्मातली तर सोडाच पण अगदी आपल्याच धर्मातली, जात-पोटजातीतली अगदी बघून सवरून केलेल्या सूनेबाबत सासूच्या मनात तिरस्कार असतो, तो कशाबद्दल. 

कित्येक घरांत सासूच्या मनात सूनेविषयी एक विचित्र प्रकारची अढी दिसते, आकस दिसतो, बरं त्याला ठोस असं काहीही कारण नसतं. मुलगा सूनेचं ऐकतो असं एखादं पालपूद लावलं जातं, सूनही तर आपल्या मुलाचं ऐकत असते हे मात्र सरळ डोळ्यांआड केलं जातं.. अशा कुठल्याच गोष्टींनी आपल्याला त्रास होत नाही. परधर्मातले आपल्या धर्मातल्या मुलींना मात्र त्रास देतात, कन्व्हर्ट व्हायला लावतात, जबरदस्तीनं तिचं जगणं-वागणं बदलतात अशा कागाळ्या मात्र आपण करायला कायम तत्पर असतो, नै!

अरेंज मॅरेजमध्ये सासू बिनबुडाच्या आधारे सूनेचा द्वेष करत राहते या वागण्यानं मला कायमच बुचकळ्यात टाकलंय. मुलाचे लव्ह मॅरेज असले आणि सासू अशा तर्‍हेनं नाराजी व्यक्त करत असेल (तेही समर्थनीय नाहीच) तर एक वेळ सासूच्या नाराजीला (तिच्यापुरता) आधार तरी असतो. पण जिथं सासू-सासरे स्वत: मुलीचा शोध घेऊन, मुलाकडून पसंंती मिळवून सून घरी आणतात तिथंच ब्लेमगेमचा प्रकार प्रचंड दिसतो. अगदी पहिल्या दिवसापासून आमच्याकडं असं नसतं, आम्ही हे खात नाही, आम्ही असं बनवत नाही इथंपासूनच सूनेला उपरेपणची जाणिव दिली जाते, ती कशासाठी? सूनेच्या कुठल्याच गोष्टीवर आनंदित होणार नाहीत, सूनेनं केलेला कोणताही पदार्थ आवडणार नाही, तिच्या चॉईसनुसार काही बदल झाले तर ते किती खर्चिक आणि कामाचे नाहीत असा तोरा असतो. मुलाला कुठल्याही तर्‍हेची शिस्त लावायला गेली तर मुलाला जमणार नाही म्हणून याच फणा काढतात. आर्थिक शिस्त लावण्याचा प्रकार केला किंवा ती स्वतंत्रपणे कमवू लागली तर मुलाचे हालहाल करते अशी ओरड करणार. तिने थोडं कमीजास्त खर्च केला की ती उधळी आहे. यातली कुठलीच गोष्ट खरंच सूनेचं वागणं चूकीचं, स्वभाव वाईट आहे म्हणून नसतं तर त्यांना अगदी पहिल्यादिवसापासूनच तिच्यात कोण जाणे काय खटकत असतं. सासू तर सासू, नणंदानांही आपल्या भावजयीच्या उकाळ्यापाकाळ्या काढायला फार आवडत असते. सासू-नणंदाचा फेवरेट टॉपिक घरातली सून असते. 

यात गमंत तेव्हा वाटते जेव्हा त्यांच्या वागणूकीत मुलगा हवा पण सून नको अशी काहीतरी विचित्र तर्‍हा दिसू लागते. बरं, मुलाशी तिचं नातं तोडायचं का तर तोडायचं ही नाहीये पण त्यांना सुखासूखी जगूही द्यायचं नाहीये अशी तर्‍हा असते. मुलानं लग्न करावं म्हणून कित्येक वर्ष त्याच्या मागे लागून झाल्यावर फायनली घरात सून आल्यानंतर तिच्याविषयी मायाममत्व वाटण्याऐवजी ती आटते कशी हे मला कधीही कळलं नाही. यातूनच मग मुलाचे सूनेविरूद्ध कान भरण्याचे प्रकार घडतात. काही वेळा मुलांचं यात सॅण्डविच होतं. धड आईचं ऐकता येत नाही धड बायकोची बाजू घेता येत नाही. मग ते सरळ दुर्लक्ष करतात पण त्याचा परिणाम आई मुलाच्या नात्यापेक्षा पती-पत्नीच्या नात्यावर अधिक होतो. आपलीच मुले (मुलगा-सून) दुर्मुखल्या चेहर्‍यांनी घरात वावरतात यात वयस्क मंडळींना कुठला आनंद मिळतो. 

एकुणात काय, परधर्मातली सासू-सून असली काय आणि एकाच जातीतल्या असल्या काय..मला वाटतं एकमेकींना समजून घेण्याचा अवकाश दोन्हीही स्थितीत सारखाच असणार..असायला हवा! एकाच जातीतले असले तरीही प्रत्येक घराची म्हणून आपलीच एक संस्कृती असते...आपलेच एक संस्कार असतात. इतकी साधी गोष्ट आपल्या डोक्यात का शिरत नसते. एकाच खानदानातल्या भावा-भावांच्या घरीसुद्धा रीतभातात फरक असतो, मुलांवरच्या संस्कारात आणि मुलांच्या आपपल्या आलेल्या अक्कलेत फरक असतो. अशा स्थितीत त्या वेगळ्या संस्कार-संस्कृतीचा मिलाफ अन्य एका संस्कार-संस्कृतीत करण्यासाठी सूनेला/जावयाला थोडा काळ तर लागणारच असतो की..आणि तेवढं उमगलं की मग हे द्वेष करणं, चूका काढणं आणि आपण आणि आपलं घर श्रेष्ठ- असा झेंडा मिरवणं हे कदाचित कमी होईल..(उम्मीद पे दुनिया कायम)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...