मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

टोचणी

 सणासुदीचा दिवस होता. कुठलाही सण आला किंवा पाहुणे येणार म्हंटलं की त्याचा जीव घाबराघुबरा व्हायचा. मनाभोवती कमालीची अस्वस्थता ठाण मांडून बसायची. त्यामुळं तो मुद्दामच उशीरा उठला. तिची मात्र सकाळपासून लगबग सुरू होती. हातापायाला चाकं लागल्यासारखी घरभर भिरभिर सुरू होती. घरात आधीच पाच माणसं असताना आणखी सातेक पाहुण्यांची भर पडली. स्वयंपाकघरातल्या मसाले, वाटण, तर्री, रस्सा, पुर्या, पोळ्या, फुलके, आंबटतिखट, चटण्याचुटण्यांमध्ये तीदेखील मीठासारखी विरघळून गेली. घराची साफसफाई मात्र हट्टानं त्यानं त्याच्याजवळ ठेवली. पाहुणे यायच्या आधी तिनं आवरून-सवरून घेतलं. गालांना प्रसरणाचा आदेश दिला..त्यानंतर गाल अजिबात आकुंचित झाले नाही. त्यानं काय नाय अंगात होती तीच टीशर्ट-थ्रीफोर्थ झटकून घेतली. घरभर पाहुण्यांचा ‘अतिथीवास’ दरवळत राहिला. ती त्याही वासात हसून हसून सामील झाली. त्यांची उठबस करत राहिली. तिच्या रांधलेल्या स्वयंपाकावर त्यांना ताव मारताना पाहून खूश होत राहिली. तृप्त होऊन उधळलेली स्तुतीसुमनं ती स्मितहास्यानं झेलत राहिली. मग कुणी जरा वाढीव कौतुक करायला लागलं, त्यात इतरांनीही सूर मिसळला तेही ती आनंदानं ऐकू लागली..‘किती गुणाची’, ‘काय स्वयंपाक आहे..आहाहा’, ‘फार चांगली सून मिळाली गं.’,‘इतकी गं कशी तू सुगरण’, ‘घर, मुले, सासू एकहाती सांभाळतेस, ’, ‘तुझा इतका गोड स्वभाव आहे ना..सारखं यावंसं वाटतं.’, ‘माझं लेकरू किती काम करतं नै..’ या आणि अशा कौतुकानं ती फुलत फुलत राहिली...! पाहुणे गेल्यानंतरही असंच फुलून उन्मलून इकडं तिकडं बघता बघता तिनं त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या चेहर्यावर मात्र कौतुकाची रेघ नव्हती. माथ्यावर आठ्या मात्र होत्या. निराशेनं ग्रासलेला आंबट चेहरा होता.

‘कधी कुणी पाहुणे आले..त्यांनी कौतुक केलं की तुला लगेच टोचतं ते.’
आधी तो शांत राहिला मग ती पुन्हा म्हणाली, ‘जळका आहे जळका. माझं कुणी जरा नाव घेतलं की तुझ्या पोटात दुखतंच..’
‘हो होते माझी जळजळ. दुखतं माझं पोट. जा आता मूड स्पॉईल नको करू.’
तणतणत ती छोटीला घेऊन मोठ्याशी बोलत सासूजवळ बसली.
----
तसा तो आतल्या खोलीत धूसफुसायला लागला, ‘तुझ्या सांसरिक कौशल्यांसाठी कुणी तुझं कौतुक केलं की मला गिल्ट येतो. त्या कौतुकानं तू खुलली की अधिक त्रास होतो. तुझ्या करिअरचा मी बट्ट्याबोळ केला याची टोचणी लागते. तुझ्या ज्या क्षमतांचं आणि कुवतीचं कौतुक व्हायला हवं त्या बोथट होतायेत का हा विचार पोखरत राहतो..तुझ्या करिअरला मूळापासून उखडून आणलं तेव्हा नव्या मातीत ते सोबतीनं रुजवायचंं डील होतं. आणि मी गर्भ रुजवून मोकळा झालो..आंधळा होतो तेव्हा आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा तू हरवून गेलीस..तुझ्या अशा आनंदात सामील व्हायला लागलो की अपराधी आणि स्वार्थी वाटायला लागतं आणि टाळायला लागलो की स्वकेंद्री आणि दोषी..’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...