बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

गंडवणे

 आज खूप दमलो. खूप काम झालं. तो बॅग सोफ्याजवळ ठेवत म्हणाला.

‘का रे. आज उशीर ही केलास.’
‘अगं हो, ऑफिसमधल्या एका कलिगची मिटींग मला करावी लागली अर्जंट. तिला म्हणे खूप त्रास होत होता. ऑफिसमधूनही मग लवकरच गेली.’ तो ही उभ्या उभ्या शर्टाचं बटण काढत म्हणाला.
‘ओह’ इतकंच म्हणून ती गप्प झाली..आजारी असेल असा विचार करून तिनं फार काही उत्सुकता दाखवली नाही. तसा तोच म्हणाला, ‘बायकांचा नेहमीचा प्रोब्लेम..पोटात खूप दुखत होतं तिच्या..कंबरही..म्हणजे तसं ती म्हणत होती. पायदेखील दुखतायेत म्हणून अक्षरक्ष: मांडी घालून बसली. चेहरा अगदी केविलवाणा झालता. ’
ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती. त्यानेही भूवई उंचवून काय म्हंटलं. ‘तुला कुठल्या तरी बाईविषयी कन्सर्न वाटतोय हे चांगलंचंय पण तुझ्या आत्ताच्या कन्सर्नचा छोटसा तुकडा कधी घरातल्या पोटा-पायाच्या जीवाला मिळाला नाही..’
‘अं..म्हणजे कोण तू? तुझं कुठं काय दुखतं..आणि तशा त्या नाजूक साजूक मुली. तू चांगली दणकट.’ असं उडवाउडवीच बोलून तो बाथरूममध्ये तोंड हातपाय धुवायला लागला.
तिनं रागानं एक उसासा सोडला. गरम पाण्याची पिशवी घेऊन कंबर शेकत बडबडू लागली.
काय तर ह्याचं लॉजिक..! लॉजिक नाही तिथं लॉजिक शब्द वापरणंच चूक...
हट् असं कधीच होत नाही, कुण्या स्त्रीच्या पोटात दुखल्यानं ती नाजूक होत नाही आणि कुणी ते दुर्लक्षल्यानं दणकट...! किती दिवस स्वत:ला गंडवणार कुणास ठाऊक...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...