मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

गोष्टीमधील लॉजिक

एखादी गोष्ट सांगताना एखादा नवा शब्द आला की त्याचा अर्थ मुलांनी विचारणं स्वाभाविक आहे. पण आता आमच्या घरी एखाद्या घटनेची, प्रसंगांची चिरफाडही व्हायला सुरवात झाली आहे. म्हणजे आधीही हे असं का? तसं का? असे प्रश्न असायचेच पण आता ज्या घटनेवर अख्खं कथानक उभं असतं आम्ही त्या घटनेतलंच लॉजिक शोधायला घेतो. म्हणजे कसं? तर ते असं..

जंगलबुकमधील गोष्ट. जंगलात प्राण्यांबरोबर वाढणार्या मोगलीची. गोष्ट वाचायला सुरवात केलीच नव्हती की प्रश्न आला, पण ते इतकं छोटंसं बाळ जंगलात कसं आलं? त्याला तिथंच सोडून आई कुठं गेली? ती बाळाला घेऊन का नाही गेली? जंगलात प्राणी असतात तर तिथं बाळ कसं काय कोणी सोडू शकतं..
अगली डकलिंगची गोष्ट. तीन बदकं आणि एक हंस असणारी..तीन अंड्यातून एकसारखी बदकांची पिलं निघाली तर ते चौथं पिलू जे खरंतर हंस आहे मग त्याचं अंड बदकाच्या घरट्यात कसं? बदकाला माहित नाही का की तिची तीनच अंडी होती. तिला मोजता येत नाही? ती उबवायला बसली असेल तेव्हा तर कुणीही आणून ठेवू शकत नाही..आणि हंस अंड ठेवेल तेव्हा बदकाला दिसणार नाही?
याच गोष्टीत ते चौथं कुरूप पिलू भटकत एका घरात जातं जिथं मांजर आणि कोंबडी असते. मांजर त्याला विचारतं की तुला म्याव करता येतं का आणि कोंबडी विचारते अंडी घालता येते का? नाही तर मग तुझ्याशी मैत्री करणार नाही..यावर ही पण कोंबडीला काय म्यॉव करता येतं का आणि मांजरीला अंडं घालता? ते दोघं मैत्री करू शकतात तर मग त्या पिलाशी मैत्री करायला काय जातंय ह्यांचं..
एक तर एक तर लहान मुलांच्या पुस्तकात मस्त विनोदी व्यंगचित्र होतं. ‘अब मम्मी को कैसे बताये की हमे बडा-सा मास्क क्यों चाहिए..ताकि एक दिन भाई की क्लास में बैठेंगे एक दिन बहन के क्लास में’असं कसं, त्यांच्या वर्गात हजेरी घेत नाहीत, मुलं किती आहेत मोजत नाहीत. ऑनलाईन क्लासमध्ये तर एकाच स्क्रीनवर दोघं दिसतील आणि वेगळ्या मोबाईलवरून केलं तरी ते समजेल..व्यंगचित्राचा पोपट झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...