बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

आय अ‍ॅम स्टिल इन हायद्राबाद

जीमेलचं अकाऊंट गुलाबी रंगाच्या पट्टीत रोज रोज स्नेहाला सांगत होतं, ‘यु आर आऊट ऑफ स्टोरेज.. फ्रीअप स्पेस ऑर पर्चेस अ‍ॅडीशनल स्पेस.’ ती माध्यमात काम करत होती. त्यामुळं बर्‍याच संस्थांच्या, संघटनांच्या पीआरओंच्या मेल्सची गर्दी अकाऊंटमध्ये झालेली होती. राजकीय बीट नसतानाही, सगळ्या पक्षांचे खाऊवाटप ते खड्डे बुजवणे तत्सम मेल्स तिलादेखील यायचे. अधूनमधून वाचकांचे मेल्स. कामाचे, महत्त्वाचे म्हणून तिनं स्वत: स्टार करून ठेवलेले ढीगभर मेल्सही होतेच. 15 जीबीची स्पेस अश्शी भरून गेली. मग काय, जूनीच जागा आता नव्याने निर्माण करण्याचा अवघड कार्यक्रम तिला हाती घ्यायचा होता. आज उद्या करता करता तिनं अखेर मुहूर्त लावला. अकाऊंट सुरू केलं तेव्हापासूनचे मेल्स ती चेक करत सुटली. सुरूवातीच्या दिवसांतले फॉरवर्डेड मेसेज, वॉलपेपर्स, फोटोमेसेज असे सर्व मेल्स एकेक करत थ्रॅशमध्ये पडत होते. क्लिक-ओपन-कामाचं नाही-डिलीट असं सूत्र आकाराला आलं होतं. शंभर सव्वाशे मेल डिलीट झाले आणि एका मेलवर येऊन ती थबकली. तो स्वप्नीलचा मेल होता. नुसता मेल नव्हे तर संभाषणाचा थ्रेड होता त्यात. आधी त्याचा मेल आला होता, त्यावर तिनं रिप्लाय केलेलं होतं, तू पाठवलेली वर्ड ओपन झाली पण वाचता आली नाही. युनिकोडमध्ये पाठव. 

-ओह! माय बॅड लक..बट वर्ड? फाईन! मी कन्व्हर्ट करून पाठवतो.
-थँक्स!
-अगं, माझ्याकडे प्रोब्लेम आहे.तुला कन्व्हर्ट करून घेता येणार नाही का? 
-नाही! तेवढा वेळ नाही माझ्याकडं. 

यापुढे कुठलाच थ्रेड नव्हता. विषय खुंटला होता. तिनेही पुन्हा तो मेल कधीच ओपन केला नव्हता. ती विसरूनच गेली होती त्याविषयी. तिने तारीख, महिना, वर्ष पाहिलं. दिवसभर ट्रान्सलेशन्स करून करून ती शिणत होती. त्याच नादात वेळ नाही असा काहीतरी रिप्लाय केला ज्याला त्यानं पुन्हा उत्तरच पाठवलं नव्हतं. आत्ता पुन्हा तो मेल पाहून तिला अस्वस्थ वाटायला लागलं. काय लिहीलं असेल याची उत्सुकता दाटून आली. त्यावेळेस जरादेखील कुतूहल वाटलं नसेल आपल्याला? आपण जरा प्रयत्न केला नाही. त्या वर्ड फाईलीत काय लिहीलं असेल..वर्ड फाईल..ना ना..पत्र..पत्रच असणार. त्यानं वर्ड या शब्दावर प्रश्‍नचिन्ह करून पाठवला होताच..ती कामाला लागली. पाच वर्षापूर्वी तिचं एकूण कम्प्युटरच ज्ञान यथातथाच होतं. बहुतेक त्यामुळंच आपण प्रयत्न केला नसावा. हो, पण आपल्या आसपास त्यातली माहिती असणारी लोकं होतीच की. आपण कुठं कुणाला विचारलं. आत्ता त्याचा विचार करून उपयोग नव्हता. तिनं वर्डची फाईल ओपन केली. मजकूर निरनिराळ्या चिन्हांनी व्यापून गेला होता.  फॉन्ट काहीतरी ‘डीव्हीडब्ल्यूबी सुरेख अव्हीड’ अशा नावाचं होतं. गुगलवर फॉन्टचं नाव टाकलं पण तो फॉन्ट आता अस्तित्वातच नव्हता. त्याच्या फॅमिलीतला, त्या फॉन्टमधल्या मजकूराची जरातरी ओळख करून देणारा दुसरा कोणता फॉन्ट मिळतोय का म्हणून ती कामाला लागली. आधी कन्व्हर्ट करण्यासाठी सर्व कन्व्हर्जन्स तपासून पाहिले पण कशानेच फरक पडला नाही. त्यानंतर बराचवेळ उपद्व्याप करून सात आठ निरनिराळे फॉन्ट शोधून काढले. सगळे डाऊनलोड करून इन्स्टॉल केले. कसाबसा एक फॉन्ट मॅच झाला आणि चिन्हांची संख्या कमी झाली. सगळाच्या सगळा मजकूर स्पष्ट दिसत नव्हताच पण अर्थ लावण्याइतका दिसू लागला होता. शब्दाला शब्द लावून ती वाचायला लागली.

प्रिय मैत्रिणी,
खूप दिवसापासून तुला पत्र लिहावंसं वाटत होतं पण शब्द जुळत नव्हते. खरंतर फेअरवेलच्या दिवशी तुला एक पत्र देणार होतो. पण तुला पाहिलं आणि हरवूनच गेलो. त्या दिवशी तू साडीत खूप सुंदर दिसत होतीस. तुला मनापासून दाद द्यायची होती पण नेमकी तेव्हा सबीना आली. सबीना बस बहाणा है, खरंतर हिम्मत झाली नाही. तुला आठवत असेल तर त्या दिवशी मी देखील अबोली रंगाचा कुर्ता घातला होता. अख्खं शहर पालथं घालून मी त्या रंगाचा कुर्ता शोधला होता. मला तुझ्याशी मॅच व्हायचं होतं म्हणून. तुला मात्र ते आवडलं नव्हतं बहुदा. आपण बॅण्डवाले वाटत राहू, तू लांबच उभा रहा असा दम भरून तू सबिनाला घेऊन बाजूला झालीस. सबिनानेदेखील अबोली रंगाची साडी नेसली होती पण तू तर तिला अगदी खेटून उभी होतीस. तेव्हा तुला या बॅण्ड पार्टीचा साक्षात्कार झाला नव्हता का? अंहं, भांडत नाहीये, फक्त मुद्दा लक्षात आणून देत होतो. त्यावेळेस तुझं बोलणं मला फार लागलं होतं, सरळ निघून जावंसं वाटत होतं पण तू नेमकी गेटच्या वाटेवर उभी होती. मग काय दुखावल्याचं न दाखवता तुझ्यापासून लांब उभा राहून तुला पाहत राहिलो. एकतर आपला फेअरवेलचा दिवस होता. दुसर्‍या दिवसापासून तू दिसणार नव्हतीस. मी परत अमरावतीला जाणार होतो. तुला खूप खूप मिस करणार होतो. तुला हे सगळं सांगायचंही होतं पण हिम्मत झाली नाही. आणि हो, तू सगळ्यांना काही ना काही गिफ्ट दिलंस मला मात्र म्हणाली, ओ बॅण्डवाले तुला फक्त ढेंगा. आधी वाटलं तू गम्मत करत आहेस. नंतर लक्षात आलं तू मला ढेंगा दाखवून आय मिन न सांगून निघून गेली होतीस. सहा महिने झाले फेअरवेल होऊन, माझं पत्र तेव्हापासून तुझी वाट पाहतंय. तुझा पत्ता होता. पोस्ट करायला गेलो पण म्हंटलं भलत्याच कुणाच्या हातात पडलं तर.. मी तसाच माघारी फिरलो.
मी आता हे तुला का सांगतोय..मला तुला सांगावंसं वाटतंय म्हणून. मी ठरवलं होतं की मी तुझा अजिबात विचार करणार नाही. तुझ्यापासून दूर निघून जाईन. पण मला जमतंच नाहीये. नकळतपणे तुझ्या आठवणी जाग्या होता. स्नेह, तुला लिहीलेलं पत्र तुला प्रत्यक्ष वाचून दाखवायचं आहे. भेटशील? मी पुढच्या आठवड्यात हायद्राबादला येणार आहे. 

स्नेह, मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुला..की मी खूप आढेवेढे घेतोय..बरं स्पष्ट सांगू का? सगळं सांगतो, प्लीऽऽऽज भेट..आय मिस यू अलॉट.. माझे इन्स्टींक्ट सांगतायेत की तू देखील मिस..आणि...करतेस.
तुझाच.

मेल वाचण्याआधी तिची वाढलेली उलघाल हळूहळू शांत झाली. खरंतर मेल वाचून झाल्यावर तिला बेचैन वाटायला हवं होतं. त्या पत्राचा रोख कळू नये इतकी लहान ती नक्कीच नव्हती. स्वप्नीलची इमॅच्युरिटी, बालीशपणा त्या पत्रातल्या भाषेत असला तरी फिलींग.. पत्र तेव्हाच वाचलं नाही याचा तिला त्रास व्हायला हवा होता. स्वत:चा वैताग वाटणं अपेक्षित होतं पण त्यातलं काहीच झालं नव्हतं. ती उलट अधिक शांत झाली होती. तिचे निळे डोळे मोत्यासारखे चमकू लागले होते. तिनं मेलची विंडो मिनीमाईज केली. बेसीनपाशी जाऊन तोंड धुवून घेतलं. कपाटातली एक फाईल काढून त्यातनं एक कागद बाहेर काढला. कागद नव्हे आंतरदेशीय पत्र. तिनं ज्या पत्त्यावर पाठवलं होतं तिथून ते पुन्हा आलं होतं. पत्ता अमरावतीचा होता.

प्रिय सख्या,
अबोली रंगाचा कुर्ता तुला फार छान दिसत होता. सबीनाला तू आवडतोस, हे तुला माहितीये का? असायला हवं माहित. ती सतत तुझ्याविषयी बोलते. तू तिच्याशी किती बोलतो पण मनातलं बोललास का? त्या दिवशी मी तुला बॅण्डवाला म्हणाले खरं, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तू आणि सबीनाने एकसारखा रंग घातल्यानं माझी चीडचीड झाली. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय. मी त्या दिवशी हॉलच्या बाहेर तुझी वाट पाहत राहिले तुला सांगितलं नव्हतं की मी बाहेर आहे, तरी आपली वाट पाहत होते पण तू आतमध्येच तुझ्या सो कॉल्ड मित्र मैत्रिणीत रमलास. माझी फार जळजळ झाली..तुला कळतंय का मी काय म्हणतेय. नाहीच कळणार. सबीना चांगली मुलगी आहे. तिला तू आवडतोस. ती कधी तुला तसं सांगणार नाही. म्हणून मी सांगतेय. तू तिचं मन ओळखशील तर बरं होईल. तुला मिस करतेय रे. तुझी फार आठवण येतेय. तुला त्या दिवशी गिफ्ट दिलं नाही कारण तुला मी माझ्या मनातलं सांगणार होते..पण सबीना..तिचा विचार मनात आला आणि गप्प राहिले..तुला हे पत्र मिळाल्यावर तू मोकळा आहेस तुझा निर्णय घ्यायला. मी खूप कॉम्प्लीकेटेड बोलत आहे, असं तुला वाटत असेल पण तसं अजिबात नाहीये. 
ता.क. काही नाही. पत्र नीट वाच.
तुझी स्नेह!

तिनं लिहीलेलं ते पत्र. वाचल्यावाचल्या फार विचार न करता तिनं फाडून टाकलं. मेलवरच्या डिलीटवरही तिनं क्लिक केलं. जीमेलवर जराशी जागा झाली होती. स्वप्नीलचा मेल अजूनही थ्रॅशमध्ये होता. मनात अजूनही रितेपण होतंच. तिने त्याच मेलला रिप्लाय केला...आय अ‍ॅम स्टिल इन हायद्राबाद! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...