शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

स्पॅम

सोसायटीच्या गच्चीवर बसून त्याने फार मनापासून पत्र लिहीले होते. 
" प्रिय, भूतकाळात तुझ्यासोबत घालवलेेले क्षण आठवले की आजही कासावीस व्हायला होतं.." हे वाक्य तर त्याने दर पाच ओळींनंतर  लिहीलं होतं. 
तुझ बोलणं, तुझ्या गप्पा नुसत्या  ऐकत रहाव्यात असं वाटायचं. आता का नाही बोलणं होत  ? तुला सांगू  मलाही कित्येकदा वाटतं  खूप बोलावं तुझा हात हातात घेऊन खूप गप्पा माराव्यात, कधी तुझ्या बोटांत बोटं गुंफून बराच वेळ निवांत न बोलता बसून रहावं. मनात दडपून टाकलेली अनेकोनेक  गुपितं, संघर्ष, वाट्याला आलेल्या माणसांच्या तऱ्हा  आणि त्यातून बनत गेलेलं माझं रुक्ष व्यक्तित्त्व. तुला हे सारं सांगता सांगता तुझ्यापुढे पुर्णपणे नग्न व्हायच आहे. अस्सल! मी जसा हळवा, रडका आहे तसच समोर यायचं आहे आणि माझ्यात लपवून टाकलेली जिंदादिली तुझ्यापुढं आहे तसं मांडायचं आहे. पण तू समोर आली की जमतंच नाही. 
हे सार त्यानं मोठ्या टायपात लिहीलं होतं.
तिची काय अशी जादूगरी होती  की ती बोल ना बोल ना म्हणत राहिली तरी तो गोठून जायचा. मनात कितीतरी शब्दांची जुळवाजूळव करायचा पण ते ओठांवर येतच नाहीत म्हणून तो सांगत होता दुखावून...पुन्हा पुन्हा..
मग हळूच त्यानं कबूली दिली त्याच्या मनात तिच्याविषयी असणाऱ्या प्रेमाची. पहिल्यांदा जेव्हा हिंमत केली त्यानंतर तो अधुनमधून तिला अशी कबूली द्यायचाच. जणू त्याला ते तिच्या स्मरणात राहणं फारच गरजेचं आहे, असं वाटायचं..
मग मध्येच त्यानं बासरीविषयी लिहीलं होतं. "वरच्या फ्लॅटमध्ये एक नवं जोडपं रहायला आलं आहे. त्या जोडप्यातील ती बासरी वाजवते. तेच सूर आताही कानावर पडत आहेत. तूझी आठवण तीव्र होत आहे. काय कनेक्शन असेल ? तुझं बासरीविषयीच मत  मला ठाऊक नाही. मला त्यातलं फार कळत ही नाही. तरीही हे सूर मला तुझ्यापाशी घेऊन जातात. राग नसशील मानणार तर एक सांगू,  मनात येतं की असे सूर ऐकता ऐकता  तुझ्याशी एकरूप होऊन जावं. तुझ्या केसांची वेणी अलवार सोडवत न्यावी आणि तुझ्या पोटावर बासरी अनुभवावी.' त्यापुढंच्या दोन ओळींवर काळा रंग होता. अक्षरं त्याखाली ढकलून दिलेली. खरंतर या इलेक्ट्रॉनिक पत्रात तो ते डिलीट करू शकत होता. न जाणे त्यानं मुद्दाम तिथं काळा पॅच का केला होता.
मग त्याखाली होतं.  "तू फार दूर गेलीस गं?' या वाक्यापाशी तर तो लिहीता लिहीता थांबला असेल इतके पुढे टिंबटिंब होते.
त्याला वाटलं की  दूर जायला एकत्रच कधी होतो असा तिचा सवाल असला तर  त्यानं त्याचंही स्पष्टीकरण देऊन टाकलं होतं. "हं, तसे कधीच सोबत नव्हतो पण ती सोबतीची आस होतीच. माझ्या असण्या-नसण्यावर, येण्या-जाण्यावर तुझंही तर लक्ष असायचं. तू कधी म्हणाली नाहीस पण अशा गोष्टी न सांगताही कळतातच की... पण आता तसं काहीच जाणवत नाही. ना फोन ना भेटी. तू फार बिझी करून घेतलंयंस स्वत:ला. ऑफिसच्या एकाच इमारतीत असूनही दोन बेटांवर राहत असल्यासारखी दूर...मिस यू अलोट..'
शेवटी त्यानं पुन्हा तेच  लिहीलं होतं. भूतकाळात  तुझ्यासोबत घालवलेेले क्षण आठवले की आजही कासावीस व्हायला होतं. तुला सांगितलं नाही तरी तेव्हाही  माझी तुझ्यात गुंतवणूक होती. चौथ्यांदा मेल लिहीतोय, किमान काही तरी उत्तर दे, इतकी का दूर गेलीयेस तू..खरंतर प्रत्यक्षात भेटून खूप खूप बोलायचंयं.. भेटशील?
पत्राखाली त्यानं "तुझा मित्रच' असं म्हटलं होतं. तुझाला अधोरेखित आणि च या अक्षराला अवतरणचिन्ह केलं होतं.
..............
बऱ्याच वेळापासून काही न खाल्ल्याचं लक्षात येऊन तिनं सफरचंदाचे काप केले. त्याची मेलबॉक्सात पडलेली मेल तिला आठवली. सफरचंद खाता खाता तिने त्याची मेल हि चावून वाचली. मेल वाचून झालं तरी ती शून्यपणे सफरचंद खातच राहिली. एक दोनदा तिने मेल वर नजर टाकली आणि मग  तिने निर्विकारपणे त्यावर स्पॅम मार्क करून टाकला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...