शनिवार, ७ जुलै, २०१८

पालखी

''मी पाटील इस्टेटजवळ आहे.''
''पुढे गेलास तू. मी अजून वाकडेवाडी पुलावर आहे.''
''पालखी तर बरीच पुढं आलीये. तू काय करत बसलीस? बरं, असू दे आता. ऐक मी इथं पत्रकार कक्षाजवळ असेन. इथं ये. ''
''नको. तू हो पुढं. मी येते मागून.'' 
''नाही. मी थांबणार.'' 
''अरे, पाऊस येईन असं वाटतंय. तू जा.''
''मग ये ना लवकर. उचल भरभर पावलं. सांगायचंय काहीतरी.
............''
...........................

''अरे वाह! ये मला पण नाम लावायचंय असं तुझ्यासारखं. किती मस्त दिसतोयस.''
''थांब, बघू. चालता चालता कुणीतरी दिसेल. हं..ओ, माउली  ओऽऽऽ माउली या आमच्या मॅडमला लावा ना हा नाम.....हं तूही गोड दिसतेयस.''
''तुला माहितीये, एक पंच्याण्णव वर्षाच्या आजी चालत आल्यात. आणि त्यांच्यासोबतच्या जैतून बी तर चाळीस वर्ष येतात नित्याने.''
''हं.''
''काय झालंय? नेहमीसारखा उत्साही नाहीस?''
''मगाशी एक पथक भेटलं. कुणाचं होतं माहितीये, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मुलं. काही झालं तरी आत्महत्या करू नका, मुलं एकाकी होतात. आम्ही जे अनुभवतोय ते कुणा मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते फलक घेऊन निघालेत.''
''ओह..''
''आपण आपले ताण सोडवले पाहिजेत. मला तर साध्या चटक्याचीही भीती वाटते. मग लोकं कसं पेटवून घेतात. फास लावून घेतात. श्शीट यार... मी बोललो ना त्यांच्याशी तर चर्र्‍र झालं. अडनिड्या वयात बाप गेल्यानं त्यातल्या एकाला घराची जबाबदारी घ्यावी लागली. कुणाचं शिक्षण सुटलं. कुणी आपल्या आईला गावी ठेऊन दुसर्‍या गावी काम करतंय...जाऊ दे नकोच ते. क्षणभर मी विचार केला माझे वडिल...''
''ओहो पाणी घे. प्लीज, इतकं मनाला नको लावून घेऊ. इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. तुला माहितीये, मला खात्री आहे तू तर खूप चांगला बाप बनशील. बघ तू..''
........
''..हो, हो. मी जाईन यंदा पालखीला. आळंदीपासूनच कव्हर करेल पालखी. ठेवू फोन.''
हो ना, मला शोधायचंय ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं पथक. त्यांच्या पथकानं हादरून गेलेल्या माझ्या मित्राची, बाप होण्याची गोष्ट सांगायचीय त्यांना. वय वर्ष १ महिन्याचं पिलू पाळण्यात जोरजोरात पायाने खेळत होतं तेव्हा तिच्यासमोरच तो पंख्याला गळफास लावत होता...शांतपणे! सांगायला तर हवंच ना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...