बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

एक्सचेंज

परिसरात दुर्गंधी पसरवणारी कचराकुंडी उखडून तिथं एक छोटेखानी बाग उभी राहिली होती. त्या बागेच्या ट्रॅकवर पहाटेच्या हलक्या हलक्या उजेडात ती रोज चालायला येऊ लागली आणि तो धावायला. तिचं चालता-चालता आणि त्याचं धावता-धावता एका क्षणी नजरानजर व्हायची. जितके राऊंड तितक्यांदा नजरभेट. सुरवातीला अगदी निर्विकार आणि अनोळखी. हळूहळू सस्मित ओळखीची..त्याला धावताना पाहून तिला रोज रोज वाटायचं, त्याच्यासारखं धावावं अन धावतच सुटावं. दूरदूरपर्यंत धावावं. वेडवाकडं, मजा घेत सुसाट सुटावं. कुणी कसंही पाहिलं तरी भान हरपून धावावं. आपला श्‍वास थकून दमून ओरडेल बसं ग बाईतेव्हाच थांबाव...पण ती धावत नव्हती. तिथं कुणीच दुसरी ती धावत नव्हती. धावल्याचा भास होईल अशा चालतच होत्या. अन् तो..त्याला रोज वाटायचं तिच्यासारखं शांत-निवांत चालावं, श्‍वासभरून हवा घेत, विचार करत हळूहळू बेफिकरीनं चालवं. पण तो चालत नव्हता. तिथं कुणीच दुसरा तो चालत नव्हता. चालणार्‍यांचा वेगही धावण्यासारखाच होता. हाय रे खुदा! दोघांच्या मनातली कित्ती दिवसांची आशा धावण्या-चालण्याची..चालण्या-धावण्याची! एका क्षणी अशीच त्याची धावता धावता अन तिची चालता चालता नजरभेट झाली आणि दोघांनी एकमेकांच्या पायांकडे पाहिले. बोलले कोणीच नाही. धावणारा धावत होता, चालणारी चालत. शब्दांची कुठलीच देवाणघेवाण झाली नाही.
दुसर्‍या दिवशी परिसरात दुर्गंधी पसरवणारी कचराकुंडी उखडून जिथं एक छोटेखानी बाग उभी राहिली होती. त्या बागेच्या बाहेरच दोघांनी एकमेकांचे बूट एक्सचेंज केले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...