शनिवार, २ डिसेंबर, २०१७

डीपी

तुझा डीपीवरचा फोटो पाहत होतो. पाय मुडपून बसलीस न् कुठलंस पुस्तक मांडीवर ठेवून वाचतीयेस असा. तू दिसतच नाहीये मुळी. मान खाली असल्याने चेहरा झाकोळलाय. पण एकूण तुझी ती मुद्रा खूपच आकर्षक आहे. मला तो डीपी पाहता पाहता तुझं आकर्षणच वाटलं. 
आणि मग एकदम वाटून गेलं, बरं झालं मी तुला नाकारलं ते. मला नसता झेपला तुझा हा ऑरा. तुझी ग्रेस. तुझा रूबाब.

तुझी लिहीण्यासाठीची धडपड, वाचनासाठीचा आटापिटा, तुझं फिरणं, भटकंती असं काहीच जमवून घेता आलं नसतं. माझ्या सुट्टीच्या दिवशी तू तुझ्या कुठल्यातरी मित्राच्या घरी काय कसल्या चर्चेसाठी जाऊन निवांत बसाव हे तर खपलंच नसतं. फसलं असतं सगळं ते. मी जाम घाबरलो असतो. बायकोनं हे असं वागावं? छ्यॉ...माझी कन्डिश्‍नींगच नाहीये तशी..
त्यामुळे एकदम बरं वाटून गेलं, मी तुला नाकारलं ते. हां म्हणजे मी तुला नाकारलं तेव्हा हा असा काही विचार नव्हता. आत्ता आठवल्यावर लक्षात येतं ती कारणं फारच वरवरची होती. एक तर तू मला दिसायलाच आवडली नव्हती. दिसणं तसं ठाकठीक आहे तुझं. पण तुझा रंग! काळा सावळा. माझ्या डोळ्यात तो चटकन ठसठशीत व्हायचा. आणि दुसरं म्हणजे तुझं सतत मित्रांमध्ये असणं, मित्रांविषयी बोलणं. ही दोन प्रमुख कारणं होती तुला नाही म्हणताना. मी तुला तसा झटक्यात नकार कळवला तसा तूही तितकाच अलगद हातावेगळा केलास. नदीपात्रातल्या जाता-येताच्या वेळी तो नकार विसर्जितही केला असणार बहुदा. म्हणून तर त्यानंतर तू पुन्हा कधी हा विषय काढला नाहीस की राग मानलं नाहीस.
मी मात्र माझ्याच धुंदीत होतो. तुला न-का-र देण्याचा अंहकारही होता. तुझ्यामुळे नकार देण्याची पहिली आणि शेवटची संधी जी मिळाली होती. मी खूश खूश होतो. च्यामारी सुदैव की दुर्दैव कळंना आत्ता. कारण आत्ता तुझा डीपी पाहता पाहता एकदम आकर्षण वाटलं.
हां! नसता झेपला तुझा रूबाब तरी तू असायला हवी होतीस माझ्या घरात, असंही वाटून गेलं. तू आत, लॅपटॉप घेऊन तंद्री लावून बसली असती आणि बाहेर दूध ऊतू गेलं असतं तर एवढं काय बिघडणारं नव्हतं..! तू पुस्तक वाचता वाचता हळूच माझ्याकडे डोकावून पाहिलं असतं तर तुझ्या त्या नजरेनं मी किती वेडावलो असतो...! मग कुठल्या कुठल्या विषयांवर तुझ्याशी चर्चा करता आल्या असत्या आणि...आणि गेली असतीस सुट्टीच्या दिवशी मित्राबित्राच्या घरी तर जळून कोळसा झाला असता तरी तू परत माझ्याकडेच येणार या विचारानेही कसला सुखावलो असतो.
एनीवे, तुला सांगितलं नाही ना मी कधी, तसं सांगणारही नाही की तू लिहीलेलं सारं काही मी वाचतो. कुठंही छापून आलेलं. अगदी फेसबुकवरची तुझी एखादी ओळ सुद्धा. फक्त गुपचूप वाचतो. गुपचूप वाचावं असं काही तू लिहीत नाही पण मी तू लिहीलेलं वाचतो हे मला कुण्णाकुणाला कळू द्यायचं नसतं. हे असंही का तर ठाऊक नाही. किंवा गंड असेल मला कसला तरी. लोकं तुझं कौतुक किंवा टीका करत असले तरी मी अगदी तटस्थ राहतो. जणू मला तूच माहित नाहीस. मला उगीच बरं वाटतं त्यामुळे आणि पुन्हा जाणवून जातं बरं झालं मी तुला नाकारलं ते. तसंही तुझ्या कौतुकाच्या आलापात मला काही सूर मिसळता नसता आला.
आपल्या सखीसोबतीणीचा असा रूबाब सांभाळायलाही यावं लागतं गं. त्यासाठी एकतर तसं कन्डिश्‍नींग हवं, किंवा भाबडेपणा तरी हवा किंवा तुम्ही अगदी सच्चा दिलवाला प्रेमी.. हं , तर त्यामुळेच बरं झालं मी तुला नाकारलं ते.
बरं! ऐक तुझा डीपी खरंच खास आहे हा. पुढच्या वेळेस समोर बघशील असा फोटो ठेव आणि हो, आता तू मला अजिबात अरूप वाटत नाहीस हां, काळा सावळा रंग तर दिसतच नाही. कसं काय ते कळंना...अं..आकर्षण?

आकर्षणाशिवाय प्रेम होत नसतं रे, टवळ्यातूच एका कथेत लिहीलेलं सहज आठवलं आत्ता!
बरं ते जाऊ दे! डीपीचं लक्षात ठेव तेवढं, बघू नंतर आकर्षणाचं आणि.....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...