सोमवार, २ जानेवारी, २०१७

वजन


जवळ जवळ सात-आठ महिन्यांनी दोघं भेटत होते. दोन शहरांच अंतर आणि कामाची व्यस्तता बाजूला सारत आजचा मुहुर्त त्यांनी साधला होता. हॉटेल, कॅफेसारख्या जागेला फाटा देत त्यांनी मस्त चालत भटकंती केली. बसस्टॉपपासूनच ते दिशाहीन चालत होते. वाटेत मध्ये इडली-वडावर तावही मारले मग एके ठिकाणी लिंबूसरबत घेतले. मग चालून दमल्यावर बसायचं कुठं हा शहराला भेडसावणारा प्रश्‍न त्यांनाही पडला. तितक्यात त्यांना मॉल दिसला. ते त्या मॉलमध्ये शिरले आणि तिथल्या कॅफेत शिरण्याऐवजी बाहेरच्याच एका बाकड्यावर बसले.
तो - बोला आता...कसं सुरूय सगळं.
ती त्याच्याकडे पाहता पाहता, एकदम काहीतरी आठवल्यासारखं ओरडली- माझ्यात काही बदल दिसतोय. (तिच्या चेहर्यावर असे भाव होते की सांगितलं नाही तर खैर नाही. तसा तो जरा गडबडलाच...)
तो(स्मार्टपणे)- आज जरा जास्तच छान दिसतेय...खासकरून डोळे. तुझे कोरीव डोळे काजळामुळं अधिक सुंदर दिसतायेत. ऍण्ड आय थिंक तू आय लायनरही लावलयंस.
ती- आय लायनर कुठं दिसतंय तुला? डोळेभरून नुसतं काजळ लावलंय. जे माहितीये तेच काय सांगतोयस. आय नो आय ऍम गुड आणि बदल विचारतेय ना! बदल सांग. (ती भुवया उंचावून उत्तर मिळेल या अपेक्षेनं पाहत राहिली.)
तो (हार मानत )- तुच सांग ना...
ती (खालावलेल्या आवाजात)- मी जरा जाड झालेय ना... थोडं वजन वाढलंय असं नाही वाटत तुला.
तो (खुशीत येत)- आणि हे मी तुला सांगावं असं वाटतं का? असं काही बोललो तर मुलींना असं सांगायचं नसतं यावर मला तासभर तुझं लेक्चर ऐकावं लागेल.
ती- हां म्हणजे असं नसतंच सांगायचं. मी जाड झालेय असं तू म्हणाला असता तर मी तुला ऐकवलंच असतं. (मग थोडासा आवाज चढवून) पण तू नाही सांगितलं तर मला कसं कळणार माझ्यात बदल झालाय की नाही मग मी तो बदल मनावर घ्यायचा की नाही. तू वजनाविषयी बोलला की मी कमी करण्याचा विचार करणार.
तो- पण तुला तसं वाटतंय तर घे ना मनावर. मी सांगण्याची वाट का पाहायची?
ती- म्हणजे तुलाही वाटतं  मी जाड झालेय?
तो- (तिच्या चेहर्यावरचे भाव ओळखून) अरे यार, तूच म्हणतेयसं ना,तू जाड झालीस. मी कुठं काय म्हणतोय? कमाल आहे तुझी.
ती- हां मग ठीक आहे. तू तसं म्हणूही शकत नाहीस..म्हणायचंही नसतं.
तो- मी कशाला म्हणेन? उलट मला तर वजनदार मुलीच अवडतात.
ती- व्हॉट डू यू मिन बाय दॅट?
त्यानं प्रतिक्रियेत आधी फक्त जीभ चावली. मग म्हणाला- अगं म्हणजे मुलींनी हेल्थी असावं असं म्हणतोय. इतकंच. बाकी का-ही-ही ना-ही गं, बाई...
ती- अस्सं.
तो- पण तुला का वाटतंय वजन वाढल्याचं. मला तर काही वजन वाढल्यासारखं वाटत नाहीये. एखाद किलो इकडं तिकडं असेल पण आहे तशीच दिसतेय.
ती- नाही रे, दोन मजली चढतानाही दमछाक होतेय, खाली वाकताना पोट मध्ये येतंय, गाल वर येऊन डोळे खोबणीत गेलेत असं वाटतंय...हे तर सोड उगीच पाळीचा त्रास सुरू झाला तर...नाहीतर थायरॉईडचा त्रास उद्भवला तर अशा शंका पण येतात.
तो- चिल! कुठून कुठं...! तुला वाटतंय ना त्रास होतोय किंवा होईल मग मस्त फिरायला जा, व्यायाम कर. एवढी चिंता करायचं काय कारणं.
ती- एकूणात काय, तुला म्हणायचंय मी जाड झालेय आणि जाड झालेल्या माणसानं व्यायाम करायला हवं.
तो गप्पच. एका क्षणाच्या पॉजनंतर वैतागून म्हणाला- प्लीज डोन्ट आस्क मी एनिथिंग ना.... आय लाईक यू हाऊ यू आर. बाकी सगळं विसर बरं.
नाही ना विसरता येतं. तुझं सुटलेलं पोट दिसत राहतं, निरनिराळे वजनवाढीचे आजार आठवतात. आणि मुख्य म्हणजे तुला मिठी मारताना ते फुग्यासारखं मधे येतं.ती तोर्‍यात म्हणाली.
तसा त्याच्या हातातला फुगा फटकन फुटला आणि मग त्यानं हळूच तिचा डोळा चुकवून मॉलच्या काचेत स्वत:चा आकार पाहून घेतला, पुढच्या रितसर लेक्चरबाजीची तयारी ठेवत...!
.........................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...