गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

पिक्चर


पिक्चर पाहून आल्यानंतर आल्या आल्या मला म्हणाला होता, पिक्चर पाहताना पुर्णवेळ मला तुझी आठवण येत होती. सांग कधी नेतेस परत? तुझ्याबरोबर पहायचाय?
मग आधी का गेलास सोडून..झालं ना पाहून तुझं? माझी मी जाईन आता.मीही उडवून लावलं.
तू (खट्याळपणे)- बरं, तू कधी जाणार तेवढं सांग? मी येईल.
माझ्याकडून दोन चार फटके.
मी-काय स्टोरी आहे. एवढं काय होतं त्यात माझी आठवण यायला?
तू- तू बघ कळेल तुलाही. कोणास ठाऊक तुलासुद्धा मी आठवेल.
मी- हाहा...माझं ठरवू नंतर. तू पाहिलसं ना आत्ता. तू सांग.
तू- अम्ममम...यार! म्हणजे कसं सांगू आता..एक्झॅक्टली नाही गं सांगता येणार. असं सगळंच नेमकं कुठं स्पष्ट करता येतं? बस्स वेगवेगळ्या फ्रेम्समधून तू आठवत राहिली. तू, तुझी मैत्री, तुझा सहवास, तुझं असणं, तुझं हसणं आणि रडणंही. सगळंच एकमेकांत गुंतून, एकापाठोपाठ. अमूर्तपणे.
मी- ओह रियली (अविश्‍वासाचा सूर)
तू- केवढा अविश्‍वास..जाऊ दे हे गाणं ऐक. मला खूप आवडलं, मी लगेच डाऊनलोड केलं.
माझ्या कानात हेडफोनचं एक टोकं अडकवून दुसरं स्वत:च्या कानात घुसवलंस आणि गाण्याच्या प्रत्येक शब्दासह माझ्या चेहर्यावरच्या एक्सप्रेशनला निरखून पाहत राहिलास...
:
:
:
तेच गाणं आत्ता ऐकतेय मी. तुझ्यासोबत गाणं ऐकताना तेव्हा जे जे वाटत गेलं ते तसंच आत्ता परत वाटतंय. अजूनही तसंच सेम वाटतंय. तीच गंमत, तीच हुरहूर. याला नेमकं काय म्हणायचं रे. तुला आवडलं म्हणून मलाही गाणं आवडलं होतं. आत्ता ऐकतो की नाही तू हे गाणं? हे गाणं डाऊनलोड केलेला मोबाईल कुठाय? अन हेडफोन? गाणं ऐकताना आता वाटतं का तसंच पूर्वीसारखं? ते सगळं जाऊ दे रे पण तू मुळी आहेस तरी कुठं ? घड्याळ्याच्या काट्यात? कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये? माऊसच्या पॅडखाली? प्रोजेक्ट फाईलींच्या पानांत? कुठं आहेस कुठं तू?
हे काय? तुझं आवडीचं प्रेमगीत असून मला इतकं दु:ख का होतंय? माझ्या आतही त्या फिलिंग्ज आहेत का रे? मग इतके दिवसं मी कुठं होते?
एरव्ही मला जराही आवडली नसती अशी तद्दन फिल्मी लव्हस्टोरी आज मला तुझ्यासोबत पाहायचीयं...तुझ्याशेजारी बसून...अंह खेटून. पिक्चर डाऊनलोडींगला लावलाय...आज जरा लवकर ये. मी विचार करतेय, पिक्चरचा. तुझा.
पण तू कुठं आहेस?
म्हणजे तुला तरी ठाऊक आहे का तू आत्ता कुठं आहेस?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...