गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

शोध


चॅटबॉक्समधून डिलीट न केलेली चॅट हिस्ट्री शोधत तुझ्यासोबतचे काही जूने संवाद आठवतेय.. इनबॉक्सला पडलेले आणि स्टार करून जपून ठेवलेले मेल्स तपासत तुझ्यासोबतचे काही जूने संवाद आठवतेय. तुझ्यासाठीचे पण तुला न पाठवलेले अर्धे-अर्धवट टायपलेले ड्राफ्ट्स बघत तुझ्यासोबतचे काही जूने संवाद आठवतेय.
हां..काहीतरी आठवतंय...एक जूनं संभाषण आठवतंय...
कशामुळे तरी मी वैतागत म्हणाले होते,  आजकाल ही फ्रेंडशीप, मैत्री, मैतर हे शब्दही किती पोकळ वाटतात. खोटे वाटतात. जणू अर्थगर्भ हरवून अर्थशून्य झालाय हा शब्द. कुणीही उठावं अन कोणालाही म्हणावं ही माझी मैत्रिण आणि हा माझा मित्र.
तूही सहज म्हणाला होतास, खूप बरं वाटतंय की तुला ही तसंच वाटतंय. दोन व्यक्तींमधील नातं सांगता नाही आलं की मैेत्री म्हणून का मोकळं व्हायचं. त्यापेक्षा तू, तू आहेस आणि मी मी आहे आणि आपल्याभोवतीच्या या एवढ्याश्या परिघात आपण एकमेकांना ओळखतो. नुसते ओळखतो. हा आपला खरा परिचय.
बघ आत्ताही मी संभाषण म्हटलंय. तेव्हा आपल्यात संवाद सुरू नव्हता झाला...!!
अरे केव्हापासून मी, तुझी मैत्रीची थेअरी आठवतेय....काय बरं म्हणायचास..
हां..आठवतंय पुसटसं...माझ्या जाणिवांचा तळ तुला समजायला लागला आणि कुठलेही आढेवेढे न घेता माझ्या भावभावना, मन तुझ्यापुढं उघडावसं वाटू लागलं किंवा तुझ्या जाणिवांचा तळ मला समजायला लागला आणि कुठलेही आढेवेढे न घेता तुलाही सारं काही मला सांगावसं वाटलं की समज आपल्या मैत्रीचं नेटवर्क फुल रेंजमध्ये आहे. ....आणि समोरच्यांच्या जाणिवांशी एकरूप होऊन स्वत:त ते मुरावावंस वाटलं आणि त्यांच्या दुखर्या खुपर्या गोष्टींची उत्तर शोधण्यासाठी अस्वस्थ व्हावंस वाटलं की समजावं...
काय समजावं? तू पुढे काय म्हणाला होतास..ते अर्धवट का बोलला होतास?...की पुर्ण केलं होतंस वाक्य? मग मला का नाही आठवतेय... की माझ्या स्मरणशक्तीची अवस्थाच अशी केविलवाणी. थेअरीवाला संवाद तर चॅटहिस्ट्रीत नाहीये...इनबॉक्समध्येही म्हणजे हा संवाद प्रत्यक्षातला...आमोरासमोरचा. असे किती संवाद झाले त्या संवादांची बेरीज करायचीये...
संवाद जगता आला पाहिजे...तेव्हा तू म्हणाला होता. मग काही अर्धवट सूचवत राहिला.. तू असं काय काय अर्धवट बोललास ते तेव्हा नाही कळालं आत्ताही थोडं थोडं कळतंय. तुझ्यासोबतचे तेच जूने संवाद आत्ता जगायचेत...तेव्हा माझ्याकडून रिकाम्या राहिलेल्या जागा भरून काढायच्यात.
थांब तुला व्हॉटसऍप करते. पण तुझा नंबर नाहीये..म्हणजे तुझ्याकडेच नाहीये. म्हणजे तू या आभासी जगातच नाहीये.
आता खर्या खुर्या पृथ्वीतलावर तुला कसं शोधू? कुठवर शोधू? शोधता शोधता थांग लागेल? की लागतोच असा थांगपत्ता?
पण सुरूवात कुठून करू ते तर सुचव...बरं! इथूनच करते, मनातून आणि मग..... !!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...