बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

सुटका


तो तिच्या केसांशी खेळत लाडिकपणे म्हणाला, ‘‘तू सी ना जाओ ना! ’’
‘‘काय रे हा फालतूपणा...सकाळपासून तू हे कितव्यांदा म्हणतोय हे आता, मोजण्यापलिकडं गेलंय. म्च्म्च्...केसांमध्ये गुंता होईल रे, सोड केस आणि पॅकिंगला मदत कर.’’ ती पॅकिंगची यादी करायला लागली.
हाऊ मिन यु आर. मी काय केसात गुंता करतोय? मी इतकं रोमॅटिकपणे तुझ्याशी बोलतोय ते दिसत नाही. तुला काय तर पॅकिंगचं पडलंय...मला जाम टेन्शन आलंय ते तुला कळत नाही...खडूस कुठली. तू आत्तापासूनच परदेशात असल्यासारखी वागतेय.तो रागवून खिडकीपाशी गेला..
ओके...चिल.... सॉरी. मला सगळं कळतंय पण तू असं बोलून बोलून माझा पण इमोशनल लोचा नको ना करू... तुला खरंच वाटतंय मी जाऊ नये.
हो. अख्खा एक वर्ष तू नसशील, कसं जा म्हणायचं मी. नको ना जाऊ.....! बऽऽरं, असं नको बघू. जा, दिल्या घरी सुखी रहा....काय राव गंमत पण नाही करायची का? लगेच एक्सप्रेशन चेंज करतेस. जा..जा..जा परत म्हणशील तुझ्या करिअरच्या मध्ये आलो. म्हणजे तसं पण नाही. तू खरंच खूप मेहनत केलीस प्रोजेक्ट हेड होण्यासाठी...आय नो इट्स युवर ड्रीम. पण. बट टेल मी, विल यू मिस मी?’’
‘‘ऑफकोर्स! आय विल... आय विल मिस यू.’’
‘‘अन् मला नाही विचारणार, मी मिस करेल का म्हणून.’’
मला माहितीये ना, तू मिस करशीलचं. आत्ताच बघ कसं तोंड झालंय.तिनं त्याचा चेहरा आरशाकडे वळवलं.
‘‘हां. काही पण हा. मी काही मिस नाही करणार. मी तर ना दुसरी मुलगी पटवणार. ’’
‘‘बऽऽऽऽरंती मुद्दाम बरं वर जोर देत म्हणाली.
‘‘बऽऽऽरं..इतका अविश्‍वास! मी तर पटवणारच...तूच सांग तुला काय आवडेल..मीहून तुझी जागा कोणाला दिलेली की, कोणीतरी तुझी जागा पटकावलेली.’’
तिनं चिडून त्याला दोन गुद्दे  मारले मग शांत बसली.
तो हसत पुन्हा म्हणाला, ‘‘सांग की..काय तुला आवडेल किंवा असं म्हण कशाने तुला त्रास होईल.’’
तशी ती हसायला लागली.. ‘‘त्रास? काही पण...मला कशाला त्रास होईल,  का होईल! हां त्रास होईल कदाचित मला. ज्यात त्रास होणार आहे त्यात आवडण्याचं काही उरत नाही. राईट?’’
तो- ‘‘ओऽऽके.. तर तुला त्रास होणार आहे. इंटरेस्टिंग. पण माझ्या प्रश्‍नाला बगल देऊ नकोस. सांग ना, झाली तर तुझी जागा कशी रिप्लेस होईल असं तुला वाटतंय, सांग की.’’ तो तिला चिडवत राहिला.
तिनं पुन्हा दोन चार फटके लगावले. मग एकदम प्रश्‍नच उडवून देण्याच्या आर्विभावात म्हणाली-‘‘अशी कोणाची कोणाच्या आयुष्यात जागा बिगा काही नसते रे. ’’
तो- ‘‘रियली?’’
ती- ‘‘ऐसी कोई जगह नहीं होती और ना कभी रिप्लेस, ओके? नो, आय ऍम सिरीयस. हां कोणाच्या जाण्यानं काही काळापुरतं रितेपण येतं. खूप खोल रितेपण, ज्यामुळे सतत काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. पण मग अलवारपणे कोणीतरी नवं आयुष्यात येतं किंवा जुनेच नव्याने भेटतात. आयुष्याची गाडी त्या प्रवाशासोबतही आनंदानं सुरू राहते. पण नवी व्यक्ती जून्याच्या जागेला धक्काही देऊ शकत नसते. कारण मुळात अशी जागाच नसते. असतं ते रितेपण. सुरुवातीला खूप काळ तीव्र वेदना देणार्‍या या रितेपणाची डेप्थ हळूहळू कमी होत जातेही पण तरीही रितेपण कायम राहतं.
तर माझ्या लाडक्या मित्रा...सांगायचं तात्पर्य इतकंच, मी तुला सोडून गेले तरी तुझ्या आयुष्यातील माझ्या रितेपणाच्या पोकळीसह मी कायम तुझ्यासोबतच आहे.’’
‘‘अरेरे...म्हणजे या जन्मात तरी काही सुटका नाही!’’


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...