शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

The end-शेवट


तो- इतक्यात तू अशी बदलशील असं वाटलं नव्हतं आणि असंही वाटलं नव्हतं की, मला विसरायचा प्रयत्न एवढ्या तातडीनं सुरू करशील. कुणालाही विसरणं तुला इतकं सोप्पं वाटतं. कुणाचंही जाऊ दे, माझं बोलू. बोल ना, मला विसरणं जमेल? किती सहज तू हे विसरणं बिसरणं बोलतेयस. खरं सांग, माझ्या आठवणींच इतकं ओझं वाटू लागलयं तुला?
तिने एक आवंढा गिळला. डोळे घट्ट मिटून घेतले आणि न बोलता तशीच स्तब्ध बसून राहिली.
तो- माझ्या आठवणींचं ओझं वाटू लागलयं. ओझ! एकत्रितपणे आपण घालवलेल्या अनेक सुखद क्षणांना तुझ्या लेखी अर्थ तरी काय? ओझं! किती जीवघेणा शब्द आहे हा. म्हणे आठवणीची ओझी, असं कधीतरी होतं का?
ती उद्वेगाने किंचाळली.- होतात. आठवणींचं ओझचं नाही, तर मानेवरचं जोखड ही होतं. तुझ्या आठवणीचं असंच जोखड माझ्या मानेवर बसलयं आणि आता मला ते नकोयं. या आठवणींपायीच सुखाने ना माझा दिवस उजाडतो न रात्र संपते. एकांतात, गर्दीत कुठेही, कधीही मनात आठवणी पिंगा घालू लागतात, तू दिसू लागतो, मला सगळं ठाऊक असतानाही, मी तुझ्या दिसण्याच्या दिशेने जाऊ लागते न हाती काय येतं, निव्वळ भासाचा बुडबुडा. मग जाणवत राहतं तुझं सोबत नसणं. त्रास होतो याचा. तुला कळतयं का, त्रा-स होतो.
तो कुत्सित हसला.- मग किती पुसशील आठवणी. किती डिलीट करशील मेमरी. ओह सॉरी; ओझचं म्हणतेस तर मेंदूची सफाई झाली असेल ना, मग सांग किती केलीसं. किती वजावट अन किती बाकी. भरून आलेल्या जखमांचेही व्रण राहतात मग खोटेपणानेच ओरबाडून, फेकून दिलेल्या आठवणींचे व्रण नाही राहणार? ते तर तुझ्या डोळ्यांत आत्ताही दिसतायेत.
ती निर्विकारपणे त्याच्याकडे बघत राहिली- पुरे झालं. मला बोलूनही पुन्हा त्रास करून घ्यायचा नाहीये.
तो पुन्हा कुत्सित हसला.-तर..तू ही त्या सगळ्यांसारखी उरफट्या काळजाचीच निघालीस. तू जगाची रीत पाळायची नाहीस अशी खात्री होती.
ती झटकन उत्तरली- अन मलाही खात्री होती, तू असा सोडून नाही जायचा....पण गेलास ना. जाताना ना भेटला ना बोलला. तुझी मर्जी, तू चालता झाला मग तुझी मर्जी तू आठवणी पाठवू लागला. सगळचं कसं तुझ्या मर्जीनं होईल.
तो तिच्या बोलण्याला उडवून लावणारं हसला. निष्ठूर, निर्दयी स्मित त्याच्या ओठावर पसरलेलं. जणू त्याची काही चूकच नाही.
ती- काय खिजवायचं अन हसायचं ते हस. पाठीत खूपसलेल्या सुर्याची छातीत उमटलेली कळ तुला कधीच कळायची नाही. नाहीतर असा दगाफटका केलाच नसता.
तो- किती, किती किती गैरसमज करून घेशील. झालेल्या चूकीसाठी किती दोष देशील. त्रास काय मला होत नाही. तुझ्यापेक्षा जास्त होतो. तुला किमान बोट दाखवायला मी तरी आहे. मी स्वत:कडेच बोटं केल्यावर किती यातना होत असतील. तू समजून घेशील म्हणून आलो.
ती- आता शक्य नाही समजून घेणं वगैरे. आय ऍम फेडअप ऑफ ऑल धीस. येस...मे बी आय कॅन नॉट फरगेट यू बट शुअरली आय कान्ट फरगिव्ह यू. आलास तसाच माघारी फिर.
तो दुखावला पण मागे फिरला आणि तिने खाडकन मनाचे दरवाजे लावून घेतले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...