शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

अस्वस्थ करणारं पुस्तक


प्रेम ही खरं तर किती तरल भावना आहे. त्याची व्याख्या करणं तसं अवघडचं शिवाय व्यक्तीसापेक्ष ही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना आपल्याला सुखी, आनंदी, छान काहीतरी वाटू देत राहते, हे असचं असतं असंही नाही त्यात राग, लोभ, रूसवा फुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हे ही खरं, यात कोणाचं दुमत असणार नाही. पण प्रेम करणं हे काही सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.
पण काही वेळा प्रेम करून ही, हिम्मत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणं इतकं अंगवळणी पडेललं असतं की, त्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवलं जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर आपण खेळत राहतो. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का? मन मारताना होणार्या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं? कसं डील करायचं?
चिमुटभर रूढीबाज आभाळ ही राजन खान यांची कांदबरी अशीच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आपल्या जगण्याची एकूण व्याप्ती पाहता या रूढी परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा किंबहूना तो तेवढाच असतो पण तो आपण कुरवाळत राहतो आणि आपलंचं जगणं आभाळाएवढं मुश्किल करून घेतो. हा सगळ्यांच्याच जगण्याचा सार म्हणजे ही कादंबरी.
एकूणच, आपल्या समाजाची जडणघडण बर्या वाईट परंपरांच्या, जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातूनच होत जाते आणि कळत नकळत त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत असतात. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार आणि प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत घडतच जातात. त्या अर्थी आपण चित्रपटापासून ते कथा-कादंबर्यांपर्यंत प्रेम हा विषय पाहिलेला ऐकलेला असतो. काहीवेळा आपल्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना आपण पाहिलेल्या असतात. मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच. आपल्यासाठी एक प्रेमकहाणी संपली इतकाच विषय असतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन पुन्हा सगळं सुरळित होईल. मुलीच्याबाबतीत तर तिचं लग्न लावून दिलं की कुटुंबियांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद. मात्र या सगळ्यात खरचं प्रेमभंगानंतर किंवा स्वत: प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था काय होईल. परंपरांच्या कलेनं जाणार्या, प्रेम हवं असणार्या पण चौकटी मोडू पाहणार्या या स्त्रीची अवस्था कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करतानाही भीती आणि लग्न झाल्यानंतर ही होऊन गेलेल्या प्रेमाची हकीकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्यादृष्टीनं सारी भीती, आठवणी आता झिरझिरीत झालीये असं वाटत असातनाच तो परततो आणिउद्या 1 वाजता भेटायला ये..नाही आलीस तर मी दोन वाजता घरात येतो असं म्हणून वादळासारखं निघून जातो. या एका वाक्यात लपलेलं दडपण, तिची अस्वस्थता, तिची उलघाल, उलथापालथ, भीती लेखकानं अतिशय सूक्ष्मरित्या आणि वास्तवादी टिपलयं.
मुळात, आपल्याकडे, पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी मुलांनाही पालकांनी आपल्याला जगात आणून आपल्यावर उपकार केले आहेत असंचं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हा ही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. अशा परिस्थितीत मुलांविषयी पालकांना काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटतो असं जे आपण म्हणत राहतो, त्यावेळी त्यातील काळजी अन आदर शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही रचनाच तशी आहे. अन इतकीच नाहीये. बाकी अनेक प्रकारचे रंग त्याला आहेत. जातींची, धर्माची,लिंगभेदाची, आर्थिकतेची त्यातही पुन्हा एक एक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा आपल्या रीती नीतीच्या समाजात, प्रेम करणं हे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे. एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.
कांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भितीचा आणि िंबंग फुटलं तर त्यामुळे होणार्या परिणामांचा विचार करत असते त्यावेळेस तिच्या लक्षात येते, प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिलाच मिळतेय. त्याचं नाव पेपरात येतं, टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचं प्रेमाशिवाय सुरू असलेलं आयुष्य सुरेख सुरू आहे. त्यात तो पुढेही गेला मग कोंडवाडा मलाच का?हा प्रश् आपल्यालाही अस्वस्थ करतोया प्रश्नाचं उत्तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणं अवघडचं.
कादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावं नाहीयेत. तिचं पात्र ती म्हणून येतं अन त्याचं तो म्हणून. अन बाकीचे सुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. ही गोष्ट मला विशेष चांगली वाटली कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर आपल्या एकूण समाजात सर्वच धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या अशाच रीतीनं जातात. त्यामुळं पात्र बिननावी आहेत हे चांगलचं आहे. पुस्तकाचं गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं झालयं. कांदबरी वाचनीय झालेली असताना, संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कुठेच अवतरण चिन्ह नाहीत. अक्षरजुळणीतील ही गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.
पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना आपल्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं. त्यालाही अर्थात कारण हेच बेड्याघालू समाज.चिमूटभर रूढीबाज आभाळाला धुतकारून प्रेम करता आलं पाहिजे आणि त्यासह जगताही!

२ टिप्पण्या:

  1. # प्रेम करणं हे काही खूप सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. बरं तुमच्याच मनाशी नव्हे तर त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.

    # एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.

    # एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का? मन मारताना होणार्‍या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं? कसं डील करायचं?

    # प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं.

    उत्तर द्याहटवा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...