शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

पैंजण


काल ऑफिस सुटल्यावर पायर्‍या उतरत असताना, मागून एक मुलगी धाडधाड खाली उतरत गेली. तिच्यासोबत पायातल्या पैंजणाचा सौम्य नादही छुमछुमत गेला तसा तू आठवलास. पैंजण म्हणजे माझ्यासाठी पायातील एक दागिना. मी तर पैंजणांचा होणारा छुम छूम आवाज ऐकण्यासाठीच पैंजणं घालायचे पण तुझं नेहमीसारखं काहीतरी निराळचं असायचं. म्हणायचास...
‘‘कुणाच्याही पायातली पैंजणं धावू लागली; की मला सतत वाटतं, आनंद वाटायला निघालेत. कदाचित एखादं मोकळं आकाश शोधायलाही निघाली असतील नाही तर मोकळ्या आकशातील एक गिरकी घेऊन नुकतीच जमिनीवर स्थिरावयला पोहचली असतील.’’ कधी कधी यापुढे जाऊन माझ्या पायांकडे लक्ष रोखत म्हणाचास, ‘‘आणि तुझ्या पायातले पैंजण ते तर इतके सुरेख आहेत की नुसतंच पाहत रहावसं वाटतं. जणू तू पैंजण नाही तर छोट्या छोट्या चंद्राची माळच पायात ल्यायलीस. खरचं खूप सुंदर आहेत, तुझे पैंजण. हलकं हलकं वेड लावतात. तुला एक गंमत सांगू, जनरली कुणी कुणाचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा येतो. पण तुझं नाव घेतलं की माझ्या डोळ्यांसमोर तुझे पैंजण येतात. तू स्वत: सोबत मधूर नादच नव्हे; तर प्रकाश घेऊन फिरतेस. जाशील ती वाट उजळवशील.’’
मी तर तुझीच वाट धरणारेयं.मी उत्साहाने म्हणायचे.
तूही विचार केल्यासारखा आविर्भाव आणत म्हणायचास.
हम्म्म...ठीकेय. एक ट्राय तो बनता है...
........
घरी आल्यावर वेड्यासारखी ते पैंजण शोधू लागले. सीडी-पुस्तकांचे कप्पे, पत्रांचा बॉक्स, कपाटातले कपाट,  छुप्या जागा असं सगळीकडे शोध शोध शोधले. इतक्या शोधशोधीनंतर पैंजण तर सापडली पण अजून तुझी वाट शोधतेच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...