शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

तसलं काहीतरी केलं ??

- ‘त्या रात्री’ चुकून ‘त्या’ गल्लीत शिरलो .. मित्र मला बायल्या म्हणत होते. मग माझं पण डोकं फिरलं आणि.. माझ्या हातून नेमकं काय घडलंय तेच आठवत नाही. मला तसं काही तर होणार नाही.?

- माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. पण त्यानं कंडोम का काय ते नव्हतं वापरलं. आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. 
नाऊ डेज आर एक्सपरिमेंटल. त्यानं घरी बोलावलं.
पण कंडोम का काय ते नव्हतं वापरलं.
आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

असे एक ना अनेक प्रश्न. मन पोखरून काढणारे. डोकं उठवणारे प्रश्न. एचआयव्हीविषयी माहिती नसण्याची भीती आणि माहीत करून घेण्याचीही भीती असणारे प्रश्न. पण मग ही भीती व्यक्त करायची तरी कुठे? एचआयव्ही कसा होतो, का होतो या शंकेपासून ते एचआयव्हीच्या निव्वळ भीतीपोटी नैराश्याच्या गर्तेत ओढल्या गेलेल्यांचे अनेक प्रश्न. संवाद हेल्पलाईनला येणारे. ‘संवाद’ हेल्पलाईनला ‘मुक्ता हेल्पलाईन’ म्हणून तुम्हीही ऑक्सिजनमध्ये भेटत होतात. ‘ऑक्सिजन’च्या अनेक वाचक मित्रमैत्रिणींनीही आजवर या हेल्पलाईनची मदत घेतली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टची ‘संवाद हेल्पलाईन’ महाराष्ट्रात आणि मागील वर्षापासून बिहारमध्येही एचआयव्ही विषयाच्या शंकांचे निरसन करत आहे. हेल्पलाईनवर आपले प्रश्न, शंका विचारणार्‍या तरुणांचीच संख्या जास्त आहे. १५ ते ४0च्या दरम्यानचा हा वयोगट.. एकूणच शरीरशास्त्राचे अज्ञान आणि गोंधळ यातून गैरसमज मोठे आहेत. त्यामुळेच या हेल्पलाईनला फोन करणारे शहरातील आहेत. निमशहरातील आहेत आणि काही गावपातळीवरीलही आहेत. नोकरी-व्यवसायातील तरुण आणि विद्यार्थी या हेल्पलाईनला मोठय़ा प्रमाणात फोन करतात. शैक्षणिकदृष्ट्या विचार करता पदवीधर असणार्‍या तरुणांचीच संख्या यात जास्त आहे. ‘लैंगिक शिक्षणा’सारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही सुशिक्षित तरुणांना शास्त्रीय माहिती मिळू शकत नाही, हेच यावरून सिद्ध होते. मिटल्या ओठांच्या आड लैंगिक संबंधाविषयीचे प्रश्न दबून जातात. शरीराच्या व्यवहाराचा स्वच्छ पारदश्री संवादच होत नाही.परिणामी, तरुणांचा नुसताच गोंधळ उडाला आहे. काही वेळा यातूनच ‘करून पाहूयात’ ही वृत्ती जन्म घेते. या हेल्पलाईनला येणारे घाबरेघुबरे फोन कायम हीच कहाणी सांगतात.

घुसमट काय आहे? 
अजाणतेपणी प्रयोग करण्याच्या नादात आपण ‘काहीतरी भलतंच’ केल्याची सगळी हकीकत मोकळेपणाने सांगण्याची काही सोय नसते. घरातही अनेकदा कुणाला सांगितले जात नाही. शंका आली तरी ती व्यक्त केली जात नाही.
आपल्या हातून जे घडले ते ऐकणारा कोणी तरी हवं म्हणून ही फोन येतात. लोक मन मोकळं करतात. सल्ले मागतात. मी काय क , म्हणून मार्गदर्शन घेतात. पण काहींची कहाणी वेगळीच. एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून नोकरी नाही, कामधंदा मिळत नाही, पैसा नाही आणि मग म्हणून चांगलं जगणंही नाही.
ही घुसमट कुणापाशी सांगायची.? कशी वाट फोडायची जगण्याच्या कोंडीला.? हे मात्र कुणाला विचारायची सोय नसते. 

तरुण मुली गप्पच.!
पतीला एचआयव्ही असल्यास पत्नीपासून लपविण्याचे प्रसंगही अगणित आहेत. पत्नीच्या अजाणतपेणाचा, विश्‍वासाचा सर्रासपणे घात केला जातो. डॉक्टरांनी पत्नीची एचआयव्ही टेस्ट करून घेण्यास सांगितल्यावर ती गुपचूपपणे केली जाते. भाबड्या बायका नवर्‍याच्या विश्‍वासाला बळी पडतात. आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं पत्नीला कळतही नाही. घरी कळल्यानंतर घरातील माणसं त्या बाईलाच जबाबदार धरतात. अशा किती जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याच्या कहाण्या या बायका सांगतात. पतीचे निधन झाल्यावर तर पत्नीच्या हाल-अपेष्टांना सीमाच उरत नाही. घरातूनच हाकलेले जाते. काहीवेळा माहेरीसुद्धा दार बंद केले जाते. स्वत:च्या घरातील मालकी हक्कासाठी तिला कायदेशीररीत्या झगडावे लागत राहते. पण हे सारं होऊनही अनेक जणी मात्र बोलत नाहीत
हेल्पलाईनवर बायकाचे प्रमाण खूप कमी आहे. केवळ तीन-चार टक्केच महिलांचे फोन येतात. बायकांचे फोन नाही म्हणजे त्यांना शंका-प्रश्नच नाहीत, असा अर्थ होत नाही. मात्र, आजही चारचौघांत साधं ‘मासिक पाळी’विषयी बोलण्याची मुभा नाही तिथे अशा प्रकारच्या प्रश्नांविषयी बोलण्याचा मोकळेपणा त्यांच्यात दिसतच नाही. एचआयव्ही नवर्‍याची काळजी कशी घ्यायची, आहार काय द्यायचा याबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र स्वत:विषयी, स्वत:च्या संबंधांविषयी, चुकल्या पावलांविषयी, फसल्या गेल्याविषयी तरुणी-बायका बोलतच नाहीत. पुण्यात ससून या शासकीय रुग्णालयात या हेल्पलाईनने एक मोफत कॉल करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहे. तिथून मात्र बहुतेक वेळा महिलाच फोन करतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार अशा कितीतरी जणी सहन करत असतील, असं या हेल्पलाईनचं म्हणणं आहे.

फोबिया कॉल
कधीतरी एखाद वेळा ‘तसल्या’ प्रसंगाला सामोरे गेलेल्या तरुणांच्या मनात भीती उरते. एक-दोनदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर लगेचच मला एचआयव्हीचा संसर्ग झाला, असंही गृहीत धरणारे अनेक जण हेल्पलाईनवर बोलते होतात. एचआयव्ही निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतरही अनेक जणांच्या मनात ही भीतीच असते की आपलं काही खरं नाही. सतत मनात कुढणारे, सतत स्वतचा जीव खाणारे, सतत दहशतीत जगणारे अनेक जण आहेत असं या हेल्पलाईनचं काम करणारे मित्रमैत्रिणी सांगतात.
संवाद हेल्पलाईनशी हा एक संवाद.
न बोलल्या जाणार्‍या प्रश्नांविषयी.!


लग्नाच्या मोहापायी फसवणूक
२३-२५व्या वर्षी एचआयव्ही झाल्याचे कळल्यावर काही तरुण खचून जातात. लग्न झाल्यावर निर्माण होणारे संभाव्य धोके, काळजी, सुरक्षिततेच्या गोष्टी सगळी माहिती असूनही काही जण घरच्यांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी लग्न करण्याच्या निर्णय घेतात. मात्र लग्न करताना, निरोगी असणार्‍या मुलीला आजाराविषयी सांगितले जात नाही. लग्नाची मानसिक गरज, समाजात प्रतिष्ठा राहावी यासाठी तरुणांना लग्न हवेच असते. यामुळे कित्येकदा मुलींचे आयुष्य पणाला लागते.
स्वत कुणाला फसवलेल्या तरुण मुलांचे आणि फसल्या गेलेल्या मुलींचे फोन या हेल्पलाईनला येतात. पण लग्नाआधी एचआयव्ही चाचणी का करून घेतली नाही याचं उत्तर मात्र कुणाकडेच नसतं.!

समलिंगी संबंधात धोका नाही.?
समलिंगी संबंधातून एचआयव्ही होत नाही, असाही एक गैरसमज आहे. समलिंगी संबंधाविषयी बहुतेक पुरुषांचेच फोन आहेत. एकापेक्षा जास्त साथीदारांबरोबर असुरक्षित संबंध आले की, एचआयव्हीची संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, एचआयव्ही हा भिन्नलिंगी लोकांनाच होऊ शकतो, अशी चुकीची समजूत समाजात आहे. याच समजुतीतून काहीवेळा वयात येणारी मुले समलिंगी संबंध ठेवण्याकडे वळतात आणि स्वत:ची लैंगिक ओळखच पणाला लावून फसतात. अशी तरुण मुलं घरात बोलत नाहीत आणि न बोलून या चकव्यातून बाहेरही पडत नाहीत. 
एचआयव्हीप्रश्नी शहरांत तरी जागरुकता असते, असा एक समज आहे. पण तो खोटा ठरावा, असं संवाद हेल्पलाईनवाले सांगतात. या सगळ्या घुसमटीत शंका विचारणारे फोन सगळ्यात जास्त शहरी भागातून येतात. एचआयव्ही म्हणजे नेमके काय? हा प्रश्न विचारण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. मात्र, आजही गाव-वस्त्यातून एचआयव्हीची प्राथमिक माहिती विचारणार्‍या फोनची संख्या लक्षणीय आहे. प्राथमिक प्रश्न :

* एचआयव्ही होतो कसा?
* कंडोमचा काही फायदा होतो का?
* कंडोम वापरल्याने क्षमता कमी होतील का?
* एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे काय?
* ‘ओरल सेक्स’ आणि ‘अँनल सेक्स’मुळे एचआयव्ही होतो का?
असे प्रश्न सर्रास विचारले जातात. आणि त्यातून एक नक्की दिसतं की पंचविशीच नाही तर तिशी उलटलेल्या माणसांनाही आपल्या शरीराची नीट ओळख नसते. आहे ते केवळ अज्ञान.

पाय घसरतो कुठे?
यार, आत्ता नाही तर कधी?? बक अप नाऊ. कशाला घाबरतोस, इतका, काही होत नाही. एवढा कोरा करकरीत राहून काय मिळणारे तुला. व्हर्जिनिटीचं काय लोणचं घालायचं.? ‘पीअर प्रेशर.’ मित्रांच्या अशा दबावाला बळी पडण्याचे प्रसंग अनेकांवर ओढावतात. मित्रांच्यासमोर हसू व्हायला नको म्हणून किंवा ‘हम भी र्मद है’ हे दाखवण्याच्या भानगडीत वयाच्या १५- १८ व्या वर्षापासूनच मुले ‘व्हर्जिनिटी’ गमावून बसत आहेत. असे करण्यात या तरुणांना शल्य वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने इटस ऑल एक्सपरिमेंटल. काही वेळा तथाकथित पुरुषार्थ दाखविण्यासाठी, मित्रांसमोर मिरविण्यासाठीही बहुतके मुले ‘त्या’ वस्तीची वाट चालून येतात. मित्रांच्या दबाव गटाला बळी पडून ‘नको त्या वयात, नको ते करणार्‍यांची’ संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. थ्रिलपोटी हे सारं केलं जातं. सध्या प्रत्येक छोट्या- मोठय़ा गोष्टी सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या ‘पाटर्य़ा, ड्रिंक्स अँन्ड सेक्स’ हे एक नवेच समीकरणच झाले आहे. काही वेळा झिंगलेल्या अवस्थेत मित्रांच्या सोबत कधी त्या वस्तीत गेले, हेही माहीत नसलेले अनेक जण आहेत. आणि हा सारा घोळ झाला की तो कसा निस्तरायचा, आता आपल्याला काही आजार तर होणार नाही ना या भावनेने घाबरगुंडी उडालेले अनेक जण या हेल्पलाईनला फोन करतात. मित्रांनी सांगितलं म्हणून केलं, आता पस्तावलोय किंवा पस्तावलेय असं सांगणारे तर कितीतरी जण.! मित्रांचं एवढं का ऐकता या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतं.

प्यार में सबकुछ.!
प्यार में सबकुछ जायझ हैे, म्हणत प्रेमाचा रस्ता बेडरूमपर्यंत नेण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. तिचं/त्याचं त्याच्या/तिच्यावर प्रेम असेल तर ते सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्यातील इण्टिमेट रिलेशनशीप. प्रेम करतेस/करतोस तर काय हरकत आहे म्हणत शरीरातील अंतर सहज गळून पडते. भावनिक गुंतवणुकीपेक्षा शारीरिक गुंतवणूक मोठी वाटू लागली आहे. त्याला गमवायचे नाही म्हणून मी हो म्हणाले आणि तो ‘तसला’ निघाला, आता मी काय क.? मी काहीच काळजी घेतली नाही असं सांगणार्‍या किंवा मैत्रिणीचं नाव पुढे करणार्‍या काही मुलींचे फोन येतात. प्रेमात नाही म्हणायचा अधिकारच गमावून बसलेल्या या मुली.?
त्या प्रेग्नन्सीपासून दहशतीपर्यंंत आणि मनस्तापपर्यंत अनेक गोष्टीत अडकतच जातात.
काहींना निदान बोलण्याची तरी हिंमत असते ज्या बोलत नाहीत त्यांचं काय होत असेल?






(oxygen)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...