सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

बंद

त्या दिवशी शहरात बंद होता. सतत टोकदार असणाऱ्या अन या न त्या गोष्टीने दुखावणाऱ्या अस्मितेचा प्रश्न होता. रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. मात्र ते पुर्णपणे निर्जनही नव्हते. अभिनवच्या चौकात सिग्नल पडला. सारसबागेहून आलेली मंडळी सिग्नलवर थांबली. मागून टोकदार-अति संवेदनशील अस्मितांचे झेंडे घेऊन झुंड ही आली. लाल रंगाचा ठसठशीत सिग्नल चांगला उंचावरून दिसत होता. झुंड त्या रंगाचा अर्थ समजून थांबली. पण एक होता त्यात अतिशहाणा. तो त्या रंगाचा अर्थ समजून ही शंभर फुट पुढे गेला. चौकातील ट्रॅफिक पोलिस जरासा हलला. पण त्याला ही ठाऊक होते त्याच्या दमदाटीत किती दम होता. अतिशहाण्याने मागे वळून पाहिले तर त्याची जनता सिग्नल पाळायला गपगुमान थांबलेली. म्होरक्याने गाडी युटर्न घेतली आणि पुन्हा चौकात आला, "अरे का थांबलाय चला की..'
"अरे सिग्नल..आणि समोर बघ मामासुद्धा आहे.'
"ये गयबन्यांनो आज आपला दिवस हाय. तो पोलिस काय करतोय? सिग्नल पाळायचा असतो व्हय. चला..' म्होरक्याच्या आवाजात जरब होती. तो चला म्हणत सुसाट निघाला.
सिग्नलवरच्या झुंडीनेही गाड्यांचे गिअर वाढवले. झुंडीच्या पुढे सर्वसामान्य माणसं-बाया -पोरं-पोरी होते. झुंडीला तर पुढे जायचं होतं. म्होरक्याचा आदेश होता आणि अस्मितेच्या राज्यात कायदा महत्त्वाचा नव्हता. त्यांच्या गिअरचा आवाज जसा वाढला सिग्नलसमोरची सगळी जनता घाबरगुंडी होऊन तुफान वेगाने सुटली. लगोलग झेंडे उंचावत, सिकंदरच्या आविर्भावात झुंडही...सिग्नल अजूनही लालच होता. पलिकडचा ट्रॅफिक पोलिस हाताची घडी घालून तसाच उभा होता. ती मात्र दचकून त्याला म्हणाली, "सिग्नलचा लाल दिवा कुणासाठी असतो?'
"म्होरक्यासाठी. लाल सिग्नल म्हणजे त्याच्यासाठी कायदा व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचा इशारा असतो.'
"ओह!! या वाक्याचा संबंध मी कशाशीही जोडू शकते नाही का!' तिनं भूवयी उंचावत विचारलं. तो हसला. तीही हसली.
शहरातला बंद हळूहळू पेटत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...