बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

सीमोल्लंघन


फार उंच नाही, तिसर्याच मजल्यावर एक भली मोठी गच्ची होती. ओबडधोबड विटा आणि कच्चा कोबा असलेली ती गच्ची. पण आज नेहमीपेक्षा वेगळाच नूर होता, तिचा. मग आठ दहा जणी आधी दबकत, मग कुजबूजत, मग हसत आणि मग खळाळत गच्चीवर आल्या. कुणी पंधरा-अठराची तर कुणी चोवीस-सव्वीसच्या तर कुणी बत्तीस-तेहतीसच्या. खळाळत्या हास्यातच दोघी तिघींनी डोक्यावरचे स्कार्फ नीट केले. दोघींनी नकाब बाजूला केला. उरलेल्या पाच सहा जणी त्यांच्या हालाचालींकडे पाहत गोठून थांबल्या अन् क्षणार्धात गोठलेला धबधबा एकमेकींकडे पाहत पुन्हा जोरदार धावू लागला.
गच्चीवर फक्त त्याच त्या होत्या. त्यांनी सभोवार नजर फेरली. गच्चीवर पाहणारं तर कुणी नव्हतं पण आजूबाजुला उंच इमारती होत्या. जिकडून तिकडून वाहनांचा, माणसांचा आवाज येत होता. वस्तीतल्याच पल्याडच्या गच्चीवर पत्त्यांचा डाव मांडलेल्या पोरांच्या टारगट नजरा होत्या, मात्र असं सारं काही त्यांनी आज दुर्लक्षिलं. किती तरी दिवसांची ही तयारी होती. सोप्पं थोडीच होतं पण जमवायचं म्हटलं की जमतंच. जमलं त्यांनाही.
मग एकाच वेळेस त्या आठ दहा जणींनी आकाशाकडे पाहिलं. किती दिवसांपासून त्यांची इच्छा होती. निळ्या आकाशाला डोळे भरून पाहण्याची. सूर्याच्या तेजानं लोचने दिपवून घेण्याची आणि...आणि याच आस्मानात उंचावण्याची. मुक्त विहार करण्याची. आपली डोर आपल्याच हातात ठेवून बेफिकिर उड्डाण भरण्याची.
खूशीत त्यांनी एकमेकींकडं पाहिलं.
आपलच सीमोल्लंघन, आपलाच कैफ अनुभवण्याआधी त्यांनी दीर्घ श्वास घेतला. पहिलीच वेळ होती ना..पहिली वेळच तर अवघड असते. उर धपापत होतं त्यांचं पण आज जिगर एकवटली होती...आणि मग काय, भावांचे लपवून आणलेले मांजे आणि रंगबेरंगी पतंग त्यांनी बॅगेतून पटापट बाहेर काढले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...