बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

फायनल

सकाळपासून तिचे शंभर मेसेज होते. मेसेजमधला मजकूर एकच "अॅट 3, मंगला थिएटर. बी ऑन टाईम आदरवाईज आय विल वॉच द फिल्म अलोन.' या शंभरीनंतरही त्याला पोहचेपर्यंत सव्वा तीन झाले होते. पार्किंगमध्ये गाडी लावण्यात आणखी पाच मिनिटं घालवण्यापेक्षा त्याने थिएटरबाहेरच पार्किंग नसलेल्या जागेत गाडी लावली. मंगलात पोहचला. शो सुरू झाल्याने सगळं थिएटर झाडून साफसुफ झालेलं होतं. याच्याकडे तिकीट ही नव्हतं. आत चार स्क्रीन. बरं, पिक्चर कोणता पाहायचाय हे ही त्यानं विचारलेलं नव्हतं. त्यानं चारही दिशांनी गर्रकन वळून पाहिलं, ती काही दिसली नाही. फोन केला तर आउट ऑफ रेंज. तो स्वत:वरच वैतागला. त्याला अगदी असहाय्य वगैरे वाटू लागलं. मंगलाचा आवार म्हणजे अख्खं विश्व आहे आणि आपल्याला इथं कुणी म्हणजे कुणी ओळखत नाही. आपण अगदी बेसहारा आहोत असं काय-काय त्याला क्षणभरात वाटून गेलं. तो चिडचिडत गाडीपाशी आला; तर त्याला थिएटरासमोरच्या पूलावर ती चणे खाताना दिसली. त्याला एकदम हायसं वाटू लागलं. शॉर्टकट म्हणून तो चालतच पूलावर नेला. रॉंगवेतून गाडी न्यायचा विचार आला पण असा विचार त्याला झेपायचा नाही.
या पूलाचा फुटपाथ म्हणजे शहरातली सगळी गर्दी याच फुटपाथवरून फिरते की काय अशी स्थिती. त्याला अजिबात न आवडणारा पूल. पण आता ते महत्त्वाचं नव्हतं.
ती मात्र, जगाशी देणं घेणं नसल्यासारखं चणे खाण्यात मस्त होती.
"सॉरी, सॉरी. उशीर झाला. पण तू जायचं ना आतमधे. मी आलोच असतो ना..''
तिने एक जळजळीत लूक दिला. "राहू दे, पिक्चर कुठला? हे सुद्धा विचारलं नव्हतंस.''
त्यानं कसनुसा चेहरा केला. आपली पडती बाजू हे त्यानं डोक्यात घेतलं अन हळूच म्हणाला, "अगं पण तू मला मेसेज करून ठेवला असतास.''
"हो का! वेळेवर येण्यासाठी शंभर मेसेज केले तरी यायचा तेव्हाच आलास. पिक्चरचा मेसेज करून स्क्रीनचा घोळ घातला नसतास कशावरून आणि आत बसल्यावर मी पिक्चरचा स्क्रीन पाहणं अपेक्षित आहे, मोबाईलचा नव्हे. मोठ्या पडद्यासमोर बसून वाट पाहणार्यांतली मी नाही. ''
"सॉरी, सॉरी, सॉरी. चल आत्ता जाऊ. तिकीटं?''- तो. तिनं नाक मुरडलं.
"मधून? मधून कुणी पाहतं का पिक्चर. आणि तुझ्या वेळ पाळण्याच्या सवयीची मला सवय झालीये. मी चोख व्यवहारी. तिकीटं काढलीच नाहीत.'
"ये मग झालं तर. मला वाटलं पैसे वाया गेलं म्हणून इतकी चिडलीस?'' तो ताण सैलावत म्हणाला.
"कमाल! माझ्या चिडण्याचं कारणच ठाऊक नाही!''
"छोड ना अब. सॉरी म्हटलं ना. चल, इथं मस्त गप्पा मारूयात आणि हो सकाळी, तू कसला सोक्षमोक्ष म्हणत होतीस. '' तो तिला विचारत होताच की एक पस्तीशीतली बाई समोर उभी राहिली. कपाळावर रूपयाएवढं ठसठशीत कुंकू आणि हातात देवीचं टोपलं.
"देवीचा आर्शिवाद घ्या पोरांनो. रूपया, दोन रूपये. काय मनाला येईल ते, जबरदस्ती नाही. तसा तुमचा जोडा अगदी मेड फॉर इच आदर दिसतोय.'' देवीवाल्या बाईचं इंग्रजी ऐकून त्याला फस्सकन हसायला आलं. पण ती चण्यातच गुंतलेली होती. बाईचं बोलणं कानावर न पडल्यासारख ती गाणं गुणगुणत होती. तो मात्र देवीवाल्या बाईच्या इंग्रजीवर खूश झाला. एरव्ही पैसे देण्याच्या भानगडीत न पडणारा तो, त्याने पाचाचं नाणं टोपलीत टाकलं तसं तीही "ग्रॅज्युएट आहे' म्हणत पुढे गेली.
जाणार्या बाईच्या दिशेने बघतच तो म्हणाला, ""साला काय ना! फिल्मीपणा. मुके, बहिरे, देवीदेवतावाले, पूजारीबिजारी या सगळ्यांचा चित्रपटातला रोल हाच, हिरोहिरोईनला पाहून म्हणायचं, तुम दोनो की जोडी खूब जम रही है, भगवान आपकी जोडी सलामत रखे. त्यांचं बघून हे प्रत्यक्षातले पण तसेच. एक स्त्री-एक पुरूष म्हटलं की कपल करूनच मोकळे. त्यांना वाटतं आपण यांना खूश करतोय. निव्वळ शहाणपणा. आपणही तिला कपल वाटलो...काहीही यांचं.'' तो बोलून स्वत:च हसत राहिला.
"हं..हुश्श.फायनली. आत्ता जी येऊन गेली ना मीच तिला म्हटलं होतं, इथून एक राऊंड मार आणि असं असं म्हणं. हां म्हणजे इंग्रजीतनं म्हणणं हे तिचं इम्प्रोव्हायजेशन '' ती पूलाच्या कठड्यावरून उतरत म्हणाली.
"अगं काय हे..काय म्हणायच...'' त्याने गडबडून सरळ उडी मारली, पाण्यात नाही. जमिनीवर.
"हो, एकदाच कळलं तरी आपण कपल नाहीयोत. रोजची कटकट होती. डोक्याला शॉट लागायचा. जीवाचा घोर आणि रात्री तर कुणी ढोल वाजवून झोप उडवतोय असं व्हायचं. आता कसं बरं वाटतंय. मन शांत शांत झालं. डोक्यातल्या गरम वाफासुद्धा कमी झाल्यात..हम्म, आपण कपल नाहीयोत तर.. ''
त्याचा एकदम दिवा पेटला.
"ये, अगं थांब ना. ऐक ना. आत्ता नाहीयोत कपल. हां म्हणजे अजून तसे ऑफिशियली नाहीयोत. शीट् काय बोलतोय. मला वाटलं तूच चिडशील तिच्यावर म्हणून तसं म्हणालो. अगं म्हणजे, आत्ता नसलो तरी होऊ शकतो ना. मला आवडेल. ऐक तर..''
ती चणे खात बिनधास्त चालू लागली, गालातल्या गालात हसत आणि तो तिच्या वेगाशी मॅच करत निघाला.. सांगत, समजावत, परेशान होत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...