बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची. 
माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त एका वर्षानं मोठा आहे. दिवसा माझ ऑफिस असल्यानं सुफियान दिवसभर त्याच्या नाना-नानीकडं असतो. त्यामुळे संध्याकाळी घरी गेल्यानंतर सुफियानचं दार उघडायच्या आधीच शोना भैय्या, शोना भैय्याअसं सुरू होतं. अन सुफियानही दिवसभर नसल्यानं शोना आणि चौथीत असलेला त्याचा मोठा भाऊ शौर्य दोघंही आनंदानं त्याच्याशी खेळायला येतात. 
शोनाचं घरचं हॉल, भल्या मोठ्या सोफासेट, जमिनीवर कारपेट, फर्निचर यानं भरलेल आहे. किचन-बेडरूममध्येही तशीच अवस्था असेल कदाचित. मी कधी हॉलच्या आतही गेलेली नाही पण दारातून हॉल नंीट दिसतो. त्यामानाने आमचं घर हे अगदीच सुटसुटीत आहे. सामानाची फारशी गजबज नाही. त्यामुळं ही मुलं फ्लॅटच्या मधल्या पोर्चमधून खेळून कंटाळली की आमच्या घरात शिरतात. घरात तसं काही फुटण्याबिटण्याची भानगड नसल्यानं मीही फारशी कधी रोखटोक करत नाही. शिवाय सुफियानही थोडसं सोशल व्हावं ही भावना असतेच. पण त्यांच्या खेळाकडं बघताना माझ्या लक्षात आलं की या शोनाला सुफियानची ट्रकसारखी असणारी गाडी खूप आवडते. त्या गाडीवर बसून पायानं सरकवत चालवायची गाडी आहे. शोना आमच्या घरात शिरला की त्याची नजर ती गाडी शोधत असते. गाडी दिसली की तो लगेच त्यावर रूढ होतो. सुफियान लगेच मग मुझे नही खेलने देताअशी भुणभुण सुरू करतो. (ती गाडी तशीच पडून असली तरी सुफियानला दिसत नाही पण शोनानं किंवा अन्य कोणी घेतलं की लगेच त्याला मालकी हक्काची जाणिव होते) सुफियानला शेअरींगही गोष्ट कळावी म्हणून मी दोघांनाही सांगितलं की एकदा तो खेळेल, एकदा तू खेळायचं.पण शोनाला ती गाडी प्रचंड आवडत असल्यानं तो काही एका राऊंडमध्येच उतरायचा नाही. परत परत खेळायचा तोपर्यंत सुफियानची तणतण सुरू व्हायची. शेवटी काही वेळा चिडून मग मी ती गाडीच ठेवून द्यायला लावायचे. कोणीच खेळायचं नाही. दुसरा कोणता तरी खेळ खेळा म्हणून सुनवायचे. यावर सुफी लगेच भैय्या तुम्हारे घर में गाडी खेलेंगे म्हणत त्याच्या घरात शिरायचा. 
सुफियानचा गाडी खेळतानाचा अडथळा शोनाने नेमका हेरला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्यानं एक शक्कल लढवायला सुरूवात केली. आम्ही घरी पोहचलो की तो त्याचा अभ्यास वगैरे उरकून आमच्या घरचं दार वाजवायचा. दार उघडलं की लगेच तो त्याच्याकडची कुठली तरी गाडी सुफियानच्या समोर धरायचा. ये गाडी बहोत अच्छी है, बहोत भागती हेै, तू खेल हांअसं सांगून गाडीचं प्रमोशनही करायचा. त्याच्याकडं नसलेली आयतीच एक गाडी मिळते म्हटल्यावर सुफियान खूश व्हायचा. तो खूश झालाय हे एकदा का शोनाला कन्फर्म झालं की तो हळूच त्याच्या आवडत्या गाडीकडं सरकायचा. गेले कित्येक दिवस शोनाचा हा डाव मी बघत होते. मला गंमतही वाटत होती की एवढ्याश्या पोराला कसं कळलं असेल ना आपल्या अडथळ्याला अन्य कामात गुंतवून ठेवलं की आपला कार्यभाग साधणं सोपं. त्यानंतर एकदा शोना नेहमीप्रमाणं घरात आला आणि गाडीवर जाऊन बसला, मी आपलं सहजचं शोनाला म्हटलं की, तुझी गाडी घेऊन जा बाळा. त्याला आता होमवर्क पुर्ण करायचं आहे. अभ्यास वगैरे काही नाही मी आपलं असचं त्याला म्हणतं होते. त्याने त्याची गाडी न्यायला सांगत आहेत म्हटल्यावर तो त्याच्या आवडत्या गाडीवरून नाखूशीनं उतरू लागला. मी तर त्याला असं काहीही सांगितलं नव्हतं. पण त्याला वाटलं आपली न्यायची म्हणजे त्याची द्यायची.शेवटी त्याला म्हटलं, तुझी ने गाडी पण ही खेळतोयस तर खेळ. सूफी मम्माशी गप्पा मारणार आहे. तो अगदी आनंदून बाहेर गेला. त्याची भारी गंमत वाटली.
ईदच्या दिवशी शोनानं, सुफीयान धुमाकूळ घालत होतं. घरभर कचरा करतील, घाण करतील म्हणून मी दोघांना रागवलं आणि एका जागी बसून खेळा नाहीतर बाहेर पळा म्हणून सांगितलं. थोडा वेळ शांततेत गेल्यावर दोघ पुन्हा पकडापकडी करत घरभर धावू लागले. बेडवर नाचू लागले. त्यामुळे सुफियानला एक फटका मारून, शोनाला म्हटलं, ‘चूपचाप खेलना है तो खेलो. घर गंदा नही करना है आज हमारे घरमें ईद है ना!त्यावर तो पटकन म्हणाला, ‘हां, आण्टी सबके घरमें ईद है. वो नीचे के घरमें, सुहाना के घरमें, उपर के नानी के घरमेंत्याच्या उत्तरानं मला कसतरीच झालं. मी असं बोलायला नको होतं असं वाटत असतानाच, सुफीयान मला म्हणाला, ‘और शोना भैय्या के घरमें भी ईद है मम्मा. शोना भैय्याको तूने शिरकुमा दी क्या?’ मी अवाक.
ईदनंतर सुफियान सोमवारी शाळेत गेला. त्या दिवशी त्यांच्या शाळेत आषाढीचा सोमवार साजरा करायचा म्हणून सर्वं मुलांनी पांढरे कपडे घालून यायचं असं सांगितलेलं होतं. पण ईदच्या दुसर्‍या दिवशीही सुफियानची सुट्टी झाल्यानं हा निरोप आम्हाला मिळालाच नव्हता त्यामुळे तो शाळेच्या युनिफॉर्ममध्येच शाळेत गेला. मुलांनी पांढर्‍या रंगाचे कुर्ते,झब्बे घातले होते. शाळेतून घरी आल्यावर सुफियान म्हणाला, मम्मा आज स्कुलमें सबने अल्लाला के कपडे पहने थे। एकदोनदा त्याच्या आजोबांबर मस्जिदमध्ये नमाजला गेल्यानंतर त्याने असेच कुर्ता पायजमा घातलेली लोकं पाहिली होती त्यामुळे त्याच्यासाठी असे कपडे घालायचे म्हणजे अल्लाला करनेके कपडेपुढे मग तो म्हणाला अल्लाला के कपडे पहने के सबने माऊली माऊलीएैसा बोले. सोबत टाळ वाजविण्याची कृती. भारीच गमंत आहे ना.


1 टिप्पणी:

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...