शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

माझे शरीर...माझे मन...माझी निवड


माझं आयुष्य मी माझ्या परीने जगणारं...आणि त्या आयुष्याची रूपरेखा काय असावी, त्यातील सीमा काय असाव्यात, कुठे मी मुक्त व्हायचे अन कुठे कोषात जायचे या सगळ्याचा निर्णय माझा. माझे शरीर, माझे मन, माझी निवड...तो माझा अधिकार आहे आणि अन्य कोणाचाच, विशेष करून पुरूषांचा तर अजिबात नाही. असं जर एखादी स्त्री खुलेपणाने सांगू पाहत असेल तर त्यात काय  वावगं आहे. 
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘माय चॉईस’ हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. खुलेपणाने मुक्त होण्याची निवड माझी आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रीची आहे. मी, माझं आयुष्य आणि माझी निवड इतकी साधी त्रिसुत्री प्रत्येक स्त्रीला अनुभवयाचं आहे हे सांगण्याचे धाडस म्हणजे ‘माय चॉईस.’ यावर बºयाच उलटसुलट चर्चा सध्या रंगत आहेत. माझ्या मुक्त जगण्याविषयी किंबहूना जगण्याच्या सम-समान अधिकाराविषयी स्त्रीने तोंड उघडले की ते कसे चूक आहे, त्याची काय आवश्यकता  अशा शब्दांत संभावना सुरू झाली आहे पण खरे तर स्त्री असो कि पुरूष हा मुद्दाच गौण आहे. इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि हे जगणं आपल्या आवडी-निवडीनुसार हवे आहे. असं जर कोणाला सुचवायचे असेल तर त्यात  आभाळ कोसळण्यासारखं काय. अन या भावनांसाठी आपले लिंग काय आहे हा मुद्दा येतोच कुठून आणि कसा? 
विशेष म्हणजे, या व्हिडीओतून अन्य बºयाच गोष्टीतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झालेला असतानाही  केवळ त्यातील शरीरसंबंध, लग्नाविषयींच्या विचारांवरच मोठ्या प्रमाणात पुरूषवर्गाकडून हल्ला केला जात आहे. मुळात एखाद्या स्त्रीने लग्न करावे की करू नये, संबंध ठेवावेत की ठेवू नये, लग्नाआधी ठेवावेत की लग्नाबाहेर. ते ही ठेवावे की ठेवू नयेत हा सर्वस्वी अधिकार तिचा आहे. इतकं नुसतं ती बोलली तरी केवढा गदारोळ झाला. एरवी साधी स्वत:च्या घराचीही जबाबदारी न उचलणाºया पुरूषांना संस्कृती-समाज रक्षणाची जबाबदारी का वाटू लागली. का इतका पुळका येऊ लागला? बलात्कार झाले तर मग कशाला मुलींना बोलायला हवं? मुलीही सिगारेटी फुंकत फिरतातच की आता  वेगळं काय हवं यांना, मुलांच्या गाडीवर त्यांना बिलगून बसतात मग यांच्यात शरिरसंबंध आले नसतील हे कशावरून. म्हणजे इतकी सगळी मुभा मुळातच असताना आता नवी ही ‘चॉईस’ची भानगड कशाला म्हणत हे पुरूष किती आराडाओरडा करत आहेत? अनादी काळापासून समाज स्त्रीला जे केवळ भोगाची वस्तू समजून वापरत आहे. तिचे दमन करत आहे, ते आता इतक सहजासहजी होणार नाही. कोणाला स्वीकारयचे कोणाला नाही त्या सगळ्याचा अधिकार माझा आणि सर्वस्वी माझा राहणार असं या व्हिडीओतून स्पष्ट होत असतानाही ही आपण त्याची नाळ उथळ आणि घाईघाईने असंस्कृतपणाशी का जोडायला पाहत आहोत. 
आपला आधुनिक विचारसरणी आणि संस्कार यात खूप मोठा झगडा होत आहे. आजही स्त्रीयांना सूख आणि वासनेच्या नजरेतूनच आपण पाहत आहोत का? स्त्री अन पुरूषाकडे पारंपरिक विचारसरणी, स्टिरीयोटाईप ठेवूनच पाहणार असू तर आपण कधी मोठे होणार अशा प्रकारच्या संवादाला सामोरे जाण्यास? या व्हिडीओतून ती किती प्रांजळपणे म्हणत आहे, तु माझ्या आत्म्याला बांधू शकत नाही, माझ्या शरीराला बांधू शकत नाही. माझ्या नावापुढे तुझे जे आडनाव मी लावते ते माझ्यासाठी शरिरावर चढवल्या जाणाºया इतर दागिन्यांसारखे आहे आणि ते कधीही बदलू शकते मात्र माझं तुझ्यासाठी असणारं प्रेम बदलणार नाही. त्याची किंमत कर, त्याचा आदर कर. माझा आदर करं त्यावर कोणीच चर्चा करत नाहीयेत.  केवळ लग्न आणि शरीरसंबंधांपुरते व्हिडीओवर चर्चा करून स्त्रीया पुरूषांना जे सांगत आहे की, बाबा रे मला माणूस म्हणून बघ, माझा आदर कर, माझ्या प्रेमाची किंमत कर मलाही तुझ्या बरोबरीची समज, तुझे सहजीवन समज  त्या मुळ संदेशालाच आपण कात्री देत आहोत का?
  मुळात दीपिकाला हे का सांगावं लागतं याचा आपण विचार कधी करणार आहोत का? अनादी काळापासून स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले गेले आहे आणि आजही ही या बुरसटलेल्या मानसिकतेचे पुर्णपणे निर्मुलन झालेले नाही. वयात येऊ घातलेल्या नवजात मुलीवर आपण  जगाच्या सर्व कल्याणाची जबाबदारी टाकून मोकळे होतो. नैतिकतेच जोखड तिने व्हायचा हे शिकवत राहतो. तिच्या अराजकेतवर सगळ्यांचा रोष. तिच्या वागण्या-बोलण्यावर इतकचं काय हसण्यावर ही कोणा वडिलधाºयाचा अंकुश असतो. ती कतृत्वाने कितीही यशस्वी झाली तरी संसारासाठी तिनेच मरमर करायचे. कित्येकवेळा बायका घराबाहेर पडण्यापुर्वी घरातील इतरांची सरबराई करून किंवा किमान तशी व्यवस्था करून निघतात. संध्याकाळच्या एखाद्या समारंभात किंवा कार्यालयीन बैठकीमुळे घरी येण्यास उशीर होणार असला की, घरात स्वयंपाक तयार नसल्याचा अपराधीपणा घेऊन त्या वावरत राहतात. एखाद्या दिवशी नाही केला तिने स्वयंपाक तर काय आभाळ कोसळणार असते? पण अशा साध्या साध्या गोष्टींतूून तिला बांधून टाकण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे होत आला आहे. व्हिडीओतील स्त्रीया या उच्चभ्रू दिसतात पण म्हणून त्या स्वतंत्र आहेत का? त्या जे काही सांगत आहेत ते प्रत्येक स्तरातील स्त्रीया अनुभवत आहेत. त्यांच्या वेदनांची, वैफल्याची दाहकता निराळी असेलही पण त्याची जातकुळी एकच आहे.
आजही तिचं अस्तित्व पुरूषासाठीच का मानले जाते. तिने कसं असावं, रहावं हेही पुरूषानेच का ठरवायचं. माध्यमातील स्त्री देखील आपण कशी दाखवतो तर ती पुरुषाला कशी दिसेल, आवडेल याच स्वरूपात. हे वर्षानुवर्षे इतकं स्त्रीवरही बिंबवलं आहे की, ती स्वत:ही जेव्हा आरशात पाहते तेव्हा आपल्या मित्राला, प्रियकराला, जोडीदाराला आपण कसे दिसू हेच न्याहाळत राहते. स्त्रीचा आकार, तिचे नटणेही पुरूषासाठीच. म्हणजे तिचा अधिकार कशावरच नाही, ना तिच्या स्वत:च्या शरिरावर, ना तिच्या स्वत:च्या भावनांवर  हे किती अनाकलनीय आहे. 
पण आता बास. इतक्या वर्षापासून माझ्यापुरती माझी भूमिका म्हणत हळूवारपणे तथाकथित खोट्या संस्कारांच्या-सोशिकते-नैतिकतेच्या ढुंगणावर लाथ मारून स्त्रीया उभ्या राहत होत्या त्या आता उघडपणे ही हे करून दाखवू लागल्या आहेत. माझ्या चौकटींची बंधने सैल करून मला माझ्या शरीराचे लाड करायचे आहेत, माझ्या मन-भावनांची पुर्तता करायची आहे आणि त्या सगळ्याची निवड माझी आहे. हे बोलण्याचे धाडस करू लागल्या आहेत. पुरूष आणि समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेचवर हल्लाबोल करू लागल्या आहेत.  स्त्रीने किती सक्षम व्हायचं आणि कुठे तिच्या विकासाला खुंटी घालायची याचा निर्णय इतर कोणी का घ्यावा.  तिच्या आयुष्याचा निर्णय आणि निवड ती निश्चितच घेऊ शकते. अन हे सगळं करणार म्हणजे ती स्वैराचारी असं कसं काय? बंधने सैल करायची आहेत, थोडसं मुक्त व्हायचं आहे. अन ते मी स्त्री आहे म्हणून नव्हे तर माणूस आहे म्हणून तर त्यावर इतर कोणा सोम्या गोम्याला इतका का त्रास व्हावा. तथाकथित संस्कतीरक्षकांना संस्कृतीची आणि चौकटींची आठवण होऊन इतकं अजीर्ण का व्हावं?
काहींना असा ही प्रश्न पडला आहे की, स्त्री सक्षमीकरण म्हणजे लग्न आणि सेक्स इतकचं उरलं आहे का?तिचे शिक्षण, तिचा रोजगार, तिचं जगणं याविषयी काहीच देणघेणं नाही का? पण हा प्रश्न उपस्थित होताना जाणवत होते की, हेच तर म्हणत आहेत त्या बिचाºया स्त्रीया की, मला काहीतरी चॉईस आहे का? मी करू का निवड. तुम्हीच का आम्हाला लग्न, मुलबाळ आणि शरीरसंबंधापुरतं मर्यादित ठेवलयं. आता पहिली सुरूवात याच प्रश्नांनी होणार. साधं माझ्या शरीरावर माझा अधिकार नसेल तर पुढच्या सक्षमीकरणाच्या, अन विकासाच्या काय गप्पा मारताय? एखाद्या स्त्रीला नोकरी करायची की नाही, पगारासाठी करायची कि आनंदासाठी याचं तरी आहे का स्वातंत्र्य.  कित्येक महिलांना मला आज शरीरसंबंध नको असं म्हणण्याची संधी ही मिळत नाही तोपर्यंत नवरोबा शरिरावर आरूढही झालेला असतो. अशा परिस्थितीत शिक्षण न रोजगाराची भीक देऊन तुम्ही काय सिद्ध करू पाहताय? 
मुळात प्रश्न स्त्री का पुरूष, तू का मी असा नाहीच. प्रश्न आहे तो आपपल्या अस्तित्वासाठी जगण्याचा. निवड करण्याच्या अधिकाराचा. स्त्री किंवा पुरूष कोणीही नीतीमत्ता सोडली, सदसदविवेकबुद्धी सोडली तर ºहास निश्चितच आहे. त्यासाठी स्त्रीयांनीच कायम सोशिक आणि नैतिकतेचे बुरूज सांभाळण्याचे काय कारण? स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी स्वैराचाराच माज पायताणाखालीच ठेवावा लागतो. या व्हिीडीओमुळे, स्त्रीया मुक्त होण्याची धांदलीत अराजकता पसरवत आहेत असा आवेश आणण्याची गरजच काय जेव्हा अराजकतेच्या ºहासाचा नियम तर स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही सारखाच आहे. तेव्हा तथाकथित संस्कतीच्या चाहत्या स्त्री व पुरूषांना विनंती आहे की, आता मोठे व्हा, विचारांच्या कक्षा अरूंद करा. अन आता तुम्हीच समजून घ्या की, संस्कार म्हणजे स्त्रीयांच्या पायात साखळदंड ठोकणे नव्हे अन स्त्रीयांना ही हे ठाऊक आहे की, मुक्त व्हायचं म्हणजे स्वैराचाराचे गर्भारपण वाहणं नव्हे. !!!

1 टिप्पणी:

  1. heena ekdam barobar bolalis...khup vait watat jeva ase vagvile jate mahilana...so bad...samajachi mansikata change zali pahije...and i m with u for this point and always ....

    उत्तर द्याहटवा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...