शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

लेकीचा मित्र

परवा, माझ्या कामावरच्या एका मैत्रिणीने, वंदनाने तिचा नवीन आयपॅड दाखवला. उत्सुकतेने तो आयपॅड हाताळत होते. त्याचे फिचर्स,  अ‍ॅप्लिेकशनविषयी बोलता बोलता सहजच आयपॅडची किंमत विचारली तर ती म्हणाली, पंधरा हजार पण हे मी नाही घेतलेले. गिफ्ट मिळालयं. माझ्या मनात ‘वॉव’ असं झालं. तेच भाव चेहºयावर होते. शिवाय प्रश्नही की ‘कोणी दिला’. तिने ते अचूक हेरले. एका मित्राने दिल्याचे सांगत तिने आयपॅडचा किस्साच सांगितला.
खूप दिवसांनी तिच्या जिवलग मित्राची अन तिची भेट झाली. गप्पा गप्पांत तिने रोज कामानिमित्त रेकॉर्डसाठी कितीतरी पानांची झेरॉक्स काढावी लागत असल्याचे सांगितले. तसा, तो म्हणाला, अग मगं आयपॅड घे ना. त्यातच सगळं स्टोअर करता येईल. शिवाय आत्ता आयपॅड काय इतके महाग राहिलेले नाहीत. त्यावर ‘सध्या माझी ऐपत नाही‘ असं तिने खट्याळ अन उडवून लावलेलं उत्तर दिलं. तसं तिच्या मित्राने तिला कारणाशिवायचं, आयपॅड गिफ्ट करण्याचं डोक्यात खूळ घेतलं. नुसतं घेतलं नाही तर प्रत्यक्षात दिलचं. तिने हा किस्सा सांगितल्यानंतर मी अभावितपणे विचारलं, कोणी खास मित्र आहे का? यावेळी खास वर जोर होता हे ओळखून ती म्हणाली,  निखळ बिखळ म्हणतात ना तसा मित्र गं. मित्र म्हणजे मित्रचं. बाकीच्या सर्वसामान्य मित्रांपेक्षा थोडा वरचढ इतकचं पण शेवटी मित्र. आकर्षण वाटावा, सहवास मिळावा असा खरा पण पुन्हा पुन्हा तेच की नुसता मित्र. बाकी तुझ्या डोक्यातले घोडे ज्या मुद्यापासून धावायला सुरू करतात, बरोबर त्याच मुद्यावर येऊन आम्ही थांबतो. अशी आमची रिलेशनशिप. 
बोलता बोलता ती म्हणाली, गावाकडच्या वातावरणात जगलेल्या आईला  मित्र, मैत्री हे समाजावणं खूप अवघड गेलं. त्यांना मित्र म्हणजे एकच ठाऊक ‘यार’ म्हणून. पण हळूहळू रूजवत, बिंबवत नेलं अन आत्ता थोडासा फरक जाणवतो, मग तीच कधीतरी कोणाची तरी आठवण काढत म्हणते, अगं खूप दिवस झाले तुझा अमूक एक मित्र नाही आला, बोलाव की त्याला या रविवारी  जेवायला. तिचा हा बदल खूप सुखावह वाटतो.
नुकताच झालेल्या मैत्रिदिनाला या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. डोक्यात हाच विचार घोळत राहिला.  
मला ही आठवतयं. सातवी आठवीची गोष्ट आहे. समीर, माझा वर्गमित्र. चाळीतून जात असताना, त्याला मी दिसले. त्याने हाक मारली आणि आम्ही चाळीतच एका बाजूला उभे राहून बोलू लागलो. गप्पा गोष्टी बराच वेळ रेंगाळल्याने, आईने हाक मारली. 
विचारले,तो कोण होता? 
‘वर्गमित्र ’
या उत्तराने तिचे पूर्ण समाधान झाले नाही. उलट तिने यावर मला, ‘‘ मुलांशी रस्त्यात उभे राहून बोलायचे नाही. फारच काही बोलायचे असल्यास आणि मित्र वगैरे असल्यास घरात बसून बोलावं. रस्त्यात बोलणं बर दिसत नाही. पप्पांनाही ते आवडत नाही. (तिला न पटणाºया,आवडणाºया गोष्टी ती सरळ पप्पांच्या नावे ढकलून सांगायची, म्हणजे पुढे प्रतिप्रश्न करायला ते समोरच नसायचे) ’’ अशी धमकीवजा सूचना तिने केली. मी ही निमूटपणे मान डोलावली. तिच्या बोलण्याचा रोख, ओघ मला तेव्हाही कळला होता. 
मुलींचे मित्र आणि प्रश्नचिन्ह असे बहुतेक एक समीकरणचं असावे. हे समीकरण बहुतेक मुलींना आपपल्या पद्धतीने हाताळत घरच्यांच्या मनात त्यासाठी जागा करावी लागते. मुलीच्या मित्राचा स्वीकार करण्याची पालकांची तयारीच नसतेच फारशी. एखादी मैत्रीण कशी चटकन घरात येते, रूळते, लेकीची मैत्रीण म्हणून आई बाबासुद्धा किती जिव्हाळयाने चौकशी करतात. पण तेच एखाद्या मित्राच्या बाबतीत....मुळात त्याला घरात प्रवेश आहे की नाही इथपासून सुरूवात होते. प्रवेश असला तरी कधी, कितीवेळ असं सगळं अलिखित टाईमटेबलच ठरवलेलं असतं. अशा परिस्थितीत त्यांना पालकांकडून जिव्हाळा कमी आणि साशंक नजरांच जास्त मिळतात.  
मला आठवतं, शाळेत असताना ही घरात हे नीट समजावून सांगावं लागायचं की वर्गातील मुली मैत्रीणी तश्या मुले मित्र. इतकं साधं सरळं. आईला ते फारस अमान्य नसायचं (मनोमन पटलेलं ही असायचं)पण पूर्णपणे नाहीच. त्यांच्या दृष्टीने मित्र म्हणजे ‘कोणीतरी खास’. या खासची पण गंमतच. एखादा खास मित्र म्हटलं तरी त्यांच्या भूवया उंचावयाच्या. त्यांच्यादृष्टीने खास म्हणजे एकच ‘बीएफ’. मग पुन्हा एकदा उजळणी घ्यावी लागायची, खास म्हणजे इंग्रजीत ‘बेस्ट’ म्हणतो ना ते.
माझ्या घरच्यांच्या नशीबाने मी फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यामुळे मित्रांचा प्रश्न मुळातच मार्गी लागलेला होता. तरीही शाळेतील, चाळीतील, ओळखीतून झालेले काही मित्र असायचेच. अगदी चांगले मित्र वगैरे कॅटेगरीत मोडणारे नसले तरी मित्रच. तरूणपणाची वाटेकरी होऊ लागल्याने मग त्यांच्याशी कधी रस्त्यात बोलताना उभे राहिलो की मग आजी, काका सगळेच हटकायचे. ‘बेटा घर चलो, देर हो रही है’ नाहीतर ‘घरपे बाते करो’ अशा प्रेमळ हाका यायच्या. नेमकं काय म्हणायचंयं हे मित्र आणि मी दोघेही समजून घ्यायचो आणि मग कलटी मारायचो. यातही गंमत अशी असायची की,  आईबाबा, आजी-आजोबा, काका काकू असं सगळ्यांना दाखवायचं असायचं की अगं आमचा तुम्हा मुलांवर विश्वास आहे. तुम्ही वावगं काहीच वागणारं नाही. याशिवाय आम्ही पण ‘मॉडर्न’ आहोत. मुली-मुले बोलले तर काय बिघडलं असा आव असायचा आणि सेम टाईम जाब ही विचारयचा अशी दुटप्पी वागणूक़
बी. एस स्सी झाल्यानंतर एम.ए.च्या शिक्षणाला सुरूवात झाली.विद्यापीठात को-एड. मग रोज रोज भेटीतून, शेअरींगमधून चांगले मित्र ही गवसू लागले होते. आई चांगली मैत्रीण असल्याने तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणचे शेअरींग असायचे, त्याचप्रमाणे कळत नकळत घरी मैत्रिणींसारखंच मित्रांविषयीही बोलू लागले होते. तसं माझ्या घरी फार काही हिटलरीपद्धतीचं वातावरण नव्हतं. मुले चालणार नसली तरी अगदीच वर्ज्य नव्हती. शिवाय लहानपणापासूनच पालक जसे वेगवेगळ्या मुद्यांवर माझा ‘क्लास’घ्यायचे तशीच मी सुदधा नव्या जमान्यातील गोष्टी त्यांना पटणाºया भाषेत सांगायचे. वेगवेगळया पद्धतीने आमची उजळणी सुरू असायचीच. कॉलेजातील मित्रांविषयी सांगताना, त्यांची परिस्थिती, त्यांची हुशारी, त्यांचा अभ्यास, त्यांचे आकलन, समज याविषयी हळू हळू आईला कळू लागले. 
मित्र-मैत्रिणींचै नातं नीटपणे त्यांना उलगडावं म्हणून मग सरळ त्यांना घरीच बोलावू लागले. वंदनासुद्धा मित्रांना थेट घरीच घेऊन जायची. सेम माझ्यासारखचं. ईदनिमित्त, वाढदिवसानिमित्त त्यांच येणं वाढलं. मग ते ही घरी अगदी शहाण्या मुलांसारखे वागायचे. तरी उपजत मस्ती घालण्याची उर्मी काही सोडू शकायचे नाहीत. मग उगीच कशावरून तरी आलेल्या मैत्रीणींना छेडायचं. उचकवायचं. त्रास द्यायचा आणि इतकं करूनही पुन्हा काळजी, जिव्हाळ्याने राहायचं हे घरात आईसह सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागलं.  हळूहळू तर त्यांनी मोकळा एकांतच द्यायला सुरूवात केली. आमचं काय काय चालायचं यात त्यांचा डिस्टबर्न्स नसायचा. उलट पप्पांनाही सूचना असायची, त्यांच ते बघून घेतील. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.’ घरातूनच अशी हेल्थी मोकळीक मिळाली की नाती आणखी बहरून येतात.
एकदा आॅफिसच्या वारीत पायाचा छोटासा अ‍ॅक्सिडेंट झाला तेव्हा एक खास मित्र घरी सोडायला आला. आठ दिवसांनी डॉक्टरांकडे जायचे होते. तेव्हा घरापासून जवळ राहाणारा दुसरा एक मित्र सकाळी सकाळी आला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पहिला मित्र तिथे वाटच पाहत होता. दोघांनी मस्त काळजी घेतली. त्या मित्राने पुन्हा घरी आणून सोडले. २५ किलोमीटरचे हे अंतर त्याने माझ्यासाठी पार केले होते. त्यानंतर पुन्हा १३ किलोमीटरची चाकमोड (पायमोड सारखं गाडीचे चाकमोड) करून  आॅफिसला जाणार होता. या सगळ्या प्रक्रियेतील समंजसपणा, आस्था घरच्यांना नीटपणे उमगत होती. असे कितीतरी किस्से घडले. आश्वस्त करणारे मित्र किती जरूरीचे हे न सांगता त्यांनी समजून घेतले. मग शंका घेण्याचं प्रमाण घटायला लागलं. लेकीच्या मित्राविषयीच्या प्रश्नचिन्हाचे समीकरण त्यांच्यापुरते सुटू लागले तसे ते ही निर्धास्त झाले.
‘मित्र, मित्र असतात गं.’ हे घरच्यांच्या कानातून मनात उतरवताना खूप  चिकाटी अन सातत्य ठेवावं लागलं. आयुष्यात आपल्या मनीचे गुज ऐकायला जशी मैत्रीणींची गरज असते तशी विचारांचा थांग शोधायला मित्रांचीही. निखळपणे आपल्याला सोबत करणारा दिलखुलास दोस्तही मुलींना हवाहवासा वाटतो. एखादा किंवा एकापेक्षा जास्तही मित्र मुलींना असू शकतात. मित्र आहेत म्हणून लगेच ती काही वाईट होत नाही किंवा तिचा स्वभाव किंवा चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत नाहीत. निरलस आनंद देणारे, पाठिशी उभे राहणारे, मस्ती घालणारे, टपल्या मारणारे, शिव्या घालणारे मित्र असूच शकतात हे मग हळूहळू घरी पटू लागले. मित्रांची जागा उमगायला लागली. तशी उलटतपासणीसुद्धा थांबली आणि मित्रांसाठी घरचे दरवाजे कायमचे उघडले. (टाईमटेबल सोडून..)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...