Wednesday, December 14, 2011

ई-व्यसनाचा विळखा

न सांगता, आतल्या आत गुदमरवून टाकणार्‍या आधुनिक ई-व्यसनाचा विळखा..

किती तास असता नेटवर? काय करता? काम करून झाल्यानंतरही लॉग आऊट व्हावसं वाटत नाही? कमेन्टस्, लाईक पासून ते ‘’ पर्यंत सगळीकडेच अडकायला होतं. सोडवत नाही एकदा कॉम्प्युटरवर बसल्यानंतर? तुमचं होतंय असं? मग जरा सावधान.. कारण ही ई-व्यसनाची लक्षणं असू शकतात ! 

तुझंही असंच होतं??
‘हे., गेम आता माहीत झालीये. तिसर्‍या राऊंडपर्यंंत पोहोचलेय; पण पुढे काही गाडी सरकेना. चाहे जो भी हो, हा राऊंड पार केल्याशिवाय जेवायला उठणारच नाही.’ 
‘माथेरानच्या ट्रीपला नुकतीच जाऊन आलेय, दहा मिनिटांपूर्वी फेसबुकवर फोटो अपलोड केलेत. बघते ना, काही कॉमेन्टस आल्यात का?’
हे असंचं, सेम टु सेम तुलाही होतं. काय म्हणून काय विचारतोस, असं म्हणजे सतत इंटरनेटच्या खिडकीतून डोकवा डोकवी केल्यावाचून चैनच मिळत नाही, असं? सतत कॉम्प्युटर उघडून त्यात तोंड खुपसून बसावसं वाटतं? उगीचच..कारण असो वा नसो कामाच्या साईटस पाहून झाल्या तरी इंटरनेटला बाय बाय म्हणावसंचं वाटतं नाही, असं. असं होतं? 
असं कधी तरी होणं हे ठीक आहे रे. कामासाठी नेटच्या संपर्कात राहणं, इट्स ओके. कामाशिवाय फालतू टाईमपास करण्यासाठी अर्धा-एक तास नेटवर सैर करणंसुद्धा नॉट अ प्रोब्लेम. इतना तो तेरा हक बनता है यार. पण दिवसाला आठ-आठ, बारा-बारा, पंधरा-पंधरा तास नेटवर बसतोस? 
काय? उत्तर हो आहे. तो बेटा दिल थामो कुछ तो गडबड है. सतत सतत इंटरनेटच्या व्हर्चुअल जगण्यातच मौज वाटणं हे चांगलं लक्षणं नाहीये. दिवसातील तासन्तास नाठाळासारखे फेसबुक, टीटर, ऑकरुट, जी-टॉक, गेम्स साईट किंवा मग त्या ‘फुल्या फुल्यां’च्या साईटसवर ऑनलाईन राहण्याचा शौक असेल, तर ही एक प्रकारची नशा आहे आणि कोणत्याही प्रकारचा नशा वाईटच मित्रा.
तुला सांगते, आजच्या युगात हे एक नवं ई-व्यसन उदयास आलं आहे. खर्‍या-खुर्‍या आयुष्यातून ऑफलाईन होऊन जगभरच्या सोशल साईट्सवर ऑनलाईन होण्याचं फॅड म्हणजे हे व्यसन आहे. आता तू कपाळावर आठय़ा पाडून, नाक फुगवून चेहरा भलताच रागीट करून विचारशील ‘नेटसॅव्ही असणं ही आजची काळाची गरज झालेली असताना तुला कुठल्या उपटसुंभाने सांगितलं, इंटरनेटच्या जगात वावरणं हे व्यसन आहे म्हणून. ही नशा मजा देणारी आहे. उगीच भलत्याच गोष्टी डोक्यात घालून घेऊ नकोस.’
सॉरी टू से; पण मला सांग आपण व्यसन कशाला म्हणतो? नाही म्हणजे, सांग ना? एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि मग ती मिळवणं किंवा करणं हे नॉर्मल आहे. त्यात चूक ते काहीच नाही; पण एखाद्या र्मयादेपेक्षा जास्त वेळा एखाद्या गोष्टीचं वेड लागणं आणि मग ते न मिळाल्याने अस्वस्थ वाटणं, चुकचुकल्यासारखं होणं, त्रास होणं हे काय आहे मित्रा. एखाद्या गोष्टीची गरज संपून चटक लागणं हे व्यसन नाही तर आणखी काय? 
जस्ट इमॅजिन, आपण चारचौघात उभं आहोत. अवतीभवती माणसं आहेत. नुसती माणसं नाहीत तर आपल्याला घट्ट सख्यं वाटणारी आपली माणसं आहेत. तरीही आपण सारखं सारखं मोबाईलचा कि पॅड अनलॉक्ड करतो. कधी वेळ पाहतो. कधी उगीच मेसेज आणि काहीवेळा भवतीच्या जिवंत माणसांचा कंटाळा वाटून जी-टॉकवर ‘हाय, हेलो’ करून प्रतिसादाची वाट पाहत राहतो, याला काय म्हणायचं मित्रा. 
हे तंत्रज्ञानाचं युग आहे ठाऊक आहे. टेक्नोसॅव्ही, इंटरनेटसॅव्ही असण्याशिवाय पर्याय नाही मान्य. पण म्हणून तासन्तास असं बिनकामाचं राहायचं? दिवसाच्या चोवीस तासातील अनेक तास भोवतीच्या जिवंत जगाशी फारकत घेऊन आभासी जगणं खरा-खुरा आनंद देऊ शकेल का, याचा तूच विचार कर आणि सांग. मला हे कळलंय म्हणून मी माझ्यापुरतं उत्तर शोधलंय.. तू काय ठरवतोयस??
***

इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार इतक्या वेगाने होत आहे की, या लाटेत हरवून जाणार्‍या तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या जगासमोरच ‘ई-व्यसनाधीनता’ ही एक समस्या झाली आहे. चीन-अमेरिकेत व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत. इथे तर इंटरनेट वापरासाठी नियम-कायदे करण्याची 
धडपड सुरू झाली आहे. कोरियामध्ये हा प्रश्न डोकं वर काढत आहे. भारताची परिस्थितीही वेगळी राहिलेली नाही. इंटरनेटच्या आहारी जाऊन आपलं भविष्य पणाला लावलं जात आहे. पूर्वीसारखं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची गरजही आता उरली नाही. हातातील मोबाइलमध्ये चालता-बोलता सहज इंटरनेटचं जगं तुमच्या पुढय़ात उभं राहत आहे. ई-व्यसन हा एक मानसिक आजार असल्याचंही काही देशांत गणलं जात आहे. एखादी गोष्ट न मिळाल्यावर वाटणारी अस्वस्थता, चिडचिडेपणा, नैराश्य ही सगळी लक्षणं इंटरनेटसॅव्ही तरुणांना इंटरनेट न दिल्यावर होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी जसे उपाय योजावे लागतात तसेच उपाय या व्यसनातून बाहेर पडण्यासाठीही करावेच लागतात.
पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रावर ई-व्यसनी तरुणांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. ई-व्यसन आणि त्याचे परिणाम ही नेमकी भानगड काय आहे हे समजावून घेणं आणि ‘ऑक्सिजन’च्या वाचक मित्रमैत्रिणींना समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. याचसाठी मुक्तांगण व्यसनमुक्क्ती केंद्राच्या उपसंचालिका ‘मुक्ता पुणतांबेकर’ यांच्याशी ‘ऑक्सिजन’ने विशेष संवाद साधला.
१२-१५ तास जातात नेटवर?
‘मुलं १२-१५ जर तास इंटरनेटला पुढय़ात घेऊन बसायला लागली, तर हे नॉर्मल नाही, असं समजावं. इतका वेळ जर ते नेटवर वाया घालवत असतील तर त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याची गरज आहे. सध्या मुक्तांगणमध्ये येणार्‍या मुलांची संख्या आणि याविषयीची विचारणा पाहता १५ ते २२ हा वयोगट सर्वाधिक सेन्सिटीव्ह आहे. मुळातच हे वय फार सारासार विचार करणारं नसतं. शिवाय शारीरिक कष्ट केल्याखेरीज जर तुम्हाला तथाकथित आनंद मिळणार असेल, तर तो कुणाला नको आहे? हीच परिस्थिती या मुलांची होते आणि हळूहळू त्यांचे इंटरनेटवरचे तास वाढून व्यसनात रूपांतरित होतात. 
मध्यम-उच्च मध्यम वर्गात हे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. घरच्या घरी इंटरनेटची सोय झाल्याने मुलांना बाहेर जाण्याची गरजच उरलेली नाही. पालकांचं मुलांवरील थेट नियंत्रणच कमी होताना दिसत आहे. या उलट, आपल्या चिमुकल्या-चिमुकलीला सहज इंटरनेट वापरता येतो, कॉम्प्युटर किती मस्त हाताळतोय याचीच पालकांना गंमत वाटते. लहानगी मुले खोटी वय टाकून सोशल साईट्सवर एन्ट्री मिळवत आहेत. तंत्रज्ञानाविषयीची माहिती पालकांपेक्षा मुलांना जास्त असल्याने सहज त्यांना वेडात काढण्यात येत आहे. मुलांच्या कौतुकात वाहून जाताना पालकांनीही तारतम्य सोडले आहे. शिवाय काही वेळा मुलांना घरात बंद करून पालक पाटर्य़ांना जातात, मिटिंग्जसाठी बाहेर पडतात. इतर कोणीच घरी नसल्याने मुलं काय करायचं म्हणून नेटशी खेळत राहतात आणि त्यातच गुंतून पडतात.
मुक्तांगणवर नुकतीच एका सात वर्षाच्या मुलीच्या पालकांनी विचारणा केली आहे. या मुलीने खोटं वय टाकून फेसबुकवर अकाउंट उघडलं होतं. (पोरीची कमालच म्हणावी!) तिची फ्रेंड रिक्वेस्ट मुलीच्या आईच्या मैत्रिणींना मिळू लागली, यावरून ती फेसबुकवर असल्याचं उघड झालं. असे प्रकार पालकांच्या अपरोक्ष नक्कीच घडत असतील. यामुळे पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. दोन्ही पालक नोकरी करणारे असोत वा आई गृहिणी, आपलं मूल नेमकं काय करतंय, त्याच्या विश्‍वात कसली उलथापालथ सुरू आहे याचा कानोसा सतत पालकांनी घेतला पाहिजे. मुक्तांगणवर विचारणा होणार्‍या मुलांपैकी बहुतेकांच्या आया या गृहिणी आहेत, त्यामुळे नोकरी करणार्‍या महिलांमुळेच मुले बिघडत आहेत, हा विचारही साफ चुकीचा आहे.
मुक्तांगणवर पुण्याबाहेरूनही फोन येतात. फोनवर शक्य झाल्यास किंवा तेथील स्थानिक समुपदेशकाकडे मुले पाठविली जातात. मात्र, मुलांपेक्षा पालकांनाच समुपदेशन करण्याकडे मुक्तांगणने लक्ष पुरविले आहे. पाल्याच्या विकासामध्ये पालकांची जबाबदारी मोठी असते. मुलांना समजावून सांगितले तरी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष जर पालकांनी ठेवले नाही तर पुन्हा ते या प्रकारात अडकू शकतात. पालकांनी घरात असणं आणि मुलांवर लक्ष ठेवणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही घरात आहोत आमची मुले बिघडणार नाही, अशी खोट्या समजात कुणीही राहू नका. त्यापेक्षा आपल्या पाल्याच्या बंद खोलीचा दरवाजा थोडासा ढकलून बघा.. कदाचित अजूनही त्याच्या मनापर्यंंत आपली हाक आणि आपला धाक टिकून असेल..!!

oxygen

Friday, December 2, 2011

तसलं काहीतरी केलं ??

- ‘त्या रात्री’ चुकून ‘त्या’ गल्लीत शिरलो .. मित्र मला बायल्या म्हणत होते. मग माझं पण डोकं फिरलं आणि.. माझ्या हातून नेमकं काय घडलंय तेच आठवत नाही. मला तसं काही तर होणार नाही.?

- माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. पण त्यानं कंडोम का काय ते नव्हतं वापरलं. आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

माझा विश्‍वास आहे त्याच्यावर, प्रेम केलयं; मग म्हटलं काय हरकत आहे. 
नाऊ डेज आर एक्सपरिमेंटल. त्यानं घरी बोलावलं.
पण कंडोम का काय ते नव्हतं वापरलं.
आता भीती वाटतेय. मला तसं काही तर होणार नाही.?

असे एक ना अनेक प्रश्न. मन पोखरून काढणारे. डोकं उठवणारे प्रश्न. एचआयव्हीविषयी माहिती नसण्याची भीती आणि माहीत करून घेण्याचीही भीती असणारे प्रश्न. पण मग ही भीती व्यक्त करायची तरी कुठे? एचआयव्ही कसा होतो, का होतो या शंकेपासून ते एचआयव्हीच्या निव्वळ भीतीपोटी नैराश्याच्या गर्तेत ओढल्या गेलेल्यांचे अनेक प्रश्न. संवाद हेल्पलाईनला येणारे. ‘संवाद’ हेल्पलाईनला ‘मुक्ता हेल्पलाईन’ म्हणून तुम्हीही ऑक्सिजनमध्ये भेटत होतात. ‘ऑक्सिजन’च्या अनेक वाचक मित्रमैत्रिणींनीही आजवर या हेल्पलाईनची मदत घेतली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टची ‘संवाद हेल्पलाईन’ महाराष्ट्रात आणि मागील वर्षापासून बिहारमध्येही एचआयव्ही विषयाच्या शंकांचे निरसन करत आहे. हेल्पलाईनवर आपले प्रश्न, शंका विचारणार्‍या तरुणांचीच संख्या जास्त आहे. १५ ते ४0च्या दरम्यानचा हा वयोगट.. एकूणच शरीरशास्त्राचे अज्ञान आणि गोंधळ यातून गैरसमज मोठे आहेत. त्यामुळेच या हेल्पलाईनला फोन करणारे शहरातील आहेत. निमशहरातील आहेत आणि काही गावपातळीवरीलही आहेत. नोकरी-व्यवसायातील तरुण आणि विद्यार्थी या हेल्पलाईनला मोठय़ा प्रमाणात फोन करतात. शैक्षणिकदृष्ट्या विचार करता पदवीधर असणार्‍या तरुणांचीच संख्या यात जास्त आहे. ‘लैंगिक शिक्षणा’सारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही सुशिक्षित तरुणांना शास्त्रीय माहिती मिळू शकत नाही, हेच यावरून सिद्ध होते. मिटल्या ओठांच्या आड लैंगिक संबंधाविषयीचे प्रश्न दबून जातात. शरीराच्या व्यवहाराचा स्वच्छ पारदश्री संवादच होत नाही.परिणामी, तरुणांचा नुसताच गोंधळ उडाला आहे. काही वेळा यातूनच ‘करून पाहूयात’ ही वृत्ती जन्म घेते. या हेल्पलाईनला येणारे घाबरेघुबरे फोन कायम हीच कहाणी सांगतात.

घुसमट काय आहे? 
अजाणतेपणी प्रयोग करण्याच्या नादात आपण ‘काहीतरी भलतंच’ केल्याची सगळी हकीकत मोकळेपणाने सांगण्याची काही सोय नसते. घरातही अनेकदा कुणाला सांगितले जात नाही. शंका आली तरी ती व्यक्त केली जात नाही.
आपल्या हातून जे घडले ते ऐकणारा कोणी तरी हवं म्हणून ही फोन येतात. लोक मन मोकळं करतात. सल्ले मागतात. मी काय क , म्हणून मार्गदर्शन घेतात. पण काहींची कहाणी वेगळीच. एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून नोकरी नाही, कामधंदा मिळत नाही, पैसा नाही आणि मग म्हणून चांगलं जगणंही नाही.
ही घुसमट कुणापाशी सांगायची.? कशी वाट फोडायची जगण्याच्या कोंडीला.? हे मात्र कुणाला विचारायची सोय नसते. 

तरुण मुली गप्पच.!
पतीला एचआयव्ही असल्यास पत्नीपासून लपविण्याचे प्रसंगही अगणित आहेत. पत्नीच्या अजाणतपेणाचा, विश्‍वासाचा सर्रासपणे घात केला जातो. डॉक्टरांनी पत्नीची एचआयव्ही टेस्ट करून घेण्यास सांगितल्यावर ती गुपचूपपणे केली जाते. भाबड्या बायका नवर्‍याच्या विश्‍वासाला बळी पडतात. आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं पत्नीला कळतही नाही. घरी कळल्यानंतर घरातील माणसं त्या बाईलाच जबाबदार धरतात. अशा किती जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याच्या कहाण्या या बायका सांगतात. पतीचे निधन झाल्यावर तर पत्नीच्या हाल-अपेष्टांना सीमाच उरत नाही. घरातूनच हाकलेले जाते. काहीवेळा माहेरीसुद्धा दार बंद केले जाते. स्वत:च्या घरातील मालकी हक्कासाठी तिला कायदेशीररीत्या झगडावे लागत राहते. पण हे सारं होऊनही अनेक जणी मात्र बोलत नाहीत
हेल्पलाईनवर बायकाचे प्रमाण खूप कमी आहे. केवळ तीन-चार टक्केच महिलांचे फोन येतात. बायकांचे फोन नाही म्हणजे त्यांना शंका-प्रश्नच नाहीत, असा अर्थ होत नाही. मात्र, आजही चारचौघांत साधं ‘मासिक पाळी’विषयी बोलण्याची मुभा नाही तिथे अशा प्रकारच्या प्रश्नांविषयी बोलण्याचा मोकळेपणा त्यांच्यात दिसतच नाही. एचआयव्ही नवर्‍याची काळजी कशी घ्यायची, आहार काय द्यायचा याबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र स्वत:विषयी, स्वत:च्या संबंधांविषयी, चुकल्या पावलांविषयी, फसल्या गेल्याविषयी तरुणी-बायका बोलतच नाहीत. पुण्यात ससून या शासकीय रुग्णालयात या हेल्पलाईनने एक मोफत कॉल करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहे. तिथून मात्र बहुतेक वेळा महिलाच फोन करतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार अशा कितीतरी जणी सहन करत असतील, असं या हेल्पलाईनचं म्हणणं आहे.

फोबिया कॉल
कधीतरी एखाद वेळा ‘तसल्या’ प्रसंगाला सामोरे गेलेल्या तरुणांच्या मनात भीती उरते. एक-दोनदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर लगेचच मला एचआयव्हीचा संसर्ग झाला, असंही गृहीत धरणारे अनेक जण हेल्पलाईनवर बोलते होतात. एचआयव्ही निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतरही अनेक जणांच्या मनात ही भीतीच असते की आपलं काही खरं नाही. सतत मनात कुढणारे, सतत स्वतचा जीव खाणारे, सतत दहशतीत जगणारे अनेक जण आहेत असं या हेल्पलाईनचं काम करणारे मित्रमैत्रिणी सांगतात.
संवाद हेल्पलाईनशी हा एक संवाद.
न बोलल्या जाणार्‍या प्रश्नांविषयी.!


लग्नाच्या मोहापायी फसवणूक
२३-२५व्या वर्षी एचआयव्ही झाल्याचे कळल्यावर काही तरुण खचून जातात. लग्न झाल्यावर निर्माण होणारे संभाव्य धोके, काळजी, सुरक्षिततेच्या गोष्टी सगळी माहिती असूनही काही जण घरच्यांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी लग्न करण्याच्या निर्णय घेतात. मात्र लग्न करताना, निरोगी असणार्‍या मुलीला आजाराविषयी सांगितले जात नाही. लग्नाची मानसिक गरज, समाजात प्रतिष्ठा राहावी यासाठी तरुणांना लग्न हवेच असते. यामुळे कित्येकदा मुलींचे आयुष्य पणाला लागते.
स्वत कुणाला फसवलेल्या तरुण मुलांचे आणि फसल्या गेलेल्या मुलींचे फोन या हेल्पलाईनला येतात. पण लग्नाआधी एचआयव्ही चाचणी का करून घेतली नाही याचं उत्तर मात्र कुणाकडेच नसतं.!

समलिंगी संबंधात धोका नाही.?
समलिंगी संबंधातून एचआयव्ही होत नाही, असाही एक गैरसमज आहे. समलिंगी संबंधाविषयी बहुतेक पुरुषांचेच फोन आहेत. एकापेक्षा जास्त साथीदारांबरोबर असुरक्षित संबंध आले की, एचआयव्हीची संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, एचआयव्ही हा भिन्नलिंगी लोकांनाच होऊ शकतो, अशी चुकीची समजूत समाजात आहे. याच समजुतीतून काहीवेळा वयात येणारी मुले समलिंगी संबंध ठेवण्याकडे वळतात आणि स्वत:ची लैंगिक ओळखच पणाला लावून फसतात. अशी तरुण मुलं घरात बोलत नाहीत आणि न बोलून या चकव्यातून बाहेरही पडत नाहीत. 
एचआयव्हीप्रश्नी शहरांत तरी जागरुकता असते, असा एक समज आहे. पण तो खोटा ठरावा, असं संवाद हेल्पलाईनवाले सांगतात. या सगळ्या घुसमटीत शंका विचारणारे फोन सगळ्यात जास्त शहरी भागातून येतात. एचआयव्ही म्हणजे नेमके काय? हा प्रश्न विचारण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. मात्र, आजही गाव-वस्त्यातून एचआयव्हीची प्राथमिक माहिती विचारणार्‍या फोनची संख्या लक्षणीय आहे. प्राथमिक प्रश्न :

* एचआयव्ही होतो कसा?
* कंडोमचा काही फायदा होतो का?
* कंडोम वापरल्याने क्षमता कमी होतील का?
* एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे काय?
* ‘ओरल सेक्स’ आणि ‘अँनल सेक्स’मुळे एचआयव्ही होतो का?
असे प्रश्न सर्रास विचारले जातात. आणि त्यातून एक नक्की दिसतं की पंचविशीच नाही तर तिशी उलटलेल्या माणसांनाही आपल्या शरीराची नीट ओळख नसते. आहे ते केवळ अज्ञान.

पाय घसरतो कुठे?
यार, आत्ता नाही तर कधी?? बक अप नाऊ. कशाला घाबरतोस, इतका, काही होत नाही. एवढा कोरा करकरीत राहून काय मिळणारे तुला. व्हर्जिनिटीचं काय लोणचं घालायचं.? ‘पीअर प्रेशर.’ मित्रांच्या अशा दबावाला बळी पडण्याचे प्रसंग अनेकांवर ओढावतात. मित्रांच्यासमोर हसू व्हायला नको म्हणून किंवा ‘हम भी र्मद है’ हे दाखवण्याच्या भानगडीत वयाच्या १५- १८ व्या वर्षापासूनच मुले ‘व्हर्जिनिटी’ गमावून बसत आहेत. असे करण्यात या तरुणांना शल्य वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने इटस ऑल एक्सपरिमेंटल. काही वेळा तथाकथित पुरुषार्थ दाखविण्यासाठी, मित्रांसमोर मिरविण्यासाठीही बहुतके मुले ‘त्या’ वस्तीची वाट चालून येतात. मित्रांच्या दबाव गटाला बळी पडून ‘नको त्या वयात, नको ते करणार्‍यांची’ संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. थ्रिलपोटी हे सारं केलं जातं. सध्या प्रत्येक छोट्या- मोठय़ा गोष्टी सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या ‘पाटर्य़ा, ड्रिंक्स अँन्ड सेक्स’ हे एक नवेच समीकरणच झाले आहे. काही वेळा झिंगलेल्या अवस्थेत मित्रांच्या सोबत कधी त्या वस्तीत गेले, हेही माहीत नसलेले अनेक जण आहेत. आणि हा सारा घोळ झाला की तो कसा निस्तरायचा, आता आपल्याला काही आजार तर होणार नाही ना या भावनेने घाबरगुंडी उडालेले अनेक जण या हेल्पलाईनला फोन करतात. मित्रांनी सांगितलं म्हणून केलं, आता पस्तावलोय किंवा पस्तावलेय असं सांगणारे तर कितीतरी जण.! मित्रांचं एवढं का ऐकता या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतं.

प्यार में सबकुछ.!
प्यार में सबकुछ जायझ हैे, म्हणत प्रेमाचा रस्ता बेडरूमपर्यंत नेण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. तिचं/त्याचं त्याच्या/तिच्यावर प्रेम असेल तर ते सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्यातील इण्टिमेट रिलेशनशीप. प्रेम करतेस/करतोस तर काय हरकत आहे म्हणत शरीरातील अंतर सहज गळून पडते. भावनिक गुंतवणुकीपेक्षा शारीरिक गुंतवणूक मोठी वाटू लागली आहे. त्याला गमवायचे नाही म्हणून मी हो म्हणाले आणि तो ‘तसला’ निघाला, आता मी काय क.? मी काहीच काळजी घेतली नाही असं सांगणार्‍या किंवा मैत्रिणीचं नाव पुढे करणार्‍या काही मुलींचे फोन येतात. प्रेमात नाही म्हणायचा अधिकारच गमावून बसलेल्या या मुली.?
त्या प्रेग्नन्सीपासून दहशतीपर्यंंत आणि मनस्तापपर्यंत अनेक गोष्टीत अडकतच जातात.
काहींना निदान बोलण्याची तरी हिंमत असते ज्या बोलत नाहीत त्यांचं काय होत असेल?


(oxygen)

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...