Thursday, October 16, 2014

डाव सहजीवनचा...!!!
‘दीदी वंदनाको शायद हार्ट अ‍ॅटक आया है, हॉस्पिटल में लेकर गये है...सुबह सुबह ५ बजे’ शिरीन घाबरुन सांगत होती आणि मी खाडकन जागी झाले. सकाळचे पावणे आठ वाजत आले होते. शनिवारचा सुट्टीचा दिवस म्हणून मी अजुनही बिछान्यात लोळत पडले होते. आमच्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर वंदनाचे कुटुंब आहे. साधारण तिशीच्या आत बाहेरची वंदना. सहा वर्षांचा एका लेकरानंतर चार दिवसांपूर्वीच तिने एक चिमुकलीला जन्म दिला होता. सिझेरियन झाले होते.  कालच तिला घरी आणले होते आणि आज एकदम पुन्हा हॉस्पिटलची पायरी...

शिरीनच्या चेहºयावर एक विचित्र भीती आणि रडवेलासा स्वर होता.  ही बातमी ऐकताच डोळे उघडण्याच्या पलिकडे कसलीच दाद न मिळाल्याने आणि माझ्या पेंगुळलेल्या अवस्थेला पाहून ती पुन्हा हॉलकडे वळली. एका अस्वस्थ बातमीने सकाळ व्हावी इतकं उदासवाणं काहीच नसतं. पण तिला हॉस्पिटलमध्ये नेलयं तर फार काही काळजीचं कारणं नाही असं स्वतलाच समजावलं आणि आणखी पंधरा मिनीटे लोळण्यासाठी स्वतलाच कारणं दिलं. खरतरं हा शुद्ध निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा होता हे कळत होतं तरीही उठण्याची इच्छा होत नव्हती. पहिल्याच मजल्यावर घर असल्याने आवाज येत होतेच.  शेवटी उठलेच. तर शिरीन पुन्हा धावतं आली, दीदी वंदना नही रही... मनात धस्स झालं. चार दिवसात चिमुकली आईविना झाली होती. एकदम कससचं झालं. मम्मी पप्पा दोघेही सोसाटीतील लोकांबरोबर बाहेरच होते.

थोड्याच वेळात अ‍ॅम्ब्युलन्स आली. तोपर्यंत तशी मी बरीच स्थिर होते. खाली जायची हिमंत झाली नाही म्हणून खिडकीतून डोकावून पाहिले तर  वंदनाचे निपचित पडलेले शरिर गाडीतून बाहेर काढण्यात येत होते. मिटलेले डोळे आणि काळवंडलेले ओठ नजरेला पडले तेव्हा शरीरातील चैतन्य हरवणं म्हणजे काय हे कळतं होतं. अ‍ॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचर बाहेर काढणाºया लोकांमध्ये वंदनाचा नवरा होता. अवेळी, अचानकपणे आपला जोडीदार हरवलायं हे अजूनही त्याला पटतं नसावं. डोळ्यांत शून्य भाव आणि थकून गेल्यामुळे तो एकदमच दुप्पट वयाचा दिसत होता. सहजीवनाच्या सुरुवातीच्याच या टप्प्याला जोडीदाराला गमावणे, त्या जाणीवेने पोटात गोळाच आला. त्याच्या अन मुलांच्या आयुष्यातील रितेपणाने जास्त कासावीस केले. नवा अंकुर उमलवून घरभर आनंद देणारी ती अनंतात विलीन झाली होती.

तिला हार्ट अ‍ॅटॅक आलाच नव्हता. बाळांतीण झाल्यापासून सर्दी होती. त्यामुळे श्वसनाला त्रास होत होता...घरी आणल्यापासून त्रास बळावला..रात्रीतून तो वाढला असावा अन बहुधा झोपेतच..हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच..वंदनाचे शेजाºयांनी हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिची नाडी तपासली होती. ठोका ऐकू न आल्याने सर्वांचे ठोके चुकले आणि तिला भल्या पहाटे डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिला नेमका काय त्रास झाला असावा किंवा नेमके निमित्त काय कोणास ठाऊक पण ती नाही उरली हे वास्तव.

वास्तव भीषण होतं आणि भीषणंचं होतं. माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सिद्ध होत होती. नाही म्हटलं तरी, येणारा माणूस जाणारचं की. पण असं अचानकपणे जोडीदाराला एकटं टाकून, मुलांना पोरकं करुन. सहजीवनाच्या आणि भवितव्याच्या असंख्य स्वप्नांच्या सरणावर ती जळणार होती आणि तो तिच्याशिवाय आत्ताच बराच म्हातारा दिसत होता. मम्मी सांगत होती, गेल्या वर्षी वंदनाचे वडिल गेले तेव्हा तिचा लहानगा म्हणाला. आता येणाºया वाढदिवसाला आजोबा नसणार मग आजी पण मरणार, एकदिवस आईपण आणि बाबा पण. मग माझा वाढदिवस कोण साजरा करणार? या प्रश्नाने बैचेन होऊन त्यांनी दुसरा चान्स घेतला होता. भावाला कोणीतरी भाऊ-बहिण असावा म्हणून. खरचंच आपण नसल्यावर एकमेकांना ते असावेत म्हणून. आता खरचं तसं झालं होतं.

वंदनाला न्हाऊ घालण्यात आलं. साडी चोळी करण्यात आली. सुहासिनीचे सगळे सोपस्कार झाले. ११.३० वाजता तिला वैकुंठात नेण्यात येणार होते. अ‍ॅम्ब्युलन्स तयारच होती.  एका मागोमाग एक गाड्या सोसायटीच्या बाहेर पडू लागल्या. तिच्या मुलाला घेऊन आजी इमारतीच्या खालीच उभी होती. आपलं सगळं दुख आणि अश्रु लपवून ती माऊली आपल्या लेकीला निरोप देत होती. तितक्यात वंदनाचा मुलगा म्हणाला, आजी आईला कुठे घेऊन जात आहेत. आजीला गलबलून आले. आईला बरे वाटत नव्हते ना म्हणून जरा बाहेर गावी नेत आहेत. त्यावर त्या छोट्याचा प्रश्न तयारच होता, मग कधी येणार आई? आजीने कसतरी उत्तर दिलं, येईल थोड्या दिवसात. उत्तराने मुलाचं समाधान झालं नव्हतं पण सगळा गंभीर प्रसंग त्याला काहीतरी सुचवत होतं म्हणून तोही शांत झाला. त्याच्याकडे पाहण्याची इच्छाच झाली नाही. वंदनाची पोरगीसुद्धा आईचा शांतपणे निरोप घेत असावी त्यामुळे इतक्या वेळेत रडलीसुद्धा नाही.

दोन तीन दिवसांनी मम्मी सांगत होती. वंदनाचा मुलगा सतत विचारत असतो आई कधी येणार आहे. लहान पोरांना भुलवणं सोपं असतं असं वाटून प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर दिलं जातं. परवा हट्टच करुन बसला. शेजारच्या सगळ्या मुलांची आई आहे मग माझी कुठे?’ ‘तू मोठा झाला ना की येणार आई’ असं त्याला कोणीतरी उत्तर दिलं. मग ‘मी लगेच मोठा होतो ना, सांग कसा मोठा व्हायचं म्हणून तो त्याच्या बाबाला त्रास देत राहिला. कोणाकडेच उत्तर नव्हतं. अजून तर पुढे चालून मुलीला पडणाºया प्रश्नांची ही उत्तरे ठरवायची होती. पोरांपुढे घर हबकून गेले होते.

आयुष्यातील प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे हे परत परत अधोरेखित होत होतं. कधी कोणाचा डाव संपेल हे नियतीलाच ठाऊक असणार आहे. याहून विचित्र काहीच नाही, पण आपण हतबल आहोत. या क्षणाला वाटतं होतं जी जोडपी आपल्या संसारात आनंद निर्माण करत नाहीत...सतत भांडत असतात...कुरकुरत असतात...जोडीदाराचे उणेपुरे काढण्यात मग्न असतात त्यांची कीव आली. का असमाधानी असतात ही लोक असा प्रश्न पडला? दोन आयुष्य एकत्र येत असताना थोडी फार तक्रार होते..भांडाभांडी पण होते पण हे जेवढयास तेवढे असले तर ठीक असते पण नात्यात सततच असंतोष ठेवणाºया लोकांची चीड आली. हे कोणत्याही नात्याचं आहे, माणुसकीच्या ही नात्यचं. नातं ताणताना, आयुष्याचा वाटेकरी अचानक गायब झाल्यावर काय होऊ शकतो हे चित्र एकदा डोळ्यांपुढे उभे केले पाहिजे म्हणजे कळेल वंदनाच्या घरातील रितेपण आणि आपल्याकडे आयुष्याला जगण्याची असणारी संधी यातील नेमका फरक.

Wednesday, September 3, 2014

बाईच ती....

बाईच ती....


आरं ए फुकनीचा कसला तरास हाय रं तुजा...हो की लांब...मरणाचं उकडतयं अन काय अंगाला चिकटाय निघालास..
अक्कीबाई पांघरुण बाजूला सारत तिच्या नवजयावर खेकसली तसा तो पण उखडला.
ए, सटवे गप गुमान पड हिथं. जास्तीच बोलयाचं काम न्हाय.’
आरं ए तुझ्या **** रातच्याला डोसकं फिरवू नगसं उगीच. आपण तुझ्यावानी रिक्कामटेकडं न्हाय.’ तिने चार एक शिव्या अशाच हासडल्या.
तुझ्या मायला तुझ्या... उग खिटपीट करु नकोस. पोरं झोपल्याती उगा जागी व्हतीलं.’
व्हायची त होवू दे की कळू दे की त्यांचा बाप काय बेण्याचा हायती..’
ये तुज्या तोंडाला आवर नाइतर हा हात बगितलास ना..बायको हायीस तू. ह्यो कामचं हाय तुजं.
मेल्या मुडद्या दिसा ढवळ्या मारतू तवा नाय आठवतं व्हय म्या बायको हायते. आता रातच्यालाच बरं आठवतयं, मर्दाच्या रं! मारुन मारुन काढतोस की तुजी पुरुषाची रग. ह्यो बघ पाय, खराट्याच्या माराची अजून बी नस ठणकतेय अन आलास लय मोठा मर्दांगी दावाय. दिसा मारझोड करुन रातीच्याला गोड बोलून फुस लावाय मी काय रंडीची वाटली का रं तुला. तुजा मार खायचं न रातच्याला तुज्याबरंच लोळायचं व्हयं रं ****.. मेल्या जा की मसणात.. ’
मर सालीच्या, बघुतूच तुला बी.’
अक्कीबाईला आवरणं आता शक्य नव्हतं हे ओळखून तो बिडी फुंकतच दार ढकलत बाहेर पडला. रात्रीचे साडे बारा झाले होते. पत्र्याच्या वीस बाय दहाच्या शेडमध्ये तीस-बत्तीसच्या  अक्कीबाईचा अख्खा संसार होता. सात-आठ वर्षांची लागोपाठ झालेली दोन मुलगे आणि कुंकवाला नवरा होता. घरात फार काही सामान नव्हते पण अक्कीबाईला मारायला झाडू, खराटा, धोपटण या सामुग्रीची कधीच उणीव नसायची.   जुलै महिना उगवला होता तरी पावसाने दडी मारली होती त्यामुळेआज प्रचंड उकडत होतं. पत्र्याच्या छपराला एक पंखा होता खरा पण अक्कीबाईची कमाई कुठे कुठे पुरणार होती. वीजकपात झाली होती आणि पंखा ढिम्मचं होता. सकाळी लवकर साधनाताईकडे जायचंयं म्हणतचं अक्कीबाई पंख्याकडे बघत पडून राहिली.

....................
पंख्याचा गार वाराही तिला बोचत होता. घरघर करत होणारा पंख्याच्या आवाजाची तिला चीड यायची पण आज प्रचंड उकाड्यात तिला चक्क वाराच नकोसा झाला होता. रात्रीचे 12.40 झाले होते पण तिचा डोळा काही केल्या लागत नव्हता. पलीकडच्या बांधकाम साईटवर स्लॅब घालण्याची तयारी सुरु होती. सिमेंट वाळू कालवण्याची ती भली मोठी मशिन आणि त्या मशीनच्या एकसूरी आवाजाने ती उगीच कासावीस झाली होती. रडण्याची अनावर झालेली इच्छा तिने उशीत तोंड खूपसून मुसमुसत पुर्ण केली. मोकळेपणाने रडण्याची संधी आणि सोय होत नाही पाहून ती अजूनच चरफडली.
झोप का नाही लागत तितकाच वेळ तर डोक्याला शांती असते आणि  सचल जगाशी फारकत घेण्याची तेवढीच एक संधी.’ स्वतशीच बोलली. तिला स्व गप्पा मारायला आवडायचं आणि खरतरं स्वतशीच आपण स्वच्छ गप्पा मारु शकतो यावर तिचा विश्वास होता. बाहेरच्या जगात ती अबोल होती पण स्वतसाठी खूप खूप बडबडी. दीड वाजत आला होता. मशिनचा आवाज पूर्णपणे थांबला होता. तितक्यात समीरने कुस बदलली तसं तिने डोळे घट्ट मिटून घेतले. मग ते न उघडताच पडून राहिली आणि शेवटी कधीतरी झोपूनही गेली.
गेलया कित्येक दिवसापासून साधनाची झोपच उडाली होती. झोप लागेपर्यंत रात्रीचे किमान 2 वाजायचे. मध्ये तर अख्खी रात्र तिने पंख्याकडे टक लावून काढली होती. तिला कळतचं नव्हतं आपल्यावर झोप प्रसन्न का होत नाही. दोन दिवसांनी समीर मस्कतला जाणार होता. कंपनीच्या प्रशिक्षणासाठी. समीरच्या जाण्याच्या कल्पनेचीही तिला भीती वाटत होती पण झोप हरवण्याचं कारणं हे नाही हे तिला ठाऊक होतं. साधनाच्या लग्नाला आता बावीस महिने झाले होते. समीर चांगला होता, माणूूस म्हणूनही आणि बजयापैकी नवरा म्हणूनही. सासू, सासरे, नणंददेखील साधनाची काळजी करायचे पण तरीही....तिची घुसमट व्हायचीच!

.................
अक्कीबाई घरात भांडणं करुन आलेली दिसत होती. भांडी घासताना भांड्याचा आवाज वाढलां की नवजयाचं आणि हिचं वाजलेलं आहे हे साधना समजून जायची.
ताई, हळू गं. आता काय भांडी फोणार आहेस.’ अक्कीबाईला बाई ऐवजी ताई म्हणणारी साधना ही एकमेव होती. त्यामुळेच थोड्याच दिवसात अक्कीबाईला साधनाचा लळा लागला होता.
साधनाताई, त्याला फोडता येत नाही ना म्हणूशान. मेल्याने सकाळ-सकाळ पोरांना बदडलयं. का त म्हणे शाळंपेक्षा ह्याच्या बीडीच पाकिट ेलई महत्त्वाचं हाई. पोरांवर काय सनसकार व्हायचं बघा आता तुमीच. असल्याला घेऊन काय करायचं वं. पोरांना नाय तर मला मारतच असतूया. जिंदगीच हराम केली मेल्यानं. मरत बी नाय साल..******’ तिच्या शिव्यांची साधनाला आता सवय झाली होती. सुरुवातीला तिने अक्कीबाईला खूप समजावून सांगितलं असं बोलू नये म्हणून. पण नंतर नंतर तिच्या शिव्यातून होणारी आगपाखड तिला सुद्धा आवडू लागली होती. अक्कीबाईच्या शिव्या या शिव्या नसून तिची अभिव्यक्ती वाटायला लागली होती.  सगळं साचलेपणं ओकून देण्याची, खाल्ल्या माराचा क्षीण घालवण्याची आणि एकदम मोकळं होण्याची ताकद अक्कीबाईच्या शिव्यात असल्याचं साधनाला जाणवू लागलं होतं. एकटी असताना याच शिव्या हासडून पाहताना साधनाला ही स्वतचं साचलेपण प्रवाहित झाल्यासारखं व्हायचं. अक्कीबाईच्या रुपात भरल्या घरात एकट्या पडलेलया साधनाला एक सच्ची मैत्रिण मिळाली होती.
आत्तासुद्धा साधनाने तिला अडवलं नाही. पण तिला अहो जावो केलेलं आवडायचं नाही. त्यावरुन अक्कीबाईवर रागवल्याचं नाटक करत ती म्हणाली, मी तुझ्याशी बोलणार नाही ताई. कितीवेळा सांगितलं मला थेट साधना म्हणत जा. लहान आहे गं मी तुझ्यापेक्षा शिवाय मी तुला ताई म्हणत एकेरी हाक देतेच ना’
नाय बाई. तुम्हाला एकेरी हाक मारल्याची मोठ्या ताईंना आवडायचं नाय अन मला बी ते काय जमायचं नाय. तवा मला तुमी माफ करा ताई.’
यानंतर साधनाने फार काही जबरदस्ती केली नाही. तिला तिच्या सासूबाईचा स्वभाव माहित होता. बोलायच्या काहीच नाही पण अबोला’ हेच शस्त्र वापरायच्या आणि तेच जिव्हारी लागायचं. दुखरी रग ठसठसावी तसं तिला आत्ताही काहीतरी आठवलंच. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. अक्कीबाईला कळणार नाही अशा स्वरुपात तिने ओढणीने डोळे टिपले.
.........................
दिवसभर रिकामं राहायचा कंटाळा येतो रे मला. आय नीड चेंज, दोन दिवसासाठी जाऊ का आईकडे.’
कंटाळा? चांगली आराम करतेस की. मी बघतो तेव्हा पुस्तकं नाही तर लॅपटॉप हाताशीच असतो तुझ्या.’ समीरने तिची खिल्ली उडवली.
मी आईकडे जाऊ का?’ तिने दरडावून विचारले.
तुला जायचं असेल तर जा पण आईला एकदा विचार, ती हो म्हणाली तर मी येईन तुझ्यासोबत.’
आणि नाही म्हणाल्या तर..’
तर काय पुढचा प्रश्न येतोच कुठे. तुला घरातल वातावरण माहित आहे ना! तिच्या मनाविरुद्ध झालेलं नाही आवडत तिला तर कशाला उगीच डोक्याला त्रास करुन घ्याचय. हे बघ, मला कळतयं की नाऊडेज यु आर गेटींग बोअर. आय अन्डरस्टँड डिअर बट व्हाय डोन्ट यू अन्डरस्टँड. तुझी अवस्था नाजूक आहे आणि काळजी घेतलीच पाहिजे. तुला वाटतं का परत पहिल्यासारखंचं...’
पहिल्यावेळेस जे झालं ते माझ्यामुळे असं तुलाही वाटतं का? बाई काय झाले तुम्ही तर बंदीवानच करुन ठेवलयं. ’
साधनाची दिवसेंदिवस चिडचिड वाढली होती. बजयाचवेळा ती शांतच असायची. कधी तरी संवाद व्हायचा तोही मग फिस्कटायचा. त्यामुळे समीरनेच आवरतं घेतलं.
मी विचारतो. संध्याकाळी जाऊयात. ती नाही म्हणाली तर आपण आईलाच इथे बोलावून घेऊ. आता आराम कर.’ समीर रुमबाहेर निघून गेला. साधना बिछान्याला टेकून राहिली.
साधना एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी झालेली होती. लग्नाच्या आधीपासून एका संशोधन संस्थेत ती लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला होती. तिथे पगार कमी होता पण साधनाला हवे असणारे भरपूर समाधान मिळत होते. लग्नानंतरही तिने त्यात खंड केला नव्हता. लग्नाचा पहिला वाढदिवस होता तेव्हा त्यांना गुडन्यूज’ कळली होती. सगळं घर आनंदून गेलं होतं. पण लग्नानंतर ती काम करत असलेलया ठिकाणाचे वाढलेल्या अंतरामुळे रोज संध्याकाळी यायला उशीर व्हायचा. शिवाय राहत्या घरापासून बसस्टॉपचेही अंतर बरेच होते.
त्यामुळेच नवी आनंदवार्ता ऐकलयापासून सासू-सासजयांनी नोकरी सोडण्याचा धोशा लावला होता. साधनाला हे काही पटतं नव्हतं. रोज उठून काही ना काही ऐकवलं जात होतं. ते कटाक्षाने ती दुर्लक्ष करत होती. तिचा दुसरा महिना होता. तीन चार दिवसांसाठी समीरची आत्या आणि कंपनी राहायला आली होती. ओढाताण नको म्हणून संस्थेत सुट्टया टाकल्या होत्या. सगळ्यांची सरबराई करण्यात ती थकून जात होती. पहाटे पाचला सुरु होणारा दिवस रात्री 11 पर्यंत लांबायचा. आरामाची सोय नव्हती. साधनाचा या दिवसांत इतका ताण वाढला की यातच तिचं पहिलं मूल गेलं. या गोष्टीला सरसकट सर्वांनी साधनालाच जबाबदार ठरवलं. तिच्या नोकरीमुळेच हे घडल्याचं एकमुखी निर्णय झाला. यानंतर महिन्याभरातच सासूने रुसून, रडारड करुन, भांडणे काढून तिला नोकरी सोडण्याला भाग पाडलं होत.  साधनाला मोठ्यांची मन दुखावयला आवडायचं नाही. नाती सांभाळताना काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात हे तिला ठाऊक होतं. पण एका मर्यादेपर्यंतच. आपलया सहनशीलतेची परिक्षा ती स्वत:च पाहत होती. नोकरी सोडली तेव्हांपासून ती घरातच बंद झाली होती. रिकामं राहण्याचा कंटाळा आला होता. समीरची नोकरीसुद्धा सतत बाहेरगावी फिरत राहण्याची होती. एकटेपणाने ती दिवसेंदिवस हळवी झाली होती. आयुष्यातील पहिला अंकुर कोमेजून जाण्याचं ओरखडा तिच्या मनावर गहिरा होता. हा ओरखडा अजूनही ताजाच होता आणि शरिरानेही ती अजून परिपक्व झालेली नव्हती तरी त्या रात्री समीरने....तिचा विरोधही जुमानला नव्हता. हे सगळं डोळ्यांसमोर आलं तसं तिने डोळे घट्ट मिटून घेतले. मिटल्या डोळ्यातील अंधारात तिला स्वत:ला बुडवून लपवून घ्यावसं वाटलं.
..................
साधनाताईऽऽऽ झोप लागली का??’ अक्कीबाईने हलक्या स्वरात विचारले.
कुठे गं. या  छकुबाई झोपू देतील तर ना... बैस ना इथे. छान वाटतं तुझ्याशी बोलताना. ’ साधनाला बाळंतिण होऊन सव्वा महिने होत आले होते. समीर मस्कतहून अजून परतला नव्हता. बाळाची ओढ त्यालाही लागली होती पण काम उरकण्याऐवजी वाढतच होतं. समीर नव्हता आणि तिच्या बाळंतपणानंतर तिला माहेरी ही राहता आलं नव्हतं. अवघ्या 15 दिवसांत तिला सासरी आणलं होतं. बाळांतपणानंतर तीन दिवसातच हा वाद सुरु  झाला होता. साधनाची तब्येत सुधारण्याऐवजी खालावलेली होती. तिला पाहून ती बाळांतिण झाली की आजारपणातून बाहेर पडली काहीच कळत नव्हतं. साधनाच्या माहेरची परिस्थिती हलाखीची होती पण दोन वेळचं जेवणाची भ्रांत नक्कीच नव्हती. बाळबाळांतिणला घेऊन जायचं म्हणून मानपानाचे मागचे रुसवे काढून सासूबाइंनी तिला 15दिवसात सासरी आणलं होतं. त्यामुळे अककी बाईचा सहवास तिला नक्कीच सुखावून जायचा.
तुमच्या आईने हा खाऊचा डबा पाठवलायं अन परवा तुमी शोधत व्हता ते हेच टोपडं नव’तिच्या हातातील ते टोपडं पाहून साधना आनंदली. तिच्या आईने दिलेलं म्हणून सासूने ते वर फेकून दिलं होतं साधना त्या घटनेने खचली होती. पण अक्कीबाईने ते वरच्या माळ्यावरुन काढून तिला दिलं. तिने झटकन ते टोपडं घेतलं आणि बाळाला घातलं.
........................
मुलांच्या आनंदाने अक्कीबाई हरखून त्यांना पाहत होती. भीशीचे तीन हजार आले होते. त्या पैशातून तिने मुलांसाठी एक सायकल आणली होती. सायकलीची पूजा झाली आणि मग मुलांची सफर सुरु झाली. या आनंदाने हरखून गेलेलया अक्कीबाईच्या नवजयालाही आनंद झाला होता. तिचा नूर वेगळाच आहे पाहून त्याने तिच्याकडे 100 रुपयाची मागणी केली. अक्कीबाईला आनंदावर विरजण नको होतं म्हणून तिने लागलीच एक नोट त्याच्या हातावर टेकवली. नोट मिळाल्याने अक्कीबाईच्या नवजयाला आणखी पैसे मागण्याची खुमखुमी आली त्याने आणखी एका100 रुपयाची मागणी केली. अक्कीबाइने इन्कार केला. पण त्याने पुन्हा हट्ट केला. यावर ती चिडली आणि शिव्या घालायला लागली.
मर्दाच्या कमवं की सता.’
अक्कीबाईच्या नवर्‍याला तशी दारुची सवय नव्हती की जुगाराचा शौक पण त्याला बिनकामाचं राहण्याचाच शौक होता. बिडी फुंकत बसण आणि चौकातल्या पोरांबरोबर चकाट्या पिटतं बसणं एवढचं त्याला जमायचं. कधीतरी लहर लागल्यावर काम करायचा आणि पैसे अक्कीबाईपुढे आणून नाचवायचा. पुढे ते पैसे कुठे गायब व्हायचे हे मात्र तिला कधीच कळलं नाही. हॉटेलात चांगल चुपलं खायचं आणि सिनेमे टाकायच यात त्याचा कधीतरी कमावलेला पैसा धुर व्हायचा.
ये **** दिलसं तर काय मरणार हाय..पोरांसाठी पैसे हायतंच ना’
ते कमवते हुइपर्यंत अन तुला काय धाड भरलीय.. ’
अक्कीबाईपुढे बोलायचं संपलं की तो हाती येई त्या वस्तूने तिला बदडायला लागायचा.आत्ताही त्याने झाडू हातात घेतला. बेदम मारहाण करायला लागला. झाडू फेकून हातानेच त्याने तिच्या मुस्काट्यात लगावले. त्याच्या उंच धिप्पाड शरीरापुढे अक्कीबाईचा निभाव लागत नसायचा पण यावेळी तिनेही बळ एकवटून त्याच्या तोंडावर जोरात हात ठेवून त्याला मागे ढकललं तसा तो पत्र्याच्या खुंटीवर फेकला गेला. खुंटी जोरात लागलयाने तो वेदनेने कळवळत खाली लवंडला आणि कण्हत राहिला. अक्कीबाईने मात्र पदर खोचला. त्याच्या पेकाट्यात आणखी एक लाथ मारली. दिलखुलासपणे शिव्या हासडल्या आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
...................................
बाळ दोन महिन्याचे झाले होते. सुर्याची कोवळी किरणे मिळावी म्हणून साधनाने खिडकी उघडली. कोवळी तिरीप बाळावर अलवार पसरली. साधनाच्या नावे काल एक पोस्ट पाकिट आलं होतं. ते पाकिट पाहिल्यापासून ती अस्वस्थ झाली होती. घरात तर सगळ्यांना आनंद झाला होता. समीरने तर तिच्या आवडीची फुलं पण आणली होती.  इंदापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तिला गर्व्हमेंट नोकरीसाठीचं कॉललेटर होतं. नोकरीसाठी सातारा सोडून इंदापूरला जावं लागणार होतं. दोन दिवसांनी तिला जॉइनिंग होतं नोकरी नको म्हणणाजया सासूबाईं तर कालपासून कामाला लागलया होत्या. माहेरच्यांशी संपर्क नको म्हणून तीन महिन्यांपासून बंद केलेला मोबाईल ही सुरु  झाला होता. या सगळ्या घटनांचा साधनाच्या मनावर आघात होत होता. कॉल लेटर फाडून टाकायचाही तिच्या मनात विचार आला होता. तिने तो उचलला. इतक्यात अक्कीबाई आली.
तिचा बेदम मार खालेला सुजलेला चेहरा पाहून साधनाला कससचं झालं. तरीही अक्कीबाई हसत तिला म्हणाली,
ताई, छकुबाईला झोपवू का?’
साधनाचा उतरलेला चेहरा पाहून अक्कीबाई हळूवार झाली. काय झालयं म्हणेपर्यंत साधनाला रडू कोसळले.
रडता रडता ती खाली कोसळली.
तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे गं. तू मार खातेस. मी खाते. फक्त तुझा दिसतो आणि माझा...माझा दिसत नाही की कळतही. तुझा बिनकामाचा नवरा तरी मार खातेस आणि मी खोट्या सभ्यतेच्या नावाखाली. चार भिंतीत शब्दाच्या टोचलेलया टाचण्या समाजात वावरताना दाखवता येत नाही म्हणून लौकिक अर्थाने माझा छळ नाही माझं बाईपणं सुखात आहे. चार भिंतीत माझ्यावर निर्णय लादले जातात पण ते लादलं पण झुगारता येत नाही तरीही लौकिक अर्थाने मी मुक्त. तुझी काळजी, तुझ्यावर प्रेम म्हणत माझ्या इच्छा मारल्या जातात तेव्हा मन मारलेले दाखवता येत नाही म्हणून मी सुशील. मोठ्यांचा सन्मान, आदर म्हणून मत मांडता येत नाही म्हणून सुसंस्कृत. कसलं हे जगणं. पत्र्याच्या घरातही तुझं बाईपण चुरघळलं जात तसं चकचकणाजया भिंतीच्या आडही. एकदा नव्हे तर वारंवार मरणाच्या सरणावर चढायला आपण म्हणजे काय माणसं नाहीत. चांगली, समजूतदार, सुशील ही विशेषणं नाही तर दूषणं वाटू लागलीत. जीव घुसमटतोय. बुरखा नकोसा झालायं. समीर चांगला माणूस आहे पण घरच्या परिस्थितीपुढे त्याला तरी कुठे चांगला नवरा होता आलयं. बाहुलयाप्रमाणे मी काय करावं हे ठरवलं जातयं.
तिने कॉल लेटर हातात घेतलं ती फाडणार इतक्यात अक्कीबाईने तिला अडवलं. ताई, बाईचे भोग संपवायचं हायतं की बाईच्या संधी. तुला संधी हाय. तर दाखून दे की. असा डोक्यात राख घालून निर्णय नको. बिछान्यावर लोळवता येतं तसं आडवता पण येतं ती संधी वळखता आली पाहिजे. शिकली सवरलीस ना. मग संधीचं सोन कर आन सायबापेक्षा मोठी हो. लाहन्यांना तुडवायची रीत हाय इथं. मोठी झालीस की हीच झुकतील. आन तुज्यामुळे आपली छकुबाईपण. अक्कीबाई बोलली आणि निघून गेली.
साधनाला तिचं पटतं होतं पण रडणं आवरलं जात नव्हतं. ती मोठ्याने किंचाळू लागली तसा समीर तिच्या खोलीत आला.  तो एकदम घाबरला. त्याने तिला उचलण्याचा प्रयत्न केला तसा तिने प्रतिकार केला. मागे लोटलं. अक्कीबाईकडून नकळत शिकलेल्या शिव्या तिनेही जोर लावून हासडल्या. मग त्यानंतरही ती खूप रडत राहिली. तसा समीर तिच्या अंगावर धावला. तिने आणखी मोठ्याने शिवीगाळ केली. घरातले सगळेच गोळा झाले. तिला नेमकं काय झालं काही कळायलाच मार्ग नव्हता. अन या शिव्या कुठून देतेय? समीर तिच्याजवळ जाणार इतक्यात तिने समीरला खोलीबाहेर काढलं अन खोलीचं दार लावून घेतलं.
एव्हाना समीर भेदरला. ‘तिला काही झालं का? तिच्या मेंदूचा तोल तर ढासळला नाही ना!’ तो घाबरून आईला विचारू लागला. तिच्यासाठीही साधनाचं हे रूप नवं होतं. तीही गप्पच झाली. बराच वेळ तिच्या खोलीतून रडण्याचे, हुंदके देण्याचे आवाज येत राहिले. थोड्या वेळाने ते आवाज शांत झाले. कसलीच हालचाल जाणवत नव्हती. समीरच्या हृदयाचा ठोका चुकला.
तो अस्वस्थ झाला. दिवाणखान्यातून उठून तो साधनाच्या खोलीबाहेर उभा राहिला. त्याने तिला अतिशय प्रेमाने हाक मारली. दार उघडण्याची विनंती केली. पण काहीच आवाज येत नव्हता. छोटीचाही आवाज येत नव्हता. तो अजूनच घाबरला. दार तोडवं का असा विचार करतच तो दारावर आपटणार इतक्यात साधनाने दार उघडलं. रडून तिचा चेहरा पार सुजला होता. तो विद्युतवेगाने छोटीकडे धावला. ती निवांत झोपली होती. समीरला तिचा अंदाज येईनासा झाला होता. तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. घरातले इतर जणंही तिच्याकडे पाहत राहिले.
तिने कचर्‍याजवळ फेकलेले कॉल लेटर घेतले. बॅगेत ठेवले. एकवार समीरकडे पाहिले आणि हळूवार स्वरात त्याला विचारलं, ‘कधी निघायचंय उद्या!’(लोकमतच्या पुणे आवृत्तीच्या २०१२ च्या दिवाळी अंकात छापून आलेली कथा)

Saturday, August 30, 2014

लेकीचा मित्र

परवा, माझ्या कामावरच्या एका मैत्रिणीने, वंदनाने तिचा नवीन आयपॅड दाखवला. उत्सुकतेने तो आयपॅड हाताळत होते. त्याचे फिचर्स,  अ‍ॅप्लिेकशनविषयी बोलता बोलता सहजच आयपॅडची किंमत विचारली तर ती म्हणाली, पंधरा हजार पण हे मी नाही घेतलेले. गिफ्ट मिळालयं. माझ्या मनात ‘वॉव’ असं झालं. तेच भाव चेहºयावर होते. शिवाय प्रश्नही की ‘कोणी दिला’. तिने ते अचूक हेरले. एका मित्राने दिल्याचे सांगत तिने आयपॅडचा किस्साच सांगितला.
खूप दिवसांनी तिच्या जिवलग मित्राची अन तिची भेट झाली. गप्पा गप्पांत तिने रोज कामानिमित्त रेकॉर्डसाठी कितीतरी पानांची झेरॉक्स काढावी लागत असल्याचे सांगितले. तसा, तो म्हणाला, अग मगं आयपॅड घे ना. त्यातच सगळं स्टोअर करता येईल. शिवाय आत्ता आयपॅड काय इतके महाग राहिलेले नाहीत. त्यावर ‘सध्या माझी ऐपत नाही‘ असं तिने खट्याळ अन उडवून लावलेलं उत्तर दिलं. तसं तिच्या मित्राने तिला कारणाशिवायचं, आयपॅड गिफ्ट करण्याचं डोक्यात खूळ घेतलं. नुसतं घेतलं नाही तर प्रत्यक्षात दिलचं. तिने हा किस्सा सांगितल्यानंतर मी अभावितपणे विचारलं, कोणी खास मित्र आहे का? यावेळी खास वर जोर होता हे ओळखून ती म्हणाली,  निखळ बिखळ म्हणतात ना तसा मित्र गं. मित्र म्हणजे मित्रचं. बाकीच्या सर्वसामान्य मित्रांपेक्षा थोडा वरचढ इतकचं पण शेवटी मित्र. आकर्षण वाटावा, सहवास मिळावा असा खरा पण पुन्हा पुन्हा तेच की नुसता मित्र. बाकी तुझ्या डोक्यातले घोडे ज्या मुद्यापासून धावायला सुरू करतात, बरोबर त्याच मुद्यावर येऊन आम्ही थांबतो. अशी आमची रिलेशनशिप. 
बोलता बोलता ती म्हणाली, गावाकडच्या वातावरणात जगलेल्या आईला  मित्र, मैत्री हे समाजावणं खूप अवघड गेलं. त्यांना मित्र म्हणजे एकच ठाऊक ‘यार’ म्हणून. पण हळूहळू रूजवत, बिंबवत नेलं अन आत्ता थोडासा फरक जाणवतो, मग तीच कधीतरी कोणाची तरी आठवण काढत म्हणते, अगं खूप दिवस झाले तुझा अमूक एक मित्र नाही आला, बोलाव की त्याला या रविवारी  जेवायला. तिचा हा बदल खूप सुखावह वाटतो.
नुकताच झालेल्या मैत्रिदिनाला या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. डोक्यात हाच विचार घोळत राहिला.  
मला ही आठवतयं. सातवी आठवीची गोष्ट आहे. समीर, माझा वर्गमित्र. चाळीतून जात असताना, त्याला मी दिसले. त्याने हाक मारली आणि आम्ही चाळीतच एका बाजूला उभे राहून बोलू लागलो. गप्पा गोष्टी बराच वेळ रेंगाळल्याने, आईने हाक मारली. 
विचारले,तो कोण होता? 
‘वर्गमित्र ’
या उत्तराने तिचे पूर्ण समाधान झाले नाही. उलट तिने यावर मला, ‘‘ मुलांशी रस्त्यात उभे राहून बोलायचे नाही. फारच काही बोलायचे असल्यास आणि मित्र वगैरे असल्यास घरात बसून बोलावं. रस्त्यात बोलणं बर दिसत नाही. पप्पांनाही ते आवडत नाही. (तिला न पटणाºया,आवडणाºया गोष्टी ती सरळ पप्पांच्या नावे ढकलून सांगायची, म्हणजे पुढे प्रतिप्रश्न करायला ते समोरच नसायचे) ’’ अशी धमकीवजा सूचना तिने केली. मी ही निमूटपणे मान डोलावली. तिच्या बोलण्याचा रोख, ओघ मला तेव्हाही कळला होता. 
मुलींचे मित्र आणि प्रश्नचिन्ह असे बहुतेक एक समीकरणचं असावे. हे समीकरण बहुतेक मुलींना आपपल्या पद्धतीने हाताळत घरच्यांच्या मनात त्यासाठी जागा करावी लागते. मुलीच्या मित्राचा स्वीकार करण्याची पालकांची तयारीच नसतेच फारशी. एखादी मैत्रीण कशी चटकन घरात येते, रूळते, लेकीची मैत्रीण म्हणून आई बाबासुद्धा किती जिव्हाळयाने चौकशी करतात. पण तेच एखाद्या मित्राच्या बाबतीत....मुळात त्याला घरात प्रवेश आहे की नाही इथपासून सुरूवात होते. प्रवेश असला तरी कधी, कितीवेळ असं सगळं अलिखित टाईमटेबलच ठरवलेलं असतं. अशा परिस्थितीत त्यांना पालकांकडून जिव्हाळा कमी आणि साशंक नजरांच जास्त मिळतात.  
मला आठवतं, शाळेत असताना ही घरात हे नीट समजावून सांगावं लागायचं की वर्गातील मुली मैत्रीणी तश्या मुले मित्र. इतकं साधं सरळं. आईला ते फारस अमान्य नसायचं (मनोमन पटलेलं ही असायचं)पण पूर्णपणे नाहीच. त्यांच्या दृष्टीने मित्र म्हणजे ‘कोणीतरी खास’. या खासची पण गंमतच. एखादा खास मित्र म्हटलं तरी त्यांच्या भूवया उंचावयाच्या. त्यांच्यादृष्टीने खास म्हणजे एकच ‘बीएफ’. मग पुन्हा एकदा उजळणी घ्यावी लागायची, खास म्हणजे इंग्रजीत ‘बेस्ट’ म्हणतो ना ते.
माझ्या घरच्यांच्या नशीबाने मी फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यामुळे मित्रांचा प्रश्न मुळातच मार्गी लागलेला होता. तरीही शाळेतील, चाळीतील, ओळखीतून झालेले काही मित्र असायचेच. अगदी चांगले मित्र वगैरे कॅटेगरीत मोडणारे नसले तरी मित्रच. तरूणपणाची वाटेकरी होऊ लागल्याने मग त्यांच्याशी कधी रस्त्यात बोलताना उभे राहिलो की मग आजी, काका सगळेच हटकायचे. ‘बेटा घर चलो, देर हो रही है’ नाहीतर ‘घरपे बाते करो’ अशा प्रेमळ हाका यायच्या. नेमकं काय म्हणायचंयं हे मित्र आणि मी दोघेही समजून घ्यायचो आणि मग कलटी मारायचो. यातही गंमत अशी असायची की,  आईबाबा, आजी-आजोबा, काका काकू असं सगळ्यांना दाखवायचं असायचं की अगं आमचा तुम्हा मुलांवर विश्वास आहे. तुम्ही वावगं काहीच वागणारं नाही. याशिवाय आम्ही पण ‘मॉडर्न’ आहोत. मुली-मुले बोलले तर काय बिघडलं असा आव असायचा आणि सेम टाईम जाब ही विचारयचा अशी दुटप्पी वागणूक़
बी. एस स्सी झाल्यानंतर एम.ए.च्या शिक्षणाला सुरूवात झाली.विद्यापीठात को-एड. मग रोज रोज भेटीतून, शेअरींगमधून चांगले मित्र ही गवसू लागले होते. आई चांगली मैत्रीण असल्याने तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणचे शेअरींग असायचे, त्याचप्रमाणे कळत नकळत घरी मैत्रिणींसारखंच मित्रांविषयीही बोलू लागले होते. तसं माझ्या घरी फार काही हिटलरीपद्धतीचं वातावरण नव्हतं. मुले चालणार नसली तरी अगदीच वर्ज्य नव्हती. शिवाय लहानपणापासूनच पालक जसे वेगवेगळ्या मुद्यांवर माझा ‘क्लास’घ्यायचे तशीच मी सुदधा नव्या जमान्यातील गोष्टी त्यांना पटणाºया भाषेत सांगायचे. वेगवेगळया पद्धतीने आमची उजळणी सुरू असायचीच. कॉलेजातील मित्रांविषयी सांगताना, त्यांची परिस्थिती, त्यांची हुशारी, त्यांचा अभ्यास, त्यांचे आकलन, समज याविषयी हळू हळू आईला कळू लागले. 
मित्र-मैत्रिणींचै नातं नीटपणे त्यांना उलगडावं म्हणून मग सरळ त्यांना घरीच बोलावू लागले. वंदनासुद्धा मित्रांना थेट घरीच घेऊन जायची. सेम माझ्यासारखचं. ईदनिमित्त, वाढदिवसानिमित्त त्यांच येणं वाढलं. मग ते ही घरी अगदी शहाण्या मुलांसारखे वागायचे. तरी उपजत मस्ती घालण्याची उर्मी काही सोडू शकायचे नाहीत. मग उगीच कशावरून तरी आलेल्या मैत्रीणींना छेडायचं. उचकवायचं. त्रास द्यायचा आणि इतकं करूनही पुन्हा काळजी, जिव्हाळ्याने राहायचं हे घरात आईसह सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागलं.  हळूहळू तर त्यांनी मोकळा एकांतच द्यायला सुरूवात केली. आमचं काय काय चालायचं यात त्यांचा डिस्टबर्न्स नसायचा. उलट पप्पांनाही सूचना असायची, त्यांच ते बघून घेतील. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.’ घरातूनच अशी हेल्थी मोकळीक मिळाली की नाती आणखी बहरून येतात.
एकदा आॅफिसच्या वारीत पायाचा छोटासा अ‍ॅक्सिडेंट झाला तेव्हा एक खास मित्र घरी सोडायला आला. आठ दिवसांनी डॉक्टरांकडे जायचे होते. तेव्हा घरापासून जवळ राहाणारा दुसरा एक मित्र सकाळी सकाळी आला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पहिला मित्र तिथे वाटच पाहत होता. दोघांनी मस्त काळजी घेतली. त्या मित्राने पुन्हा घरी आणून सोडले. २५ किलोमीटरचे हे अंतर त्याने माझ्यासाठी पार केले होते. त्यानंतर पुन्हा १३ किलोमीटरची चाकमोड (पायमोड सारखं गाडीचे चाकमोड) करून  आॅफिसला जाणार होता. या सगळ्या प्रक्रियेतील समंजसपणा, आस्था घरच्यांना नीटपणे उमगत होती. असे कितीतरी किस्से घडले. आश्वस्त करणारे मित्र किती जरूरीचे हे न सांगता त्यांनी समजून घेतले. मग शंका घेण्याचं प्रमाण घटायला लागलं. लेकीच्या मित्राविषयीच्या प्रश्नचिन्हाचे समीकरण त्यांच्यापुरते सुटू लागले तसे ते ही निर्धास्त झाले.
‘मित्र, मित्र असतात गं.’ हे घरच्यांच्या कानातून मनात उतरवताना खूप  चिकाटी अन सातत्य ठेवावं लागलं. आयुष्यात आपल्या मनीचे गुज ऐकायला जशी मैत्रीणींची गरज असते तशी विचारांचा थांग शोधायला मित्रांचीही. निखळपणे आपल्याला सोबत करणारा दिलखुलास दोस्तही मुलींना हवाहवासा वाटतो. एखादा किंवा एकापेक्षा जास्तही मित्र मुलींना असू शकतात. मित्र आहेत म्हणून लगेच ती काही वाईट होत नाही किंवा तिचा स्वभाव किंवा चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत नाहीत. निरलस आनंद देणारे, पाठिशी उभे राहणारे, मस्ती घालणारे, टपल्या मारणारे, शिव्या घालणारे मित्र असूच शकतात हे मग हळूहळू घरी पटू लागले. मित्रांची जागा उमगायला लागली. तशी उलटतपासणीसुद्धा थांबली आणि मित्रांसाठी घरचे दरवाजे कायमचे उघडले. (टाईमटेबल सोडून..)

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...