पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

अस्वस्थ करणारं पुस्तक


प्रेम ही खरं तर किती तरल भावना आहे. त्याची व्याख्या करणं तसं अवघडचं शिवाय व्यक्तीसापेक्ष ही. पण एखाद्याविषयीची ओढ, प्रेमाची भावना आपल्याला सुखी, आनंदी, छान काहीतरी वाटू देत राहते, हे असचं असतं असंही नाही त्यात राग, लोभ, रूसवा फुगवा वगैरे कालांतराने मिसळत जातात हे ही खरं, यात कोणाचं दुमत असणार नाही. पण प्रेम करणं हे काही सोप्पं काम नाहीये. प्रेम करायला आणि मग ते पुन्हा आपल्या मनाशी मान्य करायला तुमच्यात हिम्मत असायला लागते. त्या पुढे जाऊन तुम्ही प्रेमाच्या पाठीशीचं उभं रहायचं ठरवत असाल तर तुम्हाला सगळी जिगरच पणाला लावावी लागते.
पण काही वेळा प्रेम करून ही, हिम्मत गोळा करता येत नाही. रूढीबाज जगणं इतकं अंगवळणी पडेललं असतं की, त्या ठरलेल्या आखीव-रेखीव चौकटीच्या बाहेर पाऊल टाकवलं जात नाही. पुन्हा पुन्हा रूढी-परंपरांच्या, नियम निकषांच्या रेषांवर आपण खेळत राहतो. एखादा नियम मोडण्यापेक्षा मन मारणं सोप्पं वाटतं. पण हे तितकसं सोप्प असतं का? मन मारताना होणार्या असह्य वेदनांपेक्षा मनाला घेरून टाकणारी उदासीची काळी छाया आणि अथांग अस्वस्थता त्याचं काय करायचं? कसं डील करायचं?
चिमुटभर रूढीबाज आभाळ ही राजन खान यांची कांदबरी अशीच अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आपल्या जगण्याची एकूण व्याप्ती पाहता या रूढी परंपरांचा जीव फारतर चिमुटभर असायला हवा किंबहूना तो तेवढाच असतो पण तो आपण कुरवाळत राहतो आणि आपलंचं जगणं आभाळाएवढं मुश्किल करून घेतो. हा सगळ्यांच्याच जगण्याचा सार म्हणजे ही कादंबरी.
एकूणच, आपल्या समाजाची जडणघडण बर्या वाईट परंपरांच्या, जातीपातीच्या, उच्च-नीचतेच्या तथाकथित संकल्पनेच्या पोटातूनच होत जाते आणि कळत नकळत त्याचे संस्कार घेत पिढ्या दर पिढ्या घडत असतात. त्यामुळे पिढ्या दर पिढ्या प्रेम, संसार आणि प्रेमाचे दुश्मन वगैरे साग्रसंगीत घडतच जातात. त्या अर्थी आपण चित्रपटापासून ते कथा-कादंबर्यांपर्यंत प्रेम हा विषय पाहिलेला ऐकलेला असतो. काहीवेळा आपल्या आसपासही काही प्रेमकहाण्या फुलताना, विझताना आपण पाहिलेल्या असतात. मुख्यत्वेकरून विझताना, संपतानाच. आपल्यासाठी एक प्रेमकहाणी संपली इतकाच विषय असतो. प्रेमीजीव काही दिवस झुरतील अन पुन्हा सगळं सुरळित होईल. मुलीच्याबाबतीत तर तिचं लग्न लावून दिलं की कुटुंबियांना कर्तव्यपूर्तीचा केवढा तरी आनंद. मात्र या सगळ्यात खरचं प्रेमभंगानंतर किंवा स्वत: प्रेमात कच खाल्ल्यानंतर एखाद्या स्त्रीची मनोवस्था काय होईल. परंपरांच्या कलेनं जाणार्या, प्रेम हवं असणार्या पण चौकटी मोडू पाहणार्या या स्त्रीची अवस्था कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी. सर्वसामान्य मुलींसाठी प्रेम करतानाही भीती आणि लग्न झाल्यानंतर ही होऊन गेलेल्या प्रेमाची हकीकत कळू नये याची भीती. कादंबरीत तर तिच्यादृष्टीनं सारी भीती, आठवणी आता झिरझिरीत झालीये असं वाटत असातनाच तो परततो आणिउद्या 1 वाजता भेटायला ये..नाही आलीस तर मी दोन वाजता घरात येतो असं म्हणून वादळासारखं निघून जातो. या एका वाक्यात लपलेलं दडपण, तिची अस्वस्थता, तिची उलघाल, उलथापालथ, भीती लेखकानं अतिशय सूक्ष्मरित्या आणि वास्तवादी टिपलयं.
मुळात, आपल्याकडे, पालकांना अपत्यांवर मालकी हक्क वाटत राहतो आणि त्याच संस्कारांनी मुलांनाही पालकांनी आपल्याला जगात आणून आपल्यावर उपकार केले आहेत असंचं वाटत राहतं. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर किंवा त्यांचा जाच सहन करणे हा ही त्या उपकाराच्या परतफेडीचाच भाग वाटत राहतो. अशा परिस्थितीत मुलांविषयी पालकांना काळजी वाटणे आणि मुलांना पालकांविषयी आदर वाटतो असं जे आपण म्हणत राहतो, त्यावेळी त्यातील काळजी अन आदर शब्दांचे खरे अर्थच भिन्न होऊन जातात. ही रचनाच तशी आहे. अन इतकीच नाहीये. बाकी अनेक प्रकारचे रंग त्याला आहेत. जातींची, धर्माची,लिंगभेदाची, आर्थिकतेची त्यातही पुन्हा एक एक पदर उलगडत आणखी नव्या नव्या चौकटी. अशा आपल्या रीती नीतीच्या समाजात, प्रेम करणं हे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसाठी केवढी अवघड, घाणेरडी अवस्था आहे. एकवेळ लफडं करणं सोप्पयं पण प्रेम नाही.
कांदबरीत एके ठिकाणी ती तिच्या मन मारत जगण्याचा, कोंडवाडा झालेल्या आयुष्याचा, बदनामीच्या भितीचा आणि िंबंग फुटलं तर त्यामुळे होणार्या परिणामांचा विचार करत असते त्यावेळेस तिच्या लक्षात येते, प्रेम केल्याची शिक्षा फक्त तिलाच मिळतेय. त्याचं नाव पेपरात येतं, टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचं प्रेमाशिवाय सुरू असलेलं आयुष्य सुरेख सुरू आहे. त्यात तो पुढेही गेला मग कोंडवाडा मलाच का?हा प्रश् आपल्यालाही अस्वस्थ करतोया प्रश्नाचं उत्तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत कधी मिळेल हे सांगणं अवघडचं.
कादंबरीतील मुख्य दोन पात्रांना नावं नाहीयेत. तिचं पात्र ती म्हणून येतं अन त्याचं तो म्हणून. अन बाकीचे सुद्धा तिचा भाऊ, त्याची आई, बहिणी, नवरा, दीर अशाच स्वरूपात. ही गोष्ट मला विशेष चांगली वाटली कारण ती कोणाही तिची आणि कोणाही त्याची गोष्ट आहे. अमूक तमूक समाजातच नव्हे तर आपल्या एकूण समाजात सर्वच धर्मांमध्ये प्रेमाच्या कहाण्या अशाच रीतीनं जातात. त्यामुळं पात्र बिननावी आहेत हे चांगलचं आहे. पुस्तकाचं गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं झालयं. कांदबरी वाचनीय झालेली असताना, संवादांच्या वा स्वगताच्या ठिकाणी कुठेच अवतरण चिन्ह नाहीत. अक्षरजुळणीतील ही गोष्ट खटकते. ती दुरूस्त झाल्यास संवाद अधिक प्रभावी वाटतील.
पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट जाणवत राहिली, समाज नियमांना आपल्या अनुवांशिक पद्धतीने जगताना, प्रेम करणं जसं अवघड आहे तसचं केलेलं प्रेम विसरणं. केलेल्या प्रेमाची भूतं जेव्हा वर्तमानात येऊन नाचू लागतात तेव्हाही या भूतांसह जगणं अवघड असतं. त्यालाही अर्थात कारण हेच बेड्याघालू समाज.



चिमूटभर रूढीबाज आभाळाला धुतकारून प्रेम करता आलं पाहिजे आणि त्यासह जगताही!

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

परवानाचा प्रवास



काल रात्री परवाना हे पुस्तक संपवले तेव्हा मनावर एक प्रकारची उदासी घर करून होती. खरं तर पुस्तक वाचतानाही असह्य वेदना आणि त्रास होत होताच. एका 9-10 वर्षाच्या मुलीचा जीवघेणा, भूकेला आणि संघर्षाच्या अत्यंत दुखावणारा हा प्रवास...म्हणजे परवाना. अफगाणच्या तालिबान राजवटीत जीव मुठीत घेऊन अम्मीला शोधायला निघालेल्या तिच्या दुर्दम्य आशेचा हा प्रवास म्हणजे परवाना....तालिानी संघर्षाला समोरे जाण्यासाठी केस कापून मुलगा झालेली मुलगी म्हणजे परवाना...
डेबोरा एलिस या मुळ इंग्रजी लेखिकेचा ‘परवानाज् जर्नी’ या पुस्तकाचा अर्पणा वेलणकर यांनी अनुवाद करून आपल्याला खूप काही दिलेले आहे. पुस्तक मुळातच कुठेही अनुवाद वाटत नाही. इतकं जिवंत चित्रण आणि लेखनं.
परवाना या प्रवासात पहिल्यांदा तिच्या वडिलांना गमावते आणि तिथंपासून तिच्यापुढे असंख्य यातनांची सुरूवात होते. लहानपण विसरून जाऊन अवेळीच मोठं व्हायला लावणार्‍या परिस्थितीचा आपल्याला जितका राग येतो तितकाच तिच्याविषयी करूणा मनात जागी होत जाते. दिवस ड्ढरात्र, उजेड -अंधारात एकाकी प्रवास करणार्‍या परवानाच्या धाडसाचे कौतुक वाटत राहते. बॉम्बस्फोट आणि घरघरत्या विमानाच्या आवाजात तिच्यातील कोवळेपण विरत जात होते आणि तरीही परवानाचे खंबीर आणि आशावादी जगणं आपल्यालाही प्रेरणा देत राहते. वाटेत तिला 8-9 महिन्याचा एक लहान जीव सापडतो. नंतर असिफ आणि मग लैला. सगळे असेच बेवारस.
पोटात उठणार्‍या भूकेचा डोंब विझवताना या लहानग्याची इतकी दमछाक होत असते की कधी ते नासलेले पाव, आंबलेला भात, हिरवट गवत आणि परवानाच्या प्रिय अब्बुंच्या पुस्तकातील पानेही खातात. हे सगळं वाचाताना असह्य होतं आपल्याला. परवाना जेव्हा वडिलांच्या थडग्यावर दगडे ठेवते आणि विचार करते, ‘पैश्यांसाठी आपल्याला वडिलांची हाडे कोणी नेणार नाहीत आता.’ तिच्या आयुष्यातील या प्रसंगाने हादरून निघतो आपण. खूप अस्वस्थ होतो. त्यावेळचं तिचं रडणं तर त्याहून जीवघेणं वाटतं.
पुढे सामान खूप जड झाले म्हणून अब्बुची दोन जाड पुस्तके ती खड्डा खणून त्यात पुरते आणि विचारत करते की, अब्बुंना आता पुस्तके मिळतील वाचायला तर ते नक्कीच आनंदतील. तिचे निरागस भाव आणि कल्पना मनाला चटका लावून जातात. एव्हाना परवानाचे केस बरेच वाढलेले असतात आणि तिने घातलेले कपडेही लैलाच्या अम्मीचे असतात. पुढे ते एका रिहॅब कॅम्पमध्ये पोहचतात. प्रचंड थंडीने आणि भूकेने बेजार असतात त्यावेळेस, एक पुरूष तिच्यावर डोळे वटारून म्हणतो, तोंड झाक. झाकून घे तोंड. बाई आहेस ना तू.अशी उघड्या तोंडाने फिरतेस शरम नाही वाटत? परवानाच्या मस्तकात तिडीक जाते आणि ती स्वत:शीच पुटपुटते, ‘तोंड झाकून घे म्हणजे? कशाने झाकायचे तोंड? एखादी फाटकी तुटकी गोधडी असती तर तोंडच काय थंडीने कुडकुडणारं अख्खं शरीरचं नसतं का घेतलं झाकून?’ तालिबानी किंवा कट्टरपंथीयांच्या या विसंगत वागण्याचा वाचकालाही जाच वाटतो.
तालिबान्यांच्या या असमातेल वागण्याची परवानाला आता सवयचं झालेली असते पण सतत पोटात पडणारी आग या मुलांना खूप छळत राहते,हे स्पष्ट करणारी आणखी एक उदाहरण म्हणजे लैला. याच भूकेपोटी ती सुरंगांंच्या शेतीत शिरते आणि तिचा मृत्यू होतो. ही घटना तर चटका लावते. पुस्तकाच्या या टप्प्यावर तर आपल्या कोरड्या पडलेल्या मनालाही चरे जातात आणि डोळ्यातून वाहत राहतात अश्रू. पुस्तकाच्या शेवटाकडचा हा प्रवास इतका त्रास देऊन गेला की बास.....!!
परवानाचा आणि तिच्या सोबतीचा हा जीवघेणा प्रवास जीवनाची आवड असणार्‍या प्रत्येकाने वाचाच!! हे पुस्तक मराठीत आणण्यासाठी अपर्णा वेलणकर यांना खूप धन्यवाद.

--

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...