गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

डाव सहजीवनचा...!!!




‘दीदी वंदनाको शायद हार्ट अ‍ॅटक आया है, हॉस्पिटल में लेकर गये है...सुबह सुबह ५ बजे’ शिरीन घाबरुन सांगत होती आणि मी खाडकन जागी झाले. सकाळचे पावणे आठ वाजत आले होते. शनिवारचा सुट्टीचा दिवस म्हणून मी अजुनही बिछान्यात लोळत पडले होते. आमच्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर वंदनाचे कुटुंब आहे. साधारण तिशीच्या आत बाहेरची वंदना. सहा वर्षांचा एका लेकरानंतर चार दिवसांपूर्वीच तिने एक चिमुकलीला जन्म दिला होता. सिझेरियन झाले होते.  कालच तिला घरी आणले होते आणि आज एकदम पुन्हा हॉस्पिटलची पायरी...

शिरीनच्या चेहºयावर एक विचित्र भीती आणि रडवेलासा स्वर होता.  ही बातमी ऐकताच डोळे उघडण्याच्या पलिकडे कसलीच दाद न मिळाल्याने आणि माझ्या पेंगुळलेल्या अवस्थेला पाहून ती पुन्हा हॉलकडे वळली. एका अस्वस्थ बातमीने सकाळ व्हावी इतकं उदासवाणं काहीच नसतं. पण तिला हॉस्पिटलमध्ये नेलयं तर फार काही काळजीचं कारणं नाही असं स्वतलाच समजावलं आणि आणखी पंधरा मिनीटे लोळण्यासाठी स्वतलाच कारणं दिलं. खरतरं हा शुद्ध निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा होता हे कळत होतं तरीही उठण्याची इच्छा होत नव्हती. पहिल्याच मजल्यावर घर असल्याने आवाज येत होतेच.  शेवटी उठलेच. तर शिरीन पुन्हा धावतं आली, दीदी वंदना नही रही... मनात धस्स झालं. चार दिवसात चिमुकली आईविना झाली होती. एकदम कससचं झालं. मम्मी पप्पा दोघेही सोसाटीतील लोकांबरोबर बाहेरच होते.

थोड्याच वेळात अ‍ॅम्ब्युलन्स आली. तोपर्यंत तशी मी बरीच स्थिर होते. खाली जायची हिमंत झाली नाही म्हणून खिडकीतून डोकावून पाहिले तर  वंदनाचे निपचित पडलेले शरिर गाडीतून बाहेर काढण्यात येत होते. मिटलेले डोळे आणि काळवंडलेले ओठ नजरेला पडले तेव्हा शरीरातील चैतन्य हरवणं म्हणजे काय हे कळतं होतं. अ‍ॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचर बाहेर काढणाºया लोकांमध्ये वंदनाचा नवरा होता. अवेळी, अचानकपणे आपला जोडीदार हरवलायं हे अजूनही त्याला पटतं नसावं. डोळ्यांत शून्य भाव आणि थकून गेल्यामुळे तो एकदमच दुप्पट वयाचा दिसत होता. सहजीवनाच्या सुरुवातीच्याच या टप्प्याला जोडीदाराला गमावणे, त्या जाणीवेने पोटात गोळाच आला. त्याच्या अन मुलांच्या आयुष्यातील रितेपणाने जास्त कासावीस केले. नवा अंकुर उमलवून घरभर आनंद देणारी ती अनंतात विलीन झाली होती.

तिला हार्ट अ‍ॅटॅक आलाच नव्हता. बाळांतीण झाल्यापासून सर्दी होती. त्यामुळे श्वसनाला त्रास होत होता...घरी आणल्यापासून त्रास बळावला..रात्रीतून तो वाढला असावा अन बहुधा झोपेतच..हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच..वंदनाचे शेजाºयांनी हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिची नाडी तपासली होती. ठोका ऐकू न आल्याने सर्वांचे ठोके चुकले आणि तिला भल्या पहाटे डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिला नेमका काय त्रास झाला असावा किंवा नेमके निमित्त काय कोणास ठाऊक पण ती नाही उरली हे वास्तव.

वास्तव भीषण होतं आणि भीषणंचं होतं. माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सिद्ध होत होती. नाही म्हटलं तरी, येणारा माणूस जाणारचं की. पण असं अचानकपणे जोडीदाराला एकटं टाकून, मुलांना पोरकं करुन. सहजीवनाच्या आणि भवितव्याच्या असंख्य स्वप्नांच्या सरणावर ती जळणार होती आणि तो तिच्याशिवाय आत्ताच बराच म्हातारा दिसत होता. मम्मी सांगत होती, गेल्या वर्षी वंदनाचे वडिल गेले तेव्हा तिचा लहानगा म्हणाला. आता येणाºया वाढदिवसाला आजोबा नसणार मग आजी पण मरणार, एकदिवस आईपण आणि बाबा पण. मग माझा वाढदिवस कोण साजरा करणार? या प्रश्नाने बैचेन होऊन त्यांनी दुसरा चान्स घेतला होता. भावाला कोणीतरी भाऊ-बहिण असावा म्हणून. खरचंच आपण नसल्यावर एकमेकांना ते असावेत म्हणून. आता खरचं तसं झालं होतं.

वंदनाला न्हाऊ घालण्यात आलं. साडी चोळी करण्यात आली. सुहासिनीचे सगळे सोपस्कार झाले. ११.३० वाजता तिला वैकुंठात नेण्यात येणार होते. अ‍ॅम्ब्युलन्स तयारच होती.  एका मागोमाग एक गाड्या सोसायटीच्या बाहेर पडू लागल्या. तिच्या मुलाला घेऊन आजी इमारतीच्या खालीच उभी होती. आपलं सगळं दुख आणि अश्रु लपवून ती माऊली आपल्या लेकीला निरोप देत होती. तितक्यात वंदनाचा मुलगा म्हणाला, आजी आईला कुठे घेऊन जात आहेत. आजीला गलबलून आले. आईला बरे वाटत नव्हते ना म्हणून जरा बाहेर गावी नेत आहेत. त्यावर त्या छोट्याचा प्रश्न तयारच होता, मग कधी येणार आई? आजीने कसतरी उत्तर दिलं, येईल थोड्या दिवसात. उत्तराने मुलाचं समाधान झालं नव्हतं पण सगळा गंभीर प्रसंग त्याला काहीतरी सुचवत होतं म्हणून तोही शांत झाला. त्याच्याकडे पाहण्याची इच्छाच झाली नाही. वंदनाची पोरगीसुद्धा आईचा शांतपणे निरोप घेत असावी त्यामुळे इतक्या वेळेत रडलीसुद्धा नाही.

दोन तीन दिवसांनी मम्मी सांगत होती. वंदनाचा मुलगा सतत विचारत असतो आई कधी येणार आहे. लहान पोरांना भुलवणं सोपं असतं असं वाटून प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर दिलं जातं. परवा हट्टच करुन बसला. शेजारच्या सगळ्या मुलांची आई आहे मग माझी कुठे?’ ‘तू मोठा झाला ना की येणार आई’ असं त्याला कोणीतरी उत्तर दिलं. मग ‘मी लगेच मोठा होतो ना, सांग कसा मोठा व्हायचं म्हणून तो त्याच्या बाबाला त्रास देत राहिला. कोणाकडेच उत्तर नव्हतं. अजून तर पुढे चालून मुलीला पडणाºया प्रश्नांची ही उत्तरे ठरवायची होती. पोरांपुढे घर हबकून गेले होते.

आयुष्यातील प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे हे परत परत अधोरेखित होत होतं. कधी कोणाचा डाव संपेल हे नियतीलाच ठाऊक असणार आहे. याहून विचित्र काहीच नाही, पण आपण हतबल आहोत. या क्षणाला वाटतं होतं जी जोडपी आपल्या संसारात आनंद निर्माण करत नाहीत...सतत भांडत असतात...कुरकुरत असतात...जोडीदाराचे उणेपुरे काढण्यात मग्न असतात त्यांची कीव आली. का असमाधानी असतात ही लोक असा प्रश्न पडला? दोन आयुष्य एकत्र येत असताना थोडी फार तक्रार होते..भांडाभांडी पण होते पण हे जेवढयास तेवढे असले तर ठीक असते पण नात्यात सततच असंतोष ठेवणाºया लोकांची चीड आली. हे कोणत्याही नात्याचं आहे, माणुसकीच्या ही नात्यचं. नातं ताणताना, आयुष्याचा वाटेकरी अचानक गायब झाल्यावर काय होऊ शकतो हे चित्र एकदा डोळ्यांपुढे उभे केले पाहिजे म्हणजे कळेल वंदनाच्या घरातील रितेपण आणि आपल्याकडे आयुष्याला जगण्याची असणारी संधी यातील नेमका फरक.

सुफियान अन त्याचे मित्र

गोष्ट तशी गंमतीची.   माझ्या घरासमोर राहाणारी दोन छोटी मुल माझ्या तीन वर्षाच्या सुफियानचे मित्र आहेत. त्यातील छोटा हा सुफियानपेक्षा फक्त ...